बोधिसत्वानें याच प्रदेशांत आपली तपश्चर्या पुढे चालवण्याचा निश्चय केला. आणखीहि पुष्कळ तपस्विलोक मगध देशाच्या या अरण्य भागामध्यें तपश्चर्या करीत असत. उरुवेलकाश्यप, गयाकाश्यप आणि नदीकाश्यप, या तीन बंधूंची येथील तपसव्यांत प्रमुखत्वाने गणना होत असे. दुसरेंहि स्वतंत्रपणें योगाभ्यास करणारे तपस्वी या अरण्यांत वास करीत होते.

सिद्धार्थानेंहि कोणाचें शिष्यत्व न पत्करितां येथें स्वतंत्रपणें योगाभ्यासाला सुरुवात केली. समाधीच्या आठ पायर्‍यांचे त्यानें उल्लंघन केलेंच होते. तथापि त्यांच्याहिंपुढें आणखी कांही नवीन पायर्‍या असल्या तर पहाव्या, या उद्देशानें त्यानें खडतर योगाभ्यास चालवला. श्वासोच्छ्वास कोंडून तासांचे तास तो मृतवत ध्यानस्थ बसत असें. त्यामुळे त्याच्या पोटात भयंकर वेदना उठत आणि सर्व अंगाचा त्यांत दाह होत असे. परंतु त्याचा उत्साह रतिमात्र ढळला नाही, व जागृतीत व्यत्यय आला नाही. या तीव्र योगाभ्यासानें सिद्धार्थाच्या चित्तावर जर प्रथमत: अपायकारक परिणाम झाला नाही, तरी तो देहावर झाल्याशिवाय राहिला नाही. त्याचा देह अत्यंत दुर्बळ झाला.

याप्रमाणें सिद्धार्थानें आपला योगाभ्यास चालविला असतां कौंडिण्य, वप्र, भद्रय, महानाम आणि अश्वजित हे पांच ब्राह्मण तपस्वी त्याला येऊन मिळाले. सिद्धार्थाची आणि त्यांची लहानपणाची ओळख होती, व सिद्धार्थ पुढे बुद्ध होणार आहे, हे भविष्य बाळपणीच त्यांच्या ऐकण्यांत आले होतें. सिद्धार्थानें चालविलेला खडतर योगाभ्यास पाहून तो लवकरच बुद्ध होईल, अशी त्यांना आशा वाटूं लागली व ते मोठ्या आस्थेनें सिद्धार्थाची सेवा करूं लागले.

पुष्कळ दिवसपर्यंत सिद्धार्थानें हटयोगाचा अभ्यास केला. दिवाळ्यांत दिवसा अरण्यांत शिऱून तेथें ध्यानस्थ बसावें व रात्री मोकळ्या मैदानांत बसावें, उन्हळ्यांत दिवसा मैदानामध्ये बसावें आणि रात्री दाट झाडीत शिरून तेथें बसावें, अशा रीतीनें त्यानें तप चालविलें. पण त्यामुळे दुसरा काही एक फायदा न होतां, उत्तरोत्तर त्याचा देह मात्र दुर्बल होत चालला. तथापि त्यानें आपला निश्चय ढळू दिला नाही. हटयोगानें आपणाला निर्वाणाचा लाभ होत नाही, असें पाहून त्यानें हळुहळू आपला आहार कमी करण्यास सुरवात केली. आहार तोडला, तर योगमार्गांत लवकर सिद्धि मिळतें, अशी त्या काळी समजूत होती.

सिद्धार्थानें क्रमश: अन्नाचा त्याग केला, आणि दिवसांतून मुगाचा किंवा कुळिथाचा चारपाच पळ्या काढा पिऊन तो आपला निर्वाह करूं लागला. त्याच्या देहदौर्बल्याची आतां सीमा झाली. हातापायांच्या काड्या झाल्या, पाठीचा कणा स्पष्ट दिसूं लागला. मोडक्या घराच्या वांशांप्रमाणें बरगड्या खिळखिळून गेल्या, पाण्यांत पडलेली नक्षत्रांची प्रतिबिंबे जशी खोल गेलेली दिसतात, तशी त्याच्या डोळ्यांची बुब्बुळें खोल गेली. कडू भोपळा कच्चा कापून उन्हांत टाकला असतां जसा कोमेजून जातो, तशी त्याची पूर्वीची सुंदर अंगकांति पार करपून गेली, आणि त्याचे पोट पाठ एक झाली.

एके दिवशी सिद्धार्थाच्या मनांत असा विचार आला, की, “या ज्या मी अत्यंत तीव्र वेदना अनुभवीत आहे, त्यांच्यापेक्षा तीव्रतर वेदना दुसर्‍या कोणत्याहि तपस्व्यानें अनुभविल्या नसतील! पण एवढें दु:ख भोगून देखील परमशांतीचा मार्ग मला आढळत नाही, तेव्हा हा माझा प्रयत्न चुकीचा तर नसेल? मेरुमंडलामध्ये वाट चुकलेला वाटसरू जसा भलत्याच मार्गानें जातो, तशीच माझी स्थिति झाली नसेल कशावरून? लहानपणी माझ्या पित्याबरोबर शेतांत गेलो असतां जंबुवृक्षाच्या छायेखाली मी ध्यानस्थ बसलों होतों हें मला आठवतें. त्या वेळी मी देहदंडन करीत नव्हतों. असें असतां मला समाधिसुखाचा लाभ झाला. तेव्हा सध्याच्या माझ्या देहदंडानापासून मला कांही फायदा होईल, असे दिसत नाही. लहानपणी मी ज्या समाधिसुखाचा अनुभव घेत होतो, ते पापवासनांची तृप्ति केल्यानें मिळालेले सुख नव्हतें, किंवा दुसर्‍याच्या घातपातानें मिळालेले सुख नव्हते. तेव्हा अशा सुखाला मी कां आंचवावें, हे मला समजत नाही. हा तपश्चर्येंचा अत्यंत बिकट मार्ग सोडून मी त्या साध्या मार्गाकडे कां वळू नयें? परंतु माझा देह इतका दुर्बल झाला आहे, की, माझ्याकडून कोणत्याहि मार्गांत एक देखील पाऊल पुढे पडणें शक्य नाही; तेव्हा प्रथमत: थोडेथोडे अन्न खाण्याची सवय करून नष्टप्राय झालेली माझी शक्ति पुन: मी मिळविली पाहिजे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel