बुद्ध म्हणाला "महाराज, कृपणाच्या दौलतीची हीच गति होते! तो जिवंतपणीं आपल्या जीवाला सुख देत नाहीं. आपल्या आईबापांनां, बायकोमुलांनां किंवा आप्तइष्टांनांदेखील सुख देत नाहीं; तो श्रमणब्राह्मणांनां दानधर्म करीत नाही. अशा रीतीनें पैसा सांठवून शेवटीं त्याचें धन राजेलोक घेऊन जातात, चोर लुटतात किंवा त्याचे प्रतिपक्षी दायाद तें घेऊन जातात, अथवा अग्नि आणि उदक यांपासून त्या धनाचा नाश होतो. गांवापासून फार दूर अंतरावर जंगलांत एकादा तलाव असावा, पण त्याचा उपभोग कोणींहि न घेतल्यामुळें तो तेथल्यातेथें आटून जावा, अशी स्थिति कृपण मनुष्याच्या धनदौलतीची होत असते.

"पण महाराज, जो आपल्या दौलतीचा सद्व्यय करितो- आपल्या जीवाला, आपल्या आईबापांनां, बायकोमुलांनां, आणि आप्तइष्टांनां सुख देतो, श्रमणब्राह्मणांनां दान देतो, त्याच्या संपत्तीची अशी नासाडी होत नाही. गांवाजवळ असलेल्या सुंदर तलावाचा जसा लोकांना उपयोग होतो, व त्या तलावाचें पाणीं फुकट जात नाहीं, तें लोकांनीं वापरल्यामुळें स्वच्छ रहातें, तद्वत् या उदार मनुष्याच्या संपत्तीचा सद्विनियोग झाल्यामुळें तिचा नाश होत नाही.''

(घ) चार त-हेचे मनुष्य

पसेनदिकोसल राजा जेतवनांत आला असतां बुद्ध त्याला म्हणाला "महाराज, इहलोकीं चार प्रकारचे मनुष्य आहेत. ते कोणते? तर तमापासून तमाप्रत जाणारा, तमापासून ज्योतीप्रत जाणारा, ज्योतीपासून तमाप्रत जाणारा, आणि ज्योतीपासून ज्योतीप्रत जाणारा.

"महाराज, एकादा मनुष्य चांडाळ, नैषाध वगैरे हीन कुलामध्यें जन्मतो, आणि सारा जन्म दृष्कृत्यें करण्यांत घालवितो. हा मनुष्य तमापासून तमाप्रत जाणारा, असें मी म्हणतों. दुसरा एकादा हीन कुलांत जन्मतो, खाण्यापिण्याची त्याला टंचाई असते, पण कायावाचामनेंकरून तो सत्कर्माचरण करितो; अशा माणसाला मी तमापासून ज्योतीप्रत जाणारा असें म्हणतो. तिसरा एकादा थोर कुलांत जन्मतो, त्याला खाण्यापिण्याची पंचाईत नसते, तो चांगला गोजिरवाणा दिसतो; परंतु कायेनें, वाचेनें आणि मनानें दुराचरण करितो; त्याला मी ज्योतीपासून तमाप्रत जाणारा मनुष्य असें म्हणतों. पण जो चांगल्या कुळामध्यें जन्म घेऊन सर्वकाळ सदाचरण करितो, तो ज्योतीपासून ज्योतीप्रत जाणारा मनुष्य होय.''

(ङ) जरामरणाला सैन्याने जिंकतां येईल काय?

एके दिवशीं पसेनदिकोसल राजा भरदुपारींच जेतवनांत आला. बुद्धाला नमस्कार करून एका बाजूला बसल्यावर बुद्ध त्याला म्हणाला "महाराज, आज दुपारींच कोणीकडे निघालास?''

राजा म्हणाला "भदंत, माझें राज्य विस्तृत झालें आहे, त्याचा मला चिरकाळ उपभोग घेतां यावा, यासाठी मी सध्यां खटपट करीत आहे.''

बुद्ध म्हणाला "महाराज, आपल्या शत्रूचा सर्व प्रकारें तूं बंदोबस्त करीत आहेस हें ठीक आहे; परंतु समज, एकादा मनुष्य धांवत येऊन तुला सांगेलस कीं, `महाराज, चारी दिशांकडून मोठमोठाले पर्वत तुझ्यावर चाल करून येत आहेत; त्यांनी सर्व प्राण्यांचा संहार चालविला आहे; आतां या वेळीं तुला जें कर्तव्य असेल तें कर.' अशा वेळीं तूं काय बरें करशील?''
राजा म्हणाला "भदंत, अशा प्रसंगी माझ्या सैन्याचें काय चालणार आहे? सद्धर्माचरणावांचून दुसरें मी काय करूं शकणार आहें? त्या वेळीं माझें पुण्याचरणच मला उपयोगी पडेल.''

बुद्ध म्हणाला "महाराज, जरा आणि मृत्यु, त्या मोठाल्या पर्वतांपेक्षांहि भयंकर आहेत! हत्ती, घोडे, रथ, पादाति इत्यादि सर्व सैन्यैकडून जरा आणि मृत्यु यांचा पराजय होण्यासारखा नाहीं. ब्राह्मण किंवा चांडाल हा भेद जरामरण ठेवीत नाहीं; म्हणून सुज्ञ मनुष्यानें सावधानपणें सद्धर्माचें आचरण करावें. सदाचरण करणार्‍या मनुष्याची इहलोकीं प्रशंसा होते, आणि परलोकी तो सद्गतीला जातो.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel