वैदेहराजाने आपले प्रधान आणि ब्रह्मदत्ताचे कुटुंब यांसहवर्तमान महौषधे तयार ठेवलेल्या नौकेंत बसून मिथिलेचा मार्ग धरला.
इकडे ब्रह्मदत्त वैदेहाच्या वाड्याजवळ येऊन ठेपला, आणि सकाळ झाल्याबरोबर वाड्यांत शिरून वैदेहराजाला आणि त्याच्या प्रधानाला जीवंत पकडून आणण्याचा त्यानें आपल्या लोकांना हुकूम केला. महौषध पहाटेस, उठला व स्नान वगैरे करून माडीवरील दालनांत येऊन बसला. ब्रह्मदत्तराजानें केलेला हुकूम ऐकून तो गच्चीवर येऊन ब्रह्मदत्ताला म्हणाला “महाराज, आपली ही वल्गना व्यर्थ आहे! आपण आपलें धनुष्यबाण खाली ठेंवा. आपल्या कवचाचेंहि येथे काही प्रयोजन नाही!”
ब्रह्मदत्त म्हणाला “तुझा चेहरा प्रसन्न दिसतो, आणि तूं हंसतहंसत बोलत आहेस. कदाचित मरणापूर्वी मुष्याची ही स्थिति होत असावी!”

बोधिसत्व म्हणाला “महाराज, आपली गर्जना व्यर्थ आहे! वैदेहराजा रात्रीच गंगा उतरून आपल्या देशाला चालता झाला आहे. आपण त्वरा केली, तरी त्याचा पाठलाग करणें आपल्याला शक्य नाही.”

ब्रह्मदत्त अत्यंत क्रोधायमान होऊन आपल्या लोकांना म्हणाला “प्रथमत: याला पकडून याचे हातपाय आणि नाककान कापून टाका. याच लबाडानें वैदेहराजाला येथून पळवून लाविले.”

महौषध म्हणाला “आपण जर हातपाय कापून माझे हाल केले, तर वैदेहराजा आपल्या कुटुंबांचे असेच हाल करील! प्रथमत: आपण राजवाडयांत जाऊन येथे आपली मंडळी आहे की नाही पहा. मी त्यांना रात्रीच वैदेहराजाच्या स्वाधीन केले आहे!”
ब्रह्मदत्ताला महौषधाच्या भाषणांचें अत्यंत आश्चर्य वाटलें. आम्ही यांना चारी बाजूंनी वेढले असता माझे कुटुंब याच्या हाती गेले कसे? तथापि महौषधाचें भाषण अगदीच खोटे म्हणता येईना. कांकी, महौषध मोठा धोरणी माणूस, तो आपल्या बुद्धीच्या जोरावर सामान्य मनुष्याला अत्यंत विलक्षण भासणार्‍या गोष्टीदेखील घडवून आणूं शकेल! म्हणून ब्रह्मदत्तानें आपले दूत राजवाडयांतील वर्तमान आणण्यासाठी पाठविले. त्यांनी बातमी आणिली, की, राज्याच्या कुटुंबांतील चारहि माणसें घाबर्‍याघाबर्‍या रात्रीच राजवाडयांतून निघून गेली.

हे वर्तमान ऐकून ब्रह्मदत्ताचा क्रोध जागच्या जागींच निवाला. त्यानें आपले धनुष्यबाण खाली ठेवलें, आणि तो महौषधाला म्हणाला “तुझ्या चातुर्याविषयी मला कधीहि शंका आली नाही. पण राजवाड्यांतील माझी मंडळी तुझ्या हाती कशी लागली, हे मला सांग.”

बोधिसत्वानें माडीवरून खाली उतरून ब्रह्मदत्ताला आपण केलेल्या बोगद्यामध्ये नेले व तेथील सर्व शोभा त्याला दाखवून तो म्हणाला “महाराज, आज दोनतीन महिने सतत खपून वैदेहराजाला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षितपणे निघून जाण्यासाठी हा मार्ग मी तयार केला आहे.”

ब्रह्मदत्ताला बोधिसत्वाच्या धोरणाचेचं नव्हे, तर शिल्पकलाविज्ञानाचेंहि अत्यंत आश्चर्य वाटलें! त्यानें दोन्ही उन्मार्ग तपासून पाहिले,  त्यांतील रचना पाहून आश्चर्यचकित होऊन तो महौषधाला म्हणाला “हे महौषध! तुला मी येथून जाऊ देणार नाही. तूं यापुढें माझ्याचजवळ राहिले पाहिजे. मी तुला मुख्य प्रधानाची जागा देतो. तुझ्यासारखा चतुर माणूस पदरी असणें हे राष्ट्राचें मोठे भाग्य होय!”

महौषध म्हणाला “वैदेहराजा जीवंत असेपर्यंत मला दुसर्‍या राजाची सेवा करता येणार नाही. कारण, त्याचें अन्न मी पुष्कळ दिवस खात आलो आहें. परंतु आपणाला कोणतीहि अडचण पडली असतां मी आपल्या मदतील येत जाईन. आता वैदेहाचें आणि आपले नाते जडलेच आहे; तेव्हा आमचा संबंध निकट होईल व त्यामुळे विदेहांची आणि पाचांलांची मैत्री वृद्धिंगत होत जाईल, अशी मी आशा करतो.”

ब्रह्मदत्तानें महौषधाला मोठी देणगी दिली, व मोठ्या लवाजम्यानिशी परत मिथिलेला पाठविले. वैदेहराजानेंही महौषधाचा बहुमान केला. महौषध सुखरूप आल्याबद्दल मिथिलेमध्ये सात दिवसपर्यंत मोठा उत्सव करण्यात आला. याप्रमाणें वैदेह आणि ब्रह्मदत्त या दोन्ही राजांची मर्जी संपादून बोधिसत्वानें दोन्ही राष्ट्रांचे परिमित कल्याण केले.

या जन्मांत लोकहितासाठी आपल्या बुद्धीचा सद्वय करून बोधिसत्वानें प्रज्ञापारमितेचा अभ्यास केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel