११४. बुद्ध भगवान् राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. त्या काळीं सप्तदशवर्गीय तरुण मुलांत उपाली प्रमुख होता. उपालीच्या आईबापांस अशी काळजी पडली कीं, आपल्या पश्चात् श्रम न करतां उपाली सुखानें कसा राहिल? त्यांच्या मनांत त्याला लिहिण्यास शिकवावें असा विचार आला. पण त्या योगें उपालींचा बोटें दुखण्याचा संभव होता. हिशोब ठेवण्यास शिकवावें, तर विचार करतां करतां त्याच्या छातींत दुखेल अशी भिति पडली. सराफी शिकवावी तर खरीं खोटीं नाणीं ताडतां ताडतां त्याचे डोळे दुखतील असें त्यांस वाटलें. शेवटीं शाक्यपुत्रीय भिक्षुसंघात त्याला प्रविष्ट केलें तर तो सुखानें राहील अशी त्यांची कल्पना झाली. आणि ह्यासंबंधीं त्यांच्या आपसांत गोष्टी चालल्या. त्यांचें बोलणें उपालीनें ऐकलें, आणि आपल्या साथ्यांना तो म्हणाला, “चला, आपण शाक्यपुत्रीय संघांत जाऊं. “त्या सर्वांना ही गोष्ट पसंत पडली, व सर्वजणांनीं आपापल्या आईबापांची परवानगी घेऊन भिक्षूंजवळ जाऊन प्रव्रज्या घेतली. भिक्षूंच्या नियमाप्रमाणें दुपारचे बारा वाजल्यानंतर त्यांस जेवावयास मिळत नसे; आणि रात्रीं आपणाला कांहीं तरी खावयास द्या असें म्हणून ते रडत असत. भिक्षु त्यांचें सांतवन करण्याचा प्रयत्न करीत; पण ते ऐकत नसत. पहांटेला त्यांचें रडणें ऐकून भगवंतानें आनंदापाशीं त्यासंबंधीं चौकशी केली; व जेव्हां ही गोष्ट समजली तेव्हां अशा लहान मुलांना ज्यांनीं भिक्षुसांघांत घेतलें त्यांचा निषेध करून त्यानें नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु जाणूनबुजून वीस वर्षांपेक्षां कमी वयाच्या व्यक्तीला उपसंपदा देईल- ती व्यक्ती अनुपसंपन्न समजावी, व त्या वेळीं हजर असलेले भिक्षु निंद्य समजावे- त्याला पाचित्तिय होतें ।।६५।।


११५. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात  होता. त्या काळीं एक सार्थ (कारवानांचा तांडा) राजगृहाहून पश्चिमेकडे जात होता. एक भिक्षु त्यांच्या बरोबर जाण्यास निघाला. ते राजाचा कर न देतां पळून जात होता. त्यांना वाटेंत राजपुरुषांनीं पकडलें व ते ह्या भिक्षूला म्हणाले, “तूं ह्या चोरांच्या तांड्याबरोबर कां जातोस?” पुढें ही गोष्ट जेव्हां भगवंताला समजली तेव्हां त्यानें त्या भिक्षूचा निषेध करून नियम केला तो असा:-

जो भिक्षु जाणूनबुजून बेत ठरवून चोरांच्या तांड्याबरोबर- एका गांवांतून दुसर्‍या गांवांत देखील- प्रवास करील त्याला पाचित्तिय होतें ।।६६।।

११६. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं एक भिक्षु कोसल देशांतून प्रवास असतां एका गांवाच्या वेशीवरून चालला होता. त्या गांवांतील एक बाई नवर्‍याशीं भांडण करून त्याच रस्त्यानें जात होती. तिनें भिक्षूबरोबर जाण्यास परवानगी मागितली, व भिक्षूनें, खुशाल चल, असें सांगितलें. लागोपाठ तिचा नवरा येत होता. हा भिक्षु आपल्या बायकोला पळवून नेत आहे असें वाटून त्यानें त्याला यथास्थित चोप दिला. तेव्हां ती स्त्री त्याला म्हणाली, “ह्या भिक्षूला तूं का मारतोस? त्याचा ह्यांत कांहीच अपराध नाहीं. तूं त्याची क्षमा माग.” त्याप्रमाणें तिच्या नवर्‍यानें त्याची क्षमा मागितली. पुढें श्रावस्तीला जाऊन त्या भिक्षूनें ही गोष्ट इतर भिक्षूंना सांगितली...आणि भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु बेत करून स्त्रीबरोबर- एका गांवाहून दुसर्‍या गांवांत देखील- प्रवास करील त्याला पाचित्तिय होतें ।।६७।।

११७. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं अरिष्ट भिक्षूला अशी पापकारक दृष्टि उत्पन्न झाली होती कीं, भगवंतानें उपदेशिलेल्यां धर्माचा विचार केला असतां ज्या अंतरायकर गोष्टी भगवंतानें सांगितलेल्या आहेत त्यांचा उपभोग घेणार्‍याला त्या अंतरायकारक होणार नाहींत. हें त्याचें मत कांहीं भिक्षूंना समजलें, व त्यांनीं त्याला त्यापासून परावृत्त करण्याची पुष्कळ खटपट केली. ते म्हणाले, “आयुष्मान् अरिष्ट, तूं भगवंतावर खोटा आळ आणूं नकोस. चैनीच्या पदार्थांचा उपभोग घेतला असतां मोक्षमार्गांत अंतराय घडतो असें भगवंतानें वारंवार प्रतिपादिलें आहे.” तरी अरिष्ट आपल्या पापकारक दृष्टीपासून निवृत होईना; आणि ही गोष्ट भगवंताला समजलीं. तेव्हां त्यानें अरिष्टाचा निषेध करून नियम घालून दिला तो असा:-

भगवंतानें उपदेशिलेल्या धर्माचा अर्थ मी असा समजतों कीं, जे अंतरायकारक धर्म (कामोपभोग) भगवंतानें सांगितले आहेत ते सेवन करणार्‍याला त्यांजपासून अंतराय होणार नाहीं, असें जो भिक्षू म्हणेल त्याला भिक्षूंनीं म्हणावें, “आयुष्मान् तूं असें म्हणूं नकोस. भगवंतावर आळ आणूं नकोस. भगवंतावर आळ आणणें चांगलें नाहीं. भगवान् (तूं म्हणतोस) असें कधींहि बोलणार नाहीं. भगवंतानें अनेक रितीनें अंतरायकर धर्म (कामोपभोग) अंतरायकारक आहेत आणि ते सेवन केल्यास अंतराय घडेल असे सांगितलें आहे.”  असें भिक्षूंनीं सांगितलें असतां जर तो भिक्षु तसाच हट्ट धरून बसेल, तर ती दृष्टि सोडण्यासाठीं भिक्षूंनीं त्याची तीनदां समजूत घालावी. तीनदां समजूत घातली असतां ती दृष्टि तो सोडील तर चांगलें; जर सोडली नाहीं, तर त्याला पाचित्तिय होतें ।।६८।।

११८. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं अरिष्टानें आपली पापदृष्टि सोडून प्रायश्चित केलें नव्हतें. असें असतां षड्वर्गीय भिक्षु त्याच्या बरोबर जेवीत, रहात व एके ठिकाणीं निजत. ही गोष्ट सज्जन भिक्षूंना आवडली नाहीं... आणि भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु, ज्यानें पापदृष्टि सोडून प्रायश्चित्त घेतलें नाही अशा दुसर्‍या भिक्षूबरोबर जेवील, राहील किंवा एके ठिकाणीं निजेल, त्याला पाचित्तिय होतें ।।६९।।

११९. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं आरिष्टाप्रमाणेंच खंडक नांवाच्या श्रामणेराला पापदृष्टी उत्पन्न झाली होती. त्याला भगवंतानें भिक्षुसंघांतून घालवून देण्यास सांगितलें. तरी षड्वर्गीय भिक्षु त्याच्याशीं संबंध ठेवीत असत. तेव्हां त्यांचा निषेध करून भगवंतानें नियम केला तो असा:-
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel