[७]
तेमियजातक

प्राचीन काली वाराणसीनगरीमध्यें काशीराजा नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या पट्टराणीला नवनवसांनी पुत्रलाभ झाला, तेव्हां राजा अतिशय प्रसन्न होऊन त्यानें आपल्या पट्टराणीला-चंदादेवीला-वर मागण्यास सांगितले. तिने राजाचा वर स्वीकारला, परंतु जें कांही मागावयाचें ते त्याच वेळी न मागतां, पुढें प्रसंग पडला, म्हणजें, मागेन, असे सांगितलें. राजाला ही गोष्ट पसंत पडली.

तदंतर राजानें आपल्या राज्यांतील ज्योतिषी ब्राह्मणांना बोलावून आपल्या मुलाचें जातक वर्तविण्यास सांगितलें.
ब्राह्मण आपली पंचागें नीट तपासून राजाला म्हणाले “आपला हा पुत्र मोठा पुण्यशाली होणार आहे. हा चक्रवर्ती राजा होण्यास योग्य आहे. असा सर्वगुणसंपन्न पुत्र आपणाला लाभल्याबद्दल आम्हांला फार आनंद होत आहे.”

राजानें संतुष्ट होऊन त्या ब्राह्मणांनां अनेक दानें दिली, व त्यांच्या सांगण्याप्रमाणें आपल्या पुत्रांचे नाव तेमिय असे ठेविलें.
तेमिय लहान असतां राजसभेमध्यें आपल्या पिताच्या मांडीवर खेळत असे. एक दिवशी काशीराजानें आपल्या सिंहासनावर बसून चार माणसांना भयंकर शिक्षा ठोठावल्या. ते पाहून तेमियकुमाराचें मन अत्यंत उद्विग्न झलें. तो आपल्याशीच म्हणाला “हे सिंहासन म्हणजे पापाची भूमिच होय. चोरानें लहानसान चोरी केली असतां त्याला सिंहासनावर बसून राजेलोक मोठा भयंकर दंड करितात आणि आपण लोकांचे हितकर्तें आहों, असें समजतात. परंतु पोटासाठी लहानसान चोर्‍या करणार्‍या माणसाचा न्याय करण्यास वज्रजडित सोन्याच्या सिंहासनावर बसणार्‍या आणि मोठमोठ्या राजवाड्यांत विहार करणाऱया राजाला अधिकार आहे काय? राष्ट्रांतील लोकांचे दारिद्र्य वाढण्याला राजाच्या या चैनीच कारणीभूत होत नाहीत काय? दारिद्र्यानें पीडित होऊन एकाद्यानें चोरी केली, तर त्याला दंड करण्याचा अधिकार राजाला किंवा राजघराण्यातील मनुष्याला कसा पोहोचतो?”

तेमियकुमाराला राजवाडा तुरुंगासारखा वाटू लागला, व आपण येथून कधी निसटून जाऊं असें त्याला झाले: परंतु आईबापांची आज्ञा मोडल्यावाचून या कारागृहांतून पार पडण्याचा उपाय त्याला सुचेना.

राजवाड्यामध्यें रहात असलेली देवता पूर्वजन्मी तेमियकुमाराची आई होती. तेमिय कुमाराला दु:खाने पोळलेला पाहून तिला अत्यंत वाईट वाटले; आणि ती त्याला म्हणाली “कुमार! तूं इतका शोकाकुल का दिसतोस?”

तेमियकुमारानें आपल्या शोकाचे कारण सांगितल्यावर ती म्हणाली “तूं घाबरू नकोस. शहाणपणा न दाखवितां वेडेपणानें वागशील, तर तुझे आप्तइष्ट आपण होऊनच तुला येथून घालवून देतील.”

तेमिय म्हणाला “हे देवते! तुझ्या वचनावर विश्वास ठेवून मी त्याप्रमाणें वागतो. त्या राजवाड्यामध्ये तूच काय ती माझी हितचिंतक आहेस.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel