काश्यपाचें वय वीस वर्षांचे व भद्रेचें सोळा वर्षांचे होतें. वाङ्‌निश्चयाचे वर्तमान समजल्याबरोबर त्या दोघांनीं परस्परांना अशा अर्थाचीं पत्रें लिहिलीं कीं, प्रपंचांत रहाण्याचा आपला विचार नाहीं; तेव्हा विवाहपाशांत बद्ध झाल्यानें विनाकारण त्रास मात्र होणार आहे. हीं दोन्ही पत्र भद्रेच्या आणि काश्यपाच्या पालकांच्या हातीं आलीं, व त्यांनीं तीं परस्पर फाडून टाकलीं. ‘लहान आहेत, कांहीं तरी भलतेच विचार डोक्यांत घेऊन बसतात,’ असें त्यांना वाटलें असल्यास नवल नाहीं. ह्याप्रमाणें महाकाश्यपाची आणि भद्रेची इच्छा नसतांच त्यांना विवाहपाशांत बद्ध करण्यांत आलें.

त्या वेळच्या पद्धतीप्रमाणें रात्रीं एकाच शयनगृहांत आणि एकाच पलंगावर त्या दोघांना निजावें लागत असे. परंतु दोघांच्याहि मध्ये दोन फुलांच्या माळा ठेवून भद्रा काश्यपाला म्हणे, “ज्याच्या बाजूची माळ कोमेजेल, त्याच्या मनांत कामविकार उत्पन्न झाला, असें समजावें.” महाकाश्यपाचे वडील जोंपर्यंत जिवंत होते, तोपर्यंत त्याला किंवा भद्रेला गृहत्याग करतां येणें शक्य नव्हतें. परंतु एका घरांत राहिल्यानें त्यांच्या अखंड ब्रह्मचर्यांत आणि उदात्त प्रेमांत कधीहिं खळ पडला नाहीं. जेव्हां महाकाश्यपाचीं आईबापें निवर्तलीं, तेव्हां तो भद्रेला म्हणाला, “तूं आपल्या घरून आणलेलें द्रव्य, व ह्या घरांत असलेलं द्रव्य आजपासून तुझेंच आहे.”

भद्रा:- “ पण आपण कोठें चाललां?”

काश्यप:- “मी आतां प्रव्रज्या घेणार आहें.”

भद्रा:- हा आपला विचार मलाहि पसंत आहे. आपल्या मागोमाग मीहि येतें.”

महाकाश्यप परिव्राजकवेशानें घरांतून बाहेर पडला. त्याच्या मागोमाग भद्राहि परिव्रजिका होऊन निघाली. त्यांच्या नोकरचाकरांनीं व मालकीच्या गांवांत रहाणार्‍या रयतेनें त्यांला ओळखलें, आणि परत फिरण्यास अतिशय आग्रह केला. पण महाकाश्यपाचा निश्चय मुळींच ढळला नाहीं. गांवापासून कांहीं अंतरावर गेल्यावर तो भद्रेला म्हणाला, “भद्रे, तुझ्यासारखी सुंदर स्त्री माझ्या मागोमाग चाललेली पाहून, प्रव्रज्या घेतली तरी ह्या दोघांचा घरगुती संबंध तुटला नाहीं, अशी कुकल्पना लोकांच्या मनांत उत्पन्न होणें संभवनीय आहे. अशा विकृतविचाराला आपण कारणीभूत कां व्हावें? चल, येथें हे दोन रस्ते झाले आहेत; तूं एकानें जा मी दुसर्‍यानें जातों.”

भद्रा:- आपण म्हणतां तें ठीक आहे. ज्या अर्थी आपण थोर आहांत, त्या अर्थीं आपण उजव्या रस्त्यानें जा, व मी डाव्या रस्त्यानें जातें.

त्या दिवशीं बुद्ध भगवान् राजगृह आणि नालंदा ह्यांच्या दरम्यान असलेल्या वहुपुत्रक नांवाच्या एका वडाच्या झाडाखालीं बसला होता. महाकाश्यपानें जातांना याला पाहिलें, व त्याची भव्य मुद्रा पाहून, ‘हाच माझा गुरु आहे,’ अशी महाकाश्यपाची खात्री झाली. भगवंतानें त्याला उपदेश केला, व महाकाश्यपाला बरोबर घेऊन भगवान् त्या वडाखालून निघाला. वाटेंत विश्रांतीसाठीं बसण्याची त्याची इच्छा दिसून आल्यामुळें महाकाश्यपानें आपलें पांघरण्याचें वस्त्रखंड जमिनीवर पसरलें. त्यावर बसून बुद्ध भगवान् म्हणाला, “काश्यप, हें तुझें वस्त्रखंड मऊ लागतें.”

काश्यप:- भगवान्, तें आपण ग्रहण करा.”

भगवान्:- हें जर मी घेतलें तर तूं काय पांघरशील?”

काश्यप:- आपली तेवढी संघाटि मला द्याल, तर ती मी पांघरीन.”

भगवान्:- पण काश्यप, ही चिंध्यांची केलेली संघाटि पुष्कळ दिवस वापरल्यानें जीर्ण झाली आहे. ती सामान्य माणसाला वापरतां येणें शक्य नाहीं.

काश्यपानें ती आग्रहपूर्वक मागून घेतली, व त्या दिवसापासून कधींहि गृहस्थानें दिलेलें वस्त्र वापरलें नाहीं. आपलीं चीवरें तो चिंध्यांचींच बनवीत असे; व तीहि तीनच ठेवीत असे. तो जंगलांत राही, व पिंडपातावरच (भिक्षेवरच) आपला निर्वाह करी.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel