१०७. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या वेळीं कांहीं भिक्षु व परिव्राजक साकेताहून श्रावस्तीला येत होते. वाटेंत त्यांचीं चीवरें चोरांनी हिरावून घेतलीं. राजाच्या योद्ध्यांनीं त्या चोरांना पकडलें, व भिक्षूंना आपलीं चीवरें ओळखून घेण्यास सांगितलें. परंतु तीं परिव्रजकांच्या वस्त्रांत मिसळलीं असल्यामुळें त्यांना ओळखतां येईनात. तेव्हां ते राजाचे शिपाई भिक्षूंवर टीका करूं लागले...आणि भगवंतानें नियम केला तो असा:-

नवीन चीवर मिळालें असतां त्यावर भिक्षूनें निळा रंग, चिखल किंवा काळा रंग ह्यापैकीं एकानें चिन्ह करावें. ह्या तिहींपैकीं एकानें चिन्ह न करतां नवीन चीवर वापरील, त्याला पाचित्तिय होतें ।।५८।।


१०८. बुद्ध, भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं उपनंद शाक्यपुत्र आपल्या भावाला चीवर दिलें आहे असें म्हणून त्याच्या संमतीवांचून तें वापरीत होता. ती गोष्ट त्याच्या भावानेंच भिक्षूंस सांगितली... आणि भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु भिक्षूला, भिक्षुणीला, शिकणार्‍या स्त्रीला, श्रामणेराला किंवा श्रामणेरीला चीवर दिलें आहे, असें म्हणून दिलेल्या व्यक्तीच्या परवानगीवांचून तें वापरील, त्याला पाचित्तिय होतें ।।५९।।

१०९. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं सप्तदशवर्गीय भिक्षूंच्या वस्तू व्यवस्थितपणें ठेवलेल्या नसत; षड्वर्गीय भिक्षु त्या लपवून ठेवीत. सप्तदशवर्गीय रडत असत. ही गोष्ट सज्जन भिक्षूंना आवडली नाहीं...आणि भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु भिक्षूचें पात्र, चीवर, आसन, सुईची डबी किंवा कंबरपट्टा लपवील किंवा लपवावयास लावील, त्याला पाचित्तिय होतें ।।६०।।

११०. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. आयुष्मान् उदायी बाण मारण्यांत पटाईत असे. त्याला कावले आवडत नसत. त्यानें कावळ्यांना मारून त्यांचीं डोकीं एकावर एक अशीं सुळावर चढवून ठेविलीं. ही गोष्ट सज्जन भिक्षूंना आवडली नाहीं... व भगवंतानें उदायीचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु जाणूनबुजून प्राण्याला ठार मारील त्याला पाचित्तिय होतें ।।६१।।


१११. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु जाणूनबुजून प्राणी असलेलें पाणी वापरीत असत. ही गोष्ट सज्जन भिक्षूंना आवडली नाहीं...व भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु जाणूनबुजून प्राणी असलेलें पाणी वापरील त्याला पाचित्तिय होतें ।।६२।।

११२. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु नियमाप्रमाणें निकालांत काढलेला खटला पुन्हां उपस्थित करीत असत; म्हणून कीं, ह्या खटल्याचा निकाल बरोबर झाला नाहीं; त्याचा पुन्हां निकाल करावयास पाहिजे. सज्जन भिक्षूंना ही गोष्ट आवडली नाहीं...आणि भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु निकालांत काढलेला खटला जाणूनबुजून पुन्हां उपस्थि करील त्याला पाचित्तिय होतें।।६३।।

११३. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे.अ. आरामांत रहात होता. त्या काळीं उपनंद शाक्यपुत्राला चेतनायुक्त वीर्यपाताची आपत्ति घडली; व त्यानें ही गोष्ट आपल्या भाऊ भिक्षूला कळवून गुप्त राखण्यात सागितलें. पुढें ती गोष्ट उघडकीस आली...आणि भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु दुसर्‍या भिक्षूची संघादिशेषासारखी आपत्ति माहीत असतां जाणूनबुजून गुप्त ठेवतो, त्याला पाचित्तिय होतें ।।६४।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel