रसक नावाचा त्याचा एक मुख्य स्वयंपाकी होता, तो उपोसथाच्या पूर्वदिवशीच राजासाठी मांस विकत आणून ठेवीत असे व ते उपोसथाच्या दिवशी शिजवून राजाला वाढीत असे.

एके दिवशी रसकानें आणलेलें मांस राजाच्या पाळीव कुत्र्यानें खाऊन टाकलें. रसकाला उपोसथाच्या दिवशी मांस कोठून आणावें याची पंचाईत पडली. मांस नसलें तर राजा अन्नग्रहण करणार नाही, आणि आपणाला मोठी शिक्षा ठोठावील, अशीहि त्याला भीति पडली. पुष्कळ विचारांती त्याला एक भयंकर युक्ति सुचली! उपोसथाच्या पूर्वदिवशी एका लठ्ठ चोराला फांशी देण्यांत येऊन त्याचें प्रेत स्मशानांत उघड्या जागी फेकण्यांत आलें होतें. रसकानें तेथे जाऊन त्याचें मांस आणून लपवून ठेविलें व दुसर्‍या दिवशी राजाला त्याचे उत्तम पक्वान्न बनवून घातले!

ब्रह्मदत्तराजा पूर्वजन्मी मनुष्यमांसभक्षक यक्ष होता. त्यामुळे त्याला रसकानें तयार केलेले मनुष्यमांसाचे पक्वान्न फारच आवडलें. तो रसकाला म्हणाला “हे रसक! आजपर्यंत मी अशा प्रकारचें मांस सेवन केले नाही. हे कोणत्या प्राण्याचें मांस आहे हे सांग.”

रसक भयानें थरथर कापू लागला. त्याच्या तोंडांतून शब्द निघेना. तेव्हा ब्रह्मदत्त त्याला म्हणाला “अरें, असा घाबरू नकोस. जो काही खरा प्रकार असेल, तो सांग. तुला मी अभयदान देत आहे.”

राजाकडून अभय मिळाल्यावर रसकानें घडलेला खरा प्रकार राजाला सांगितला. तेव्हा राजा म्हणाला “रसक, आजपासून तूं मला दुसरें कोणतेंहि मांस न वाढता मनुष्यमांसच आणून घाल! परंतु राजा मनुष्यमांस सेवन करितो, हे वर्तमान मात्र कोणालाहि कळू देऊ नकोस. जर का ही गोष्ट बाहेर फुटली, तर मी तुला देहान्तशासन करीन.”

रसक म्हणाला “महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणें वागण्यास मी तयार आहे; परंतु रोज मनुष्यमास आणावें कुठूंन?”
राजा म्हणाला “अरें, तुरुंगामध्यें पुष्कळ कैद्यांना फांशी देण्यात येत आहे. तेथून तूं मांस आणीत जा.”

राज्याच्या हुकुमाप्राणें रसक बंधनागारांतून कोणाला न कळत नरमांस घेऊन येत असे, परंतु तेथील गुन्हेगार लवकरच खलास झाले. राजाला तर नरमांसाची इतकी चट लागली होती, की, एक दिवस देखील तें न मिळाल्यास त्याचा जीव तळमळत असे.
एके दिवशी रसक राजाला म्हणाला “आतां यापुढें तुरुंगातून आपणाला रोजचें मास मिळण्याचा संभव नाही. तेव्हा पुढें काय करावें!”

राजा म्हणाला “रसक! एवढी काळजी करण्याचें कांही कारण नाही. संध्याकाळी चौघडा सुरू झाल्यावर तूं एकाद्या बारीकशा गल्लींत जाऊन दडून बैस, व तेथें एकादा लठ्ठ पुरुष किंवा स्त्री आढळली, म्हणजे तिला मारून मांस घेऊन येत जा.”

तेव्हापांसून रसकानें राजाज्ञेप्रमाणें रात्री माणसांना मारून राजाची तृप्ति करण्याचा क्रम चालविला. परंतु रसकाच्या या कृत्यामुळे शहरांत एकच गडबड उडून गेली. कोणी म्हणे ‘गेल्या रात्री माझा भाऊ मारला गेला,’ तर कोणी म्हणे ‘माझी बहीण मारली गेली!’ कोणी म्हणे ‘एकादा वाघ शहरात येत असावा’, तर दुसरा म्हणें ‘हे कांम सिंहाचे असेल’ शेवटी काही विचारी गृहस्थांनी रस्त्यांत सांपडलेली प्रेते तपासून पाहिली व त्यांच्या अंगावर आढळलेल्या जखमांवरून त्यांनी असे अनुमान काढलें की, हे काम वाघाचें किंवा सिंहाचे नसून कोणातरी नरमांसभक्षक चोराचेच असले पाहिजे.

दुसर्‍या दिवशी सर्व नागरिक राजवाड्याबाहेर जमून त्यांनी या चोराला पकडून ठार मारण्याविषयी राजाला अर्ज केला.
राजा म्हणाला “मी चोराला कसा पकडू शकेन? मी काही नगररक्षणाचें काम करीत नाही!’’
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel