(२९)
वत्सगोत्र परिव्राजक

बुद्ध भगवान् श्रावस्तीमध्यें रहात असतां वत्सगोत्र नांवाचा परिव्राजक त्याजवळ आला आणि म्हणाला, "भो गौतम, आत्मा आहे काय?''

बुद्धानें उत्तर दिलें नाहीं.

वत्सगोत्र म्हणाला "भो गौतम, आत्मा नाहीं काय?''
बुद्ध कांही बोलला नाहीं, व वत्सगोत्र उठून चालता झाला.

तेव्हा आनंद बुद्धाला म्हणाला "भगवंतानें वत्सगोत्राच्या प्रश्नाचें उत्तर कां दिलें नाही?''

बुद्ध म्हणाला "आनंद, मी जर आत्मा आहे काय? या प्रश्नाला आत्मा आहे असें उत्तर दिलें असतें, तर आत्मा नित्य मानणार्‍या श्रमणब्राह्मणाहून माझें मत भिन्न झालें नसतें, जर आत्मा नाहीं असें उत्तर दिलें असतें, तर जे श्रमणब्राह्मण देहात्मावादी आहेत, त्यांच्या मताहून माझें मत भिन्न झाले नसतें. रूपादि पंचस्कंध आत्मा नाहीं, सगळे धर्म अनात्मा आहेत असें मी सांगितले असतें, तर तें माझ्या मताला अनुरूप झालें असतें; परंतु त्यामुळें वत्सगोत्र घोटाळ्यांत पडला असतां. त्याला असें वाटलें असतें, कीं, पूर्वी माझ्या शरीरांत आत्मा म्हणून कांही पदार्थ होता. तो या बुद्धाच्या सांगण्याप्रमाणें नाहींसा झाला!''

(३०)
अंधांचे हस्तिवर्णन


एके वेळीं श्रावस्तीमध्ये नानामतांचें श्रमण ब्राह्मण एकत्र जमून आपापल्या मतासंबंधानें जोरानें भांडत होते. कोणी म्हणत होता, आत्मा शाश्वत आहे; पण त्याला दुसरा म्हणे, कीं, आत्मा अशाश्वत आहे. कोणी म्हणे, जगाचा अंत होणार; तर कोणी म्हणे, जगाचा अंत होणार नाही!

त्यांचें हें भांडण कांही भिक्षूंनी ऐकिलें, आणि जेतवनांत येऊन हें वर्तमान त्यांनी बुद्धाला सांगितलें.

बुद्ध म्हणाला, "भिक्षुहो, प्राचीनकाळीं या श्रावस्ति नगरींत एक राजा होऊन गेला. त्यानें आपल्या राजधानींत जेवढे जन्मांध होते तेवढे गोळा केले, व त्यांना हत्ती दाखवायला सांगितले. माहुतानें त्या जन्मांधांच्या झुंडींत हत्तीला आणून उभें केलें. त्यांनी हत्तीचा जो जो अवयव हाताला लागला, तो तो चांचपडून पाहिला. तेव्हां राजा त्यांनां म्हणाला, `कायहो, हत्ती तुम्ही पाहिलात काय?'

"'होय महाराज,' त्या जन्मांधांनी उत्तर दिलें.

"'तर मग आंधळेबुवा, हत्ती कसा आहे हें सांगाल काय?'

"ज्यानें हत्तीचें डोकें चांचपडून पाहिलें होतें, तो आंधळा पुढे सरसावला, आणि म्हणाला `महाराज, मी सांगतो हत्ती कसा आहे तो. पाण्याचा घडा असतो नाहीं, तसा आहे पहा!'

"इतक्यांत दुसरा आंधळा पुढें सरसावून म्हणाला "महाराज, हा कांही तरी भलतेंच सांगतो! खरें म्हणाल तर हत्ती सुपासारखा आहे.' यानें आणि याच्या साथीदारांनी हत्तीचे कानच चांचपडून पाहिले होते.

"पण ज्या आंधळ्यांनी हत्तीचे पाय चांचपडून पाहिले होते ते म्हणाले `महाराज, यांच्या बोलण्यांत कांही अर्थनाहीं! हे भलतेंच कांही तरी सांगत आहेत. खरें म्हणाल, तर हत्ती झाडाच्या बुंध्यासारखा आहे!'

"याप्रमाणे भिक्षुहो, ते आंधळे हत्तीच्या स्वरूपाचे भिन्नभिन्न प्रकारें वर्णन करून आपसांमध्यें भांडण करूं लागले, व परस्परांवर मुष्टिप्रहार करूं लागले. तें पाहून त्याल राजाला मौज वाटली. त्या आंधळ्यांप्रमाणें सध्या हे श्रमणब्राह्मण धर्माचें यथार्थ ज्ञान नसल्यामुळें माझाच धर्म खरा, तुझा धर्म खोटा, असें म्हणून भांडत आहेत!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel