(१) प्रासादाच्या छायेंत चंक्रमण करीत असतांना नरोत्तमाला पाहून मी तिकडे गेलों, आणि त्याला वंदन केलें. (२) चीवर एका खांद्यावर करून व हात जोडून त्या विशुद्ध, सर्वसत्त्वोत्तमाच्या मागोमाग मीहि चंक्रमण करूं लागलों. (३) तेव्हां त्या कुशल प्रश्न विचारणार्‍यानें मला प्रश्न विचारले आणि न घाबरतां आणि न भितां मी त्या गुरूला उत्तरें दिलीं. (४) प्रश्नांचीं उत्तरें दिल्याबद्दल तथागतानें माझें अभिनंदन केलें, व भिक्षुसंघाकडे वळून तो म्हणाला, (५) “ज्या अंगाचें आणि मगधांचें चीवर, पिण्डिपात, भैषज्य आणि शयनासन हा स्वीकारतो, तो त्यांचा मोठाच फायदा समजला पाहिजे. जे याचा मानमतराब राखतात, त्यांनांहि फायदा होतो. (६) सोपाक, तूं आजपासून माझ्या भेटीला येत जा; व हीच तुझी उपसंपदा झाली असें समज.” (७) सात वर्षांचा असतांना मला उपसंपदा मिळाली. आणि आतां मी हें अंतिम शरीर धारण करीत आहे. धन्य धर्माचें सामर्थ्य !

७७
सुनीत

हा भंग्याच्या कुळांत जन्मला. थेर गाथेच्या बाराव्या निपातांत ह्याच्या गाथा आहेत, त्यांतच ह्याचें चरित्र आलें आहे. त्या गाथा अशा :-

नीचे कुलम्हि जातो हं, दळिद्दो अप्पभोजनो।
हीनं कम्मं ममं आसि अहोसिं पुप्फछड्डको।।१।।
जिगुच्छितो मनस्सानं परिभूतो च वाम्भितो।
नीचं मनं करित्वान वन्दिसं बहुकं जनं।।२।।
अथद्दसासिं सम्बुद्धं भिक्खुसंघपुरक्खतं।
पविसन्तं महावीरं मगधानं पुरुत्तमं।।३।।
निक्खिपित्वान व्याभङ्मिं वन्दितुं उपसंकमिं।
ममेव अनुकम्पाय अट्ठासि पुरिसुत्तमो।।४।।
वन्दित्वा सत्थुनो पादे एकमन्तं ठितो तदा।
पब्बज्जं अहमायाचिं सब्बसत्तानमुत्तमं।।५।।
ततो कारुणिको सत्था सब्बलोकानुकम्पको।
एहि भिक्खूति मं आह सा मे आसूपसम्पदा।।६।।
सोहं एको अरञ्ञस्मिं विहरन्तो अतन्दितो।
अकासिं सत्थु वचनं यथा मं ओवदी जिनो।।७।।
रत्तिया पठमं यामं पुब्बजातिं अनुस्सरिं।
रत्तिया मज्झिमं यामं दिब्बचक्खुं विसोधितं।
रत्तिया पच्छिमे यामे तमोखन्धं पदालयिं।।८।।
ततो रत्या विवसने सुरियस्सुग्गमनं पति।
इन्दो ब्रह्मा च आगन्त्वा मं नमस्सिंसु पञ्जली।।९।।
नमो ते पुरिसाजञ्ञ, नमो ते पुरिसुत्तम।
यस्स ते आसवा खीणा दक्खिणेय्योसि मारिस।।१०।।
ततो दिस्वान मं सत्था देवसंघपुरक्खतं।
सितं पातुकरित्वान इमं अत्थं अभासथ।।११।।
तपेन ब्रह्मचरियेन संयमेन दमेन च।
एतेन ब्राह्मणो होति एतं ब्राह्मणमुत्तमं।।१२।।


(१) मी नीच कुळांत जन्मलों, मी दरिद्री होतों आणि खाण्यापिण्याचे माझे हाल होत असत. माझा धंदा हलकट होता; मी भंगी होतों. (२) लोक माझा कंटाळा करीत, तिरस्कार करीत व निंदा करीत. तरी मीं नम्र मनानें किती तरी लोकांना नमस्कार करीत असें. (३) अशा स्थितींत भिक्षुसंघासहवर्तमान मगधांच्या श्रेष्ठ नगरांत प्रवेश करणार्‍या महावीर संबुद्धाला मीं पाहिलें. (४) मी कावड १ खालीं टाकली, आणि नमस्कार करण्यास पुढें सरसावलों.  केवळ माझ्या अनुकंपेनें तो पुरुषश्रेष्ठ उभा राहिला. (५) त्या गुरूच्या पायां पडून एका बाजूला उभा राहून त्या सर्व सत्त्वोत्तमाजवळ मीं प्रव्रज्या मागितली. (६) तेव्हां सर्व लोकांवर अनुकंपा करणारा तो कारुणिक गुरु ‘भिक्षु इकडे ये,’ असें मला म्हणाला, तीच माझी उपसंपदा झाली. (७) तो मी एकाकी सावधपणें अरण्यांत राहिलो, व जसा त्या जिनानें मला उपदेश केला, त्याप्रमाणें त्या गुरुच्या वचनाला अनुसरून वागलों. (८) रात्रीच्या पहिल्या यामांत पूर्वजन्माची आठवण करण्यास मी समर्थ झालों. रात्रीच्या मध्यमयामांत मला दिव्यदृष्टि प्राप्त झाली, व रात्रीच्या पश्चिमयामांत मीं तमोराशीचा (अविद्येचा) नाश केला. (९) तदनंतर रात्र संपत आली असतां व सूर्योदय जवळ आला असतां इंद्र आणि ब्रह्मा येऊन मला नमस्कार करून हात जोडून उभे राहिले. (१०) (ते म्हणाले,) “हे दान्त पुरुषा, तुला नमस्कार असो. हे पुरुषोत्तमा, तुला नमस्कार असो. ज्या तुझे आसव क्षीण झाले आहेत, तो तूं, हे मित्रा, दक्षिणार्ह आहेस. (११) नंतर देवसंघानें माझा आदरसत्कार केलेला त्या गुरूनें पाहिला, आणि स्मित करून तो असें बोलला. (१२) “तपानें, ब्रह्मचर्यानें, संयमानें आणि दमानें - ह्यायोगें ब्राह्मण होतो, हेंच ब्राह्मण्य उत्तम आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
१-प्राचीन काळीं शहरांतील घाण भंगी लोक कावडींत भरून नेत असत. ही पद्धत अद्यापि नेपाळांत चालू आहे. चिनी लोकहि मैला नेण्यासाठीं कावडीचाच उपयोग करतात.
------------------------------------------------------------------------------------------------------------
समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel