का० :- पण गृहपति, हें सांग कीं, तुला बुद्धोपासक होऊन किती वर्षे झालीं?

चित्र :- मलाहि उपासक होऊन तीस वर्षें झालीं.

का० :- बरें ह्या तीस वर्षांत तूं तरी कांहीं मिळविलें आहेस काय?

चित्र :- ह्यांत काय संशय? मी वाटेल तेव्हां चारहि ध्यानें मिळवूं शकतों. (येथें चित्रानें चार ध्यानें कशीं मिळवितां येतात हें सांगितलें.)

चित्र गृहपतीचें भाषण ऐकून अचेल काश्यप प्रसन्न झाला; व बुद्धधर्मांत प्रव्रज्या मागूं लागाला. चित्रानें त्याला स्थविरभिक्षूंजवळ नेऊन उपसंपदा देवविली. कांहीं काळानें काश्यप अर्हत्पदाला पावला.

(३) चित्रगृपति पराकाष्ठेचा आजारी होता. तेव्हां पुष्कळ देवता एकत्र जमून त्याला म्हणाल्या, “गृहपति, पुढच्या जन्मीं चक्रवर्ती राजा होईन, अशी इच्छा धर.”

चित्र त्यांना म्हणाला, “तेंहि (चक्रवर्तिपदहि) अनित्य आहे, तेंहि टाकून जावें लागतें.”

तो बडबडतो आहे, असें वाटून चित्राचे आप्तइष्ट म्हणाले, “आर्यपुत्र, ताळ्यावर ये. बडबड करूं नकोस.”

चित्र :- असें तुम्ही कां म्हणतां?

ते :- तूं म्हणतोस कीं, तेंहि अनित्य आहे, तेंहि टाकून जावें लगतें.

जेव्हां चित्रानें आपल्या नातलगांना देवतांशीं झालेलें आपलें संभाषण समजावून सांगितलें, तेव्हां आपणालाहि उपदेश करण्याची त्यांनी चित्राला विनंति केली. बुद्ध, धर्म आणि संघ ह्यांच्यावर श्रद्धा ठेवण्यासाठीं व यथाशक्ति सत्पुरुषांना दान देण्यासाठीं सर्वांना उपदेश करून चित्रगृहपतीनें प्राण सोडला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel