५९
हत्थक आळवक

“चार संग्रहांनीं लोकसंग्रह करणार्‍या उपासकांत हत्थक आळवक श्रेष्ठ आहे.”

ह्याची चमत्कारिक गोष्ट आहे ती अशी :- आळवक राजा एक दिवस मृगयेला गेला असतां मृगाला मारून धनुष्याला टांगून परत येत होता. मार्गांत थकल्यामुळें तो एका वडाच्या झाडाखालीं बसला. थकवा गेल्यावर तो पुन्हां जाण्याच्या बेतांत होता. इतक्यांत तेथें रहाणार्‍या यक्षानें त्याला पकडलें. त्याच्या हातांतून सुटण्याचा दुसरा मार्ग नसल्यामुळें रोजचा एक मनुष्य व हांडाभर अन्न देण्याचें कबूल करून त्यानें आपली सुटका करून घेतली. त्या दिवसापासून यक्षाला दररोज एक मनुष्य व हांडाभर अन्न मिळत असे; कांहीं दिवसांनीं बंधनागारांतील कैदी खलास झाले, व आतां पुढें काय करावें, असा प्रश्न उपस्थित झाला. वयांत आलेल्या नागरिकांला पकडून यक्षाकडे पाठविलें तर राष्ट्रक्षोभ होईल असें जाणूंन नुकत्याच जन्मलेल्या बालकांना यक्षाकडे पाठविण्यास राजानें सुरुवात केली. त्यामुळें नवमास पूर्ण होण्यापूर्वीं गर्भिणी स्त्रिया दुसर्‍या देशांत जात, व प्रसूति-काळानंतर कांहीं महिने तेथेंच रहात. एके दिवशीं दुसरा मुलगा न मिळाल्यामुळें त्याच दिवशीं जन्मलेल्या आपल्या मुलाला राजानें यक्षाकडे पाठवून दिलें.

पूर्वरात्रीं भगवान् बुद्ध आळवक यक्षाच्या वसतिस्थानांत येऊन राहिला होता. आळवक त्याला म्हणाला, “श्रमणा, येथून बाहेर हो.” ठीक आहे, असें म्हणून भगवान् तेथून बाहेर निघाला. यक्ष म्हणाला, “श्रमणा, आंत ये.” ‘ठीक आहे’ असें म्हणून भगवान् आंत गेला. असा प्रकार तीनदां घडला. चौथ्यांदा जेव्हां यक्षानें भगवंताला बाहेर जाण्यास सांगितलें, तेव्हां भगवान् म्हणाला, “आयुष्मन, मी येथून बाहेर निघणार नाहीं. तुला जें कर्तव्य असेल तें कर.”

यक्ष :- श्रमणा, तुला मी प्रश्न विचारतों. त्याचें जर तूं उत्तर दिलें नाहींस तर तुला मी वेड लावीन, तुझें काळींज फाडून टाकीन किंवा पायांना धरून तुला गंगेच्या पार फेकीन.

भ० :- आयुष्मन्, मला वेड लावणारा, माझें काळीज फाडणारा किंवा पायांना धरून मला गंगेच्या पार फेंकणारा ह्या सर्व जगांत कोणी नाहीं. तथापि तुझी इच्छा असेल तर तूं खुशाल प्रश्न विचार.
नंतर यक्षानें भगवंताला बरेच प्रश्न विचारले, व त्यांचीं समर्पक उत्तरें मिळाल्यावर तो भगवंताचा उपासक झाला. १
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- ‘पूर्वरात्रीं’ येथपासून ‘उपासक झाला’ येथपर्यंत मजकूर सुत्तनिपातांतील आळवक सुत्ताच्या आधारें लिहिला आहे; मनोरथपूरणींत ह्याचा थोडक्यांत उल्लेख करून आळवकसुत्ताच्या अट्ठकथेवर हवाला दिला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel