९८. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु कांहीं कारणास्तव सैन्यांत जात, व तीन दिवसांपेक्षां जास्त दिवस रहात. लोक त्यांवर टीका करूं लागले... आणि भगवंतानें नियम केला तो असा:-

भिक्षूला कांही कारणास्तव सैन्यांत जाण्याचा प्रसंग आला तर सतां त्यानें दोन तीन दिवस सैन्यांत राहावें. त्यापेक्षां जास्त दिवस राहील, त्याला पाचित्तिय होतें ।।४९।।

९९. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु दोन तीन दिवस सैन्यांत राहिले असतां निशाण मारण्याच्या जागीं, सैन्याची गणती करण्याच्या जागीं, व्यूह रचण्याच्या जागीं आणि अनीक (पथ..) तयार करण्याच्या जागीं जात असत. त्यांपैकी एका भिक्षूला निशाण मारण्याच्या जागीं गेला असतां बाण लागला. लोक त्याची थट्ट करूं लागले; म्हणाले व भदंत युद्ध चांगलें झालें काय? तुम्ही किती निशाणें मारलीं? तो भिक्षु फार लाजला, व पुढें ही गोष्ट भगवंताला समजली तेव्हां त्यानें षडर्गियांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

दोन तीन दिवस सैन्यांत राहिला असतां जो भिक्षु निशाण मारण्याच्या जागीं, सैन्य गणण्याच्या जागीं, व्यूह रचण्याच्या जागीं किंवा अनीक तयार करण्याच्या जागीं जाईल त्याला पाचित्तिय होतें ।।५०।।


१००. बुद्ध भगवान् चेतिय देशांत प्रवास करीत असतां भद्दवतिका नांवाच्या गांवाकडे जात होता. वाटेंत गवळी व शेतकरी त्याला म्हणाले, “भदंत, भद्दवतिकेजवळ आपण आम्रतीर्थ येथें जाऊं नका. कारण तेथें जटिलाच्या आश्रमात एक भयंकर ऋद्धिमान् विषारी नाग रहात आहे.” पण त्यांचें कांहीं न ऐकता भगवान् भद्दवतिका गांवीं गेला. भगवंताच्या संघांपैकी एक सागत नांवाचा भिक्षु त्या जटिलाच्या आश्रमांत जाऊन त्याच्या अग्निशाळेंत गवताचें आसन तयार करून आसनमांडी ठोकून मोठ्या सावधपणें त्यावर बसला. त्याला पाहून तो नाग रागावला, व त्यानें धूर सोडण्यास आरंभ केला. सागतानेंहि आपल्या सिद्धीच्या बळानें धूर सोडला. त्या नागाला तें असह्य होऊन त्यानें आग सोडली. सागतानेंहि आग सोडली, आणि आपल्या सिद्धिबळानें त्या नगाचें तेज हरण केलें. भगवान् कांहीं काळ भद्दवतिका येथें प्रवास करीत कौशांबीला आला. सागतहि त्याच्याबरोबर होता. आम्रतीर्थात रहाणार्‍या नागाबरोबर युद्ध करून त्याचा पराजय केला हें वर्तमान कौशंबी येथे आगाऊच फैलावलें होतें. येथील उपासक भगवंताचें स्वागत करण्यासाठीं आले; व त्या प्रसंगीं सागताला म्हणाले, “भदंत, भिक्षूंसाठीं आम्हीं काय द्यावें?” त्यावर षड्वर्गीय भिक्षु म्हणाले, “कापोतिक नांवाची शुद्ध दारू दुर्मिळ आहे. ती तुम्ही तयार कारा.” (..हां) त्या उपासकांनीं आपापल्या घरीं कापोतिक शुद्ध दारू तयार करून सागत भिक्षेला आला असतां त्याला ती यथेच्छ पाजली. तो ती पिऊन धुंद झाला, व नगरांत येऊन पडला. भगवंतानें कांहीं भिक्षूंसह नगरांतून आरामांत येतांना त्याला पाहिलें, व भिक्षूंकडून त्याला उचलवून आरामांत नेलें. भिक्षूंनीं त्याला आरामांत नेऊन भगवंताच्या पायांच्या बाजूला त्याचें डोकें करून जमिनीवर निजवलें; पण तो दारूच्या धुंदींत उठून भगवंताच्या बाजूला पाय करून निजला. तेव्हां भगवान् म्हणाला, “भिक्षुहो, हा सागत भिक्षु पूर्वी तथागताविषयी आदर बाळगीत नव्हता काय?” “होय, भदंत,” भिक्षूंनीं उत्तर दिलें. “पण आतां तथागताचा आदर ठेवीत आहे काय?” “नाहीं, भदंत.” “भिक्षुहो, ह्याच सागतनें आम्रतीर्थक नागाचा पराजय केला नाहीं काय?” “होय, भदंत” “पण आतां तो नागाबरोबर लढूं शकेल काय?” नाहीं, भदंत.” “भिक्षुहो, तो जेणेंकरून मनुष्य निश्चेष्टित होईल असें पेय पिणें योग्य आहे काय?” “नाहीं, भदंत” ह्याप्रमाणे सागताचा निषेध करून भगवंतानें भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

सुरामेरयपान१(१- मेरय एक प्रकारची दारू. सुरा आणि मेरय ह्या दोन शब्दांत सर्व मादक पदार्थांचा समावेश करण्यांत येतो.) केलें असतां पाचित्तिय होतें ।।५१।।

१०१. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षूंनीं सप्तदशवर्गीयांपैकीं एका भिक्षूला गुदगुल्या करून हंसवलें. हंसतां हंसतां श्वासोच्छवास कोंडून तो मरण पावला. सज्जन भिक्षूंना ही गोष्ट आवडली नाहीं...व ह्या बाबतींत भगवंतानें नियम केला तो असा:-

गुदगुल्या केल्या असतां पाचित्तिय होतें ।।५२।।

१०२. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं सप्तदशवर्गीय भिक्षु अचिरवती नदींत जलक्रीडा करीत असत. पसेनदि राजा मल्लिका राणीसह आपल्या प्रासादाच्या गच्चीवर बसला असतां त्यांना पाहून राणीला म्हणाला, “हे पहा अर्हन्त जलक्रीडा करीत आहेत!” मल्लिका राणी म्हणाली, “एक तर भगवंतानें ह्या बाबतींत नियम केला नसावा किंवा हे भिक्षु अनभिज्ञ तरी असावें.” आपण स्वत: न सांगतां हे भिक्षु जलक्रीडा करीत आहेत. हें भगवंताला समजून यावें अशी एक युक्ती पसेनदि कोसल राजानें योजिली. त्या भिक्षूंना बोलावून त्यांजवळ एक गुळाची ढेंप दिली, व ती भगवंताला देण्यास सांगितलें. त्यांनीं ती नेऊन भगवंताला दिली; व ती पसेनदि राजानें दिली आहे असें सांगतिलें. राजानें तुम्हांस कोठें पाहिलें असा भगवंतानें प्रश्न केला. आम्ही अचिरवती नदींत जलक्रीडा करीत होतों, तेथें रांजानें आम्हांस पाहिलें असें त्यांनीं उत्तर दिलें. भगवंतानें त्यांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जलक्रीडा केली असतां पाचित्तिय होतें ।।५३।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel