राणीनें आपल्याबरोबर आणिलेल्या दागिन्यांपैकीं कांहीं दागिने बोधिसत्वाच्या (महाजनकाच्या) स्वाधीन केले. बोधिसत्व, ते विकून जे पैसे आले ते घेऊन, कांहीं व्यापारी सुवर्णभूमीला (ब्रह्मदेशाला) व्यापारासाठीं जात असत, त्यांजबरोबर एका जहाजावर चढला. जहाज एक आठवडा सुखरूप चाललें होतें. परंतु एका आठवड्यानंतर भयंकर तुफान होऊन तें फुटलें, व त्यांतून भराभर पाणी आंत शिरूं लागलें. त्या प्रसंगीं सर्व उतारूंची आरडाओरड सुरू झाली. परंतु बोधिसत्वानें आपलें धैर्य ढळूं दिलें नाहीं. तो जहाजाच्या कोठींत शिरला, व तेथें असलेल्या पदार्थांतून साखर व तूप हे पदार्थ घेऊन ते त्यानें पोटभर खाल्ले; (तूप खाल्लें असतां मनुष्याला समुद्राच्या पाण्यांत पुष्कळ दिवस उपाशी रहातां येतें, अशी समजूत होती.) आणि तेलानें आपलीं वस्त्रें भिजवून तीं त्यानें दृढ परिधान केलीं. जेव्हां जहाज बुडण्याच्या बेतांत आलें, तेव्हां बोधिसत्व डोलकाठीवर जाऊन बसला. जहाज बुडाल्यावर त्यांतील लोकांवर समुद्रांतील मोठमोठ्या माशांच्या झुंडीनें हल्ला केला. आपल्या बरोबरीचे उतारू माशांच्या भक्ष्यस्थानीं पडत आहेत, हें पाहून बोधिसत्वानें डोलकाठीच्या मस्तकावरून दूर उडी फेंकली. त्याच्या त्या उडीच्या आवाजासरशीं माशांचा कळप भिऊन जिकडेतिकडे पळत सुटला. बोधिसत्वाच्या हाताला जहाजाची एक फळी लागली. तिच्या आश्रयानें आपले प्राण वांचविण्यासाठीं तो समुद्रांत पोहूं लागला.

बोधिसत्व एक आठवडापर्यंत पाण्यावर तरंगत होता. त्या काळीं मणिमेखला नांवाच्या देवतेची देवांनीं समुद्ररक्षणाच्या कामावर योजना केली होती. परंतु कांहीं कारणामुळें एक आठवडा ही देवता आपल्या कामावर हजर राहूं शकली नाहीं. एका आठवड्यानंतर एकाएकीं तिला आपल्या कर्तव्याची आठवण होऊन ती घाईघाईनें ज्या ठिकाणीं महाजनक होता, तेथें आली. महाजनक एकसारखा पोंहत होता, तें पाहून तिला मोठा अचंबा वाटला, व ती त्याला म्हणाली "या समुद्रामध्यें किनारा कोणत्या बाजूला आहे, हें ठाऊक नसतां तूं पोंहण्याची ही एवढी खटपट चालविली आहेस, तिचा अर्थ काय?"

महाजनक तिच्याकडे वळून म्हणाला "प्रयत्न करणें हें मनुष्याचे कर्तव्य आहे, असें जाणून, हे देवते! या समुद्रामध्यें तीराची माहिती नसतां देखील मी रात्रंदिवस पोंहत आहें."

देवता म्हणाली "परंतु या गंभीर समुद्रामध्यें तुझा प्रयत्न व्यर्थ आहे. तूं किनार्‍याला पोहोंचल्याशिवायच मरशील!"

बोधिसत्व म्हणाला "कांहीं कां असेना. जो आपलें कर्तव्य करतो, तो आपल्या आप्तांच्या आणि पितरांच्या ऋणांतून मुक्त होतो, आणि त्याजवर पश्चात्ताप करण्याची पाळी येत नाही."

देवता म्हणाली "परंतु ज्या कर्मापासून फलाची उत्पत्ति न होतां त्रास मात्र होणार आहे, नव्हे, मरण येणार आहे, तें कर्म करण्यांत काय अर्थ?"

बोधिसत्व म्हणाला "आपला प्रयत्न यद्यपि तडीला जाण्याचा संभव नसला, तथापि होतां होईल तों आपल्या प्राणांचें रक्षण करणें हें आपलें कर्तव्य होय. लोकस्वभावच असा आहे, कीं, मनुष्याचीं सर्व कामें तडीला जातातच असें नाहीं. शेती, व्यापार वगैरे सर्व कृत्यांमध्यें मनुष्य सर्वदा यशस्वी होतोच असें नाहीं. आतां माझ्या प्रयत्नासंबंधीं म्हणशील, तर हें एक त्याचें प्रत्यक्ष फळ आहे, कीं, माझ्या बरोबरीचे इतर लोक पाण्यांत बुडून मेले असतां मी तुझ्यासारख्या महानुभाव देवतेचें दर्शन घेण्यास जगलों आहें! म्हणून हे देवते! मी यथाशक्ति प्रयत्न करण्याचें कधींहि सोडून देणार नाहीं. या समुद्राच्या पार जाण्याची खटपट करून मी माझें पौरुष प्रकट करीन."

बोधिसत्वाचें हें दृढनिश्चयाचें भाषण ऐकून देवता प्रसन्न झाली, व तिनें बोधिसत्वाला त्याच्या इच्छेप्रमाणें मिथिला नगरीला नेऊन पोहोंचविलें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel