६८. बुद्ध भगवान कौशांबी येथे घोषितारामांत रहात होता. त्या काळीं आयुष्मान् छन्नाच्या उपस्थायक महामात्रानें छन्नासाठीं एक विहार करविला. छन्न त्या विहारावर एकामागून एक आच्छादन घालूं लांगला व त्याच्या भिंतीला पु्न्हां पुन्हां गिलावा करूं लागला. त्यामुळें भार जास्त होऊन विहार पडूं लागला. छन्नाने त्याच्या दुरुस्तीसाठीं तृणकाष्ठ गोळा करीत असतां एका ब्राह्मणाचें जवाचें शेत (यवक्षेत्र) खराब केलें. तेव्हां तो ब्राह्मण भिक्षूंवर टीका करूं लागला. अनुक्रमें ही गोष्ट भगवंताला समजली. त्याने छन्नाचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

मोठा विहार करविणार्‍या भिक्षूनें दरवाजाच्या बाजूला अर्गल ठेवण्याच्या जागेपर्यंत व खिडक्यांच्या बाजूला गिलावा करणासाठीं आणि दोनतीनदां छप्पर घालण्यासाठीं जेथें धान्यदिक नसेल अशा जागीं राहून प्रयत्न करावा. त्यापेक्षां जास्त-धान्यादिक नाहीं अशा जागीं राहून देखील-गिलावा करण्याचा किंवा छप्पर घालण्याचा प्रयत्न करील, त्याला पाचित्तिय होतें ।।१९।।

६९. बुद्ध भगवान् आळवी येथें अग्गाळव चेतियांत रहात होता. त्या काळीं आळवी येथील भिक्षु बांधकाम करवितांना प्राणी असलेल्या पाण्यानें गवत व माती भिजवीत असत व भिजवावयास लावीत असत. ही गोष्ट सज्जन भिक्षूंना आवडली नाहीं..आणि भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु जाणूबुजून प्राणी असलेल्या पाण्यानें गवत किंवा माती भिजवील किंवा भिजवावयास लावील, त्याला पाचित्तिय होतें ।।२०।।

७०. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं स्थविर भिक्षु भिक्षुणींला उपदेश करीत असत, व त्यामुळें त्यांना चीवरपिंडपातादिकांचा लाभ होत असे. तें पाहून षड्वर्गीय भिक्षूंना भिक्षुणींना उपदेश करणें कायदेशीर आहे असें वाटलें, व भिक्षुणींजवळ जाऊन ते त्यांना म्हणाले, “ भगिनीनों, आम्ही राहतों तिकडे येत जा; म्हणजे आम्हीहि तुम्हाला उपदेश करूं.” जेव्हां त्या भिक्षुणी षड्वर्गियांजवळ गेल्या, तेव्हां त्यांनीं त्यांना धर्मोपदेश फार थोडा केला, आणि वायफळ गोष्टी पुष्कळ सांगितल्या. तेथून त्या भगवंताच्या दर्शनाला गेल्या; व भगवंतानें प्रश्न केल्यावरून त्यांनीं घडलेली गोष्ट सांगितली. ह्या प्रकरणीं भगवंतानें भिक्षूंना एकत्र जमविलें, व षड्वर्गियांचा निषेध केला; आणि भिक्षुणींना उपदेश करणारा भिक्षु पद्धतीप्रमाणें संघानें निवडावा असा नियम केला. संघानें निवडलेल्या भिक्षूनें भिक्षुणींस उपदेश करावा अशी अनुज्ञा देऊन भगवंतानें खालील नियम घालून दिला:-

संघानें निवड केल्यावांचून जो भिक्षु भिक्षुणींना उपदेश करील त्याला पाचित्तिय होतें ।।२१।।

षड्वर्गीय भिक्षु भगवंतानें हा नियम केला आहे म्हणून आपणांपैकी कोणाला तरी निवडून भिक्षुणींना उपदेश करावयाला लावीत असत. तेव्हां त्यांचा निषेध करून भगवान् भिक्षूंना म्हणाला, “भिक्षुहो, (१) जो भिक्षु शीलवान् असेल, (२) बहुश्रुत असेल, (३) ज्याला भिक्षुप्रातिमोक्ष आणि भिक्षुणीप्रातिमोक्ष तोंडपाठ असतील, (४) जो उत्तम वक्ता असेल, (५) भिक्षुणींना ज्याचा उपदेश आवडत असेल, (६) जो समर्थ असेल, (७) प्रव्रज्या घेतल्यापासून ज्याच्या हातून संघादिशेषासारखी आपत्ती घडली नसेल, व (८) जो वयानें वीस वर्षांहून अधिक असेल, त्यालाच भिक्षुणींना उपदेश करण्यासाठी निवडण्यांत यावें. ह्या आठ गुणांनीं समन्वित असेल त्याला भिक्षुणींस उपदेश करण्यासाठीं निवडावें अशी अनुज्ञा देतों.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel