वैदेहराजाला महौषधाला घालवून दिल्याबद्दल अत्यंत दु:ख झालें होतें. संकटसमयीं महौषधाचा कसा उपयोग होतो, हें तो विसरला नव्हता. महौषधानें आपल्याबरोबर पांचालदेशास यावें, अशी त्याची उत्कट इच्छा होती. तेव्हां महौषधाच्या या निरोपानें त्याला अत्यंत आनंद झाला, आणि त्यानें महौषधाला बोलावून आणून पांचालदेशाला जाऊन आपल्या गमनाची सर्व सिद्धता करण्यास आज्ञा केली.

महौषध राजाच्या हुकमाप्रमाणें आपले निवडक लोक बरोबर घेऊन पांचालदेशास गेला. जातांना वाटेंत एकेका योजनाच्या अंतरावर त्यानें चौक्या बसविल्या. या चौक्यांवर कांहीं घोडेस्वार व हत्ती ठेवण्यांत आले होते. पांचालांची राजधानी गंगेच्या कांठीं होती. महौषधानें आपल्या राजाला उतरण्यासाठीं घरें बांधण्यास लागणारें लांकूडसामान वगैरे आणण्याच्या मिषानें गंगेमध्यें तीनशें होड्या सज्ज ठेविल्या.

हा सगळा बंदोबस्त केल्यावर तो मोठ्या लव्याजम्यासह ब्रह्मदत्तराजापाशीं गेला, आणि त्याला म्हणाला "महाराज, माझ्या धन्यांनीं मला येथें पाठविलें आहे. आपल्या कन्येबरोबर विवाह करण्यासाठीं ते येथें येणार आहेत; परंतु त्यापूर्वी त्यांच्या दर्ज्याला साजेल, असें एक निवासस्थान तयार करण्यासाठीं मला त्यांनीं पाठविलें आहे. आपण जर परवानगी द्याल, तर विलंब न करतां मी या कामाला लागतों."

ब्रह्मदत्ताला वैदेहराजा आपल्या राज्यांत येतो, हें वर्तमान ऐकून अत्यंत हर्ष झाला, व तो महौषधाला म्हणाला "वैदेहराजानें तुम्हाला पुढें पाठविलें, हें फारच उत्तम केलें. तुमच्यासारखा हुशार मनुष्य विरळा. तुम्ही आपल्या राजाची यथोयोग्य व्यवस्था लावाल, अशी माझी खात्री आहे. माझ्याहि तर्फे तुमच्या राजाचें अभिनंदन करण्यासाठीं मी तुम्हालाच प्रतिनिधि नेमतों. त्याचा योग्य मान ठेवण्यासाठीं जी कांहीं मदत लागेल, ती देण्यास मी तयार आहे."

महौषध म्हणाला "महाराज, सध्यां मला दुसर्‍या कशाचीहि गरज नाहीं. आमच्या वैदेहराजाच्या वसतिस्थानासाठीं तेवढी सोईवार जागा द्या म्हणजे झालें. गवंडी, मजूर वगैरे सर्व लोक मी मजबरोबर आणिले आहेत. जंगलांतून लांकडें आणण्यासाठीं आमच्या होड्या गंगानदींत फिरत आहेत. आम्हांला जरूर लागली, तर तेवढ्या विटा मात्र आपल्या लोकांकडून पुरविण्यांत याव्या."

ब्रह्मदत्तानें महौषधाला जेवढ्या विटा लागतील, तेवढ्या पुरविण्याचा ताबडतोब हुकूम केला, व योग्य वाटेल ती जागा निवडण्यास महौषधाला परवानगी दिली. महौषधानें गंगेच्या आणि ब्रह्मदत्ताच्या प्रासादाच्या दरम्यान एक जागा पसंत करून तेथें आपल्या राजासाठीं व त्याच्याबरोबर येणार्‍या इतर लोकांसाठीं घरें बांधण्यास सुरुवात केली. प्रथमत: महौषधानें आपण पसंत केलेल्या जागेसभोंवतीं तट बांधला, व नंतर आंतील घरें तयार केलीं. हें काम पुरें झाल्यावर त्यानें राजाला निरोप पाठविला, व त्याप्रमाणें वैदेहराजा आपल्या प्रधानांसहवर्तमान मोठ्या लवाजम्यानिशीं पांचालांच्या राजधानीला येऊन दाखल झाला.

ब्रह्मदत्तानें वैदेहराजाचा आदरसत्कार चांगला केला. चांगल्या मुहूर्तावर विवाहविधि उरकून घेण्याचा बेत ठरला. दोन दिवस ब्रह्मदत्ताचा पाहुणचार घेत वैदेहराजा महौषधानें बांधिलेल्या भवनामध्यें मोठ्या चैनीनें रहात होता. परंतु तिसर्‍या दिवशीं रात्रीं आपल्या वाड्याला ब्रह्मदत्ताच्या सैन्यानें एकाएकीं वेढा दिल्याचें त्याला आढळून आलें. ती समुद्रासारखी अफाट सेना पाहून वैदेहराजाचें धैर्य गळालें. ब्रह्मदत्तराजानें फसवून आपणाला येथें आणलें, हें त्याच्या आतां लक्ष्यांत आलें. या संकटांतून मुक्त कसें होतां येईल, हें त्याला समजेना. त्यानें आपल्या मंत्र्यांनां ताबडतोब बोलावून यांतून पार पडण्याचा उपाय शोधून काढण्यास सांगितलें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel