[१३]
विचार करून विश्वास ठेवा


एकदां बुद्धगुरू धर्मप्रचारासाठीं कोसल देशामध्यें फिरत असतां कालाम नांवाच्या क्षत्रियांच्या गांवीं आला. भगवंताच्या आगमनाची वार्ता ऐकून कालामाचा मोठा समुदाय त्याच्या दर्शनाला गेला. कांहींजण बुद्धाला नमस्कार करून एका बाजूला बसले; कांहींजणांनीं आपलें नामगोत्र सांगितलें; कांहीं जण मुकाट्यानेंच एका बाजूस बसले; व कांहीं बुद्धाला कुशलप्रश्नादिक विचारून झाल्यावर बाजूला बसले.

हा सर्व विधि आटोपल्यावर कालामापैकीं जाणते लोक बुद्धाला म्हणाले "भगवन्, आमच्या गावीं पुष्कळ श्रमणब्राह्मण येत असतात. ते आपल्या मताची वाखाणणी करितात, व दुसर्‍याच्या मताची निंदा करितात. दुसरेही कांहीं श्रमणब्राह्मण येतात, आणि आपल्या मताची प्रौढि सांगून त्यांच्यापूर्वी आलेल्या श्रमणब्राह्मणांच्या मताची निंदा करितात. अशा वेळीं आम्हांला अशी शंका येते, कीं, या सर्वांत कोणाचें मत खरें, व कोणाचें खोटें? या श्रमणब्राह्मणांत सत्यवादी कोण व असत्यवादी कोण?"

बुद्धगुरू म्हणाला "कालामहो, मी जें कांहीं सांगणार आहें, तें परंपरेनें ऐकत आलों आहों म्हणून खरें मानूं नका; आपली पूर्वपरंपरा अशी आहे म्हणून खरें मानूं नका; हें असें असेल म्हणून खरें मानूं नका; हें आपल्या पवित्र ग्रंथांतहि आहे म्हणून खरें मानूं नका; हें अनुमानानें सिद्ध करितां येतें म्हणून खरें मानूं नका; असा हा लौकिक न्याय आहे म्हणून खरें मानूं नका; हें सुंदर दिसतें म्हणून खरें मानूं नका; आपल्या श्रद्धेला हें जुळतें म्हणून याजवर विश्वास ठेवूं नका; हा श्रमण प्रसिद्ध आहे अथवा हा आपणांला पूज्य आहे म्हणून माझ्या या भाषणावर विश्वास ठेवूं नका. पण कालामहो, जेव्हां तुमच्याच विवेकी बुद्धीनें माझा उपदेश तुम्हांला खरा वाटेल, तेव्हांच तुम्ही त्याचें ग्रहण करा. आतां मी तुम्हांला विचारतों, कीं, ज्या वेळीं मनुष्याच्या अंत:करणावर लोभाचा पगडा बसतो, त्या वेळीं त्याला आत्महित किंवा परहित समजणें शक्य आहे काय?"

"नाहीं भगवन्." असें कालामांनीं उत्तर दिलें.

बुद्ध पुढें म्हणाला "आतां कालामहो, मी तुम्हांला असें विचारतों, कीं, मनुष्याचें अंत:करण जर अलोभानें (परोपकारबुद्धीनें) भरून गेले, अद्वेषानें (मैत्रीनें) भरून गेलें, आणि अमोहानें (ज्ञानानें) भरून गेलें, तर त्यापासून हित होईल कीं अहित होईल?"

"हित होईल," असें कालामांनीं उत्तर दिल्यावर बुद्धगुरू म्हणाला "कालामहो, ज्याचें अंत:करण लोभाभिभूत झालें नसेल, तो निर्लोभी मनुष्य लोभामुळें प्राणघात करीत नाहीं; चोरी करीत नाहीं; व्यभिचार करीत नाहीं; खोटें बोलत नाहीं, आणि हीं पापें करण्यास दुसर्‍यालाहि उत्तेजन देत नाहीं. तसाच अद्वेष्टा आणि ज्ञानी मनुष्य द्वेषामुळें किंवा अज्ञानामुळें पापाचरण करीत नाहीं, व इतरांनां पापाचरणासाठीं उत्तेजन देत नाहीं. लोभ, द्वेष आणि मोह, हीं पापाचीं मूलें आहेत; अलोभ, अद्वेष आणि अमोह हीं पुण्यांचीं मूलें आहेत. कालामहो, लोभादिकांपासून हानि होते किंवा नाहीं, हीं तीन पापाचीं मूलें आत्मपर घाताला कारण होतात किंवा नाही, व यांमुळें जगामध्यें दु:ख वाढतें किंवा नाहीं, याचा तुम्हीं नीट विचार करून जेव्हां तुमच्या बुद्धीला हे मनोधैर्य त्याज्य आहेत असें वाटेल, तेव्हांच तुम्ही त्यांचा त्याग करा. केवळ हा उपदेश तुमच्या परंपरागत आलेल्या दृष्टीला पटतो इत्यादि करणांनीं या माझ्या उपदेशाचा तुम्ही स्वीकार करूं नका. अलोभ, अद्वेष आणि अमोह हे तीन मनोधर्म पुण्याचीं मूलें आहेत असें मीं सांगितलें, याचाहि नीट विचार करून, कालामहो, जेव्हां तुमच्या बुद्धीला हे मनोधर्म आत्मपरहितकारक आहेत, जगामध्यें यांजमुळें सुखाची अभिवृद्धि होते, असें खात्रीनें वाटेल, तेव्हांच हे मनोधर्म पूर्णतेला जातील असा प्रयत्न करा.

"कालामहो, ज्या आर्यश्रावकाच्या मनांतून लोभ, द्वेष आणि मोह या तीन मनोवृत्ति नष्ट झाल्या, तो चारी दिशांतील प्राणिमात्रावर मैत्रीभावना करावयाला समर्थ होतो; आपल्या मैत्रचित्तानें चोहोंदिशांमधील प्राण्यांवर तो प्रेम करितो, त्याचप्रमाणें करुणा, मुदिता आणि उपेक्षा या भावनांचाहि त्याला सहज लाभ होतो. कालामहो, या चार भावनांच्या योगें ज्याचें चित्त सर्व प्रकारच्या वैरांपासून मुक्त झालें असेल, त्याच्या मनाला चार त-हांनीं धैर्य येतें. तो असा विचार करितो, कीं, (१) जर परलोक असेल, तर माझ्या या सुकर्मामुळें मला सुगतिच मिळाली पाहिजे; (२) जर परलोक नसेल, तर मी याच जगामध्यें कोणत्याहि प्राण्याचें वैर न करतां मोठ्या आनंदानें रहातों; (३) जर पापी मनुष्याला पापाबद्दल शिक्षा भोगावी लागते, हा सिद्धांत खरा असेल, तर मी कधींहि पाप करीत नसल्यामुळें शिक्षाहि भोगण्याचा मजवर प्रसंग येणार नाहीं; (४) जर आपल्या पापाचें फल आपणाला मिळतेंच असें नसून तें दुसर्‍या कोणाला तरी भोगावें लागतें, हा सिद्धान्त खरा असेल, तर माझ्या सदाचरणामुळें मी माझेंच नव्हे, तर इतर जनाचेंहि कल्याण करितों!"

बुद्धाचा उपदेश श्रवण करून कालामांनां अत्यंत आनंद झाला, व त्या दिवसापासून ते बुद्धाचे उपासक झाले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel