२३. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं उदायीची पूर्वीची बायको भिक्षुणी झाली होती........तिला त्यानें आपलें अंतरवासक चीवर धुवावयास दिलें.......भगवंतानें त्याचा निषेध करून भिक्षंला नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु आपली आप्त नव्हे अशा भिक्षुणीला धुण्यासाठीं, रंगविण्यासाठीं किंवा बडविण्यासाठीं जुनें चीवर देईल. त्या त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।४।।

२४. बुद्ध भगवान् राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. त्या काळीं उत्पलवर्णी भिक्षुणी श्रावस्ती येथें रहात असे. सकाळच्या वेळीं श्रावस्तींत भिक्षाटन करून भोजन संपल्यावर ती अंधवनांत जाऊन एका झाडाखालीं विश्रांतीसाठीं बसली. त्या काळीं चोरांनीं एका गाईला मारून मांस घेऊन अंधवनांत प्रवेश केला. त्यांच्या पुढार्‍यानें उत्पलवर्णेला पाहिलें, आणि असा विचार केला कीं, आपल्या भाऊबंदांनीं हिला पाहिलें असतां, ह्या भिक्षुणीला ते विनाकारण त्रास देतील म्हणून तो दुसर्‍याच मार्गानें वनांत शिरला. तेथें त्या चोरांनीं तें मांस भाजून तयार केलें; व त्यापैकीं उत्तम मांस त्या पुढार्‍यानें घेऊन एका द्रोणांत भरून उत्पलवर्णेच्या शेजारीं एका झाडाला टांगलें; व ‘जो श्रमण किंवा ब्राह्मण हें मांस पाहील त्यालाच तें दिलें आहे असें समजून त्यानें तें न्यावें,’ असें म्हणून तो तेथून निघून गेला. उत्पलवर्णेनें समाधींतून उठत असतां ह्या चोरनायकाचे शब्द ऐकले, व तें मांस घेऊन ती आपल्या उपाश्रयांत गेली. दसर्‍या दिवशीं सकाळी तें तयार करून उत्तरासंगांत गाठोंडें बांधनू ती अंतरिक्षांतून वेळुवनांत उतरली. त्या समयीं बुद्ध भगवान् भिक्षाचर्येसाठी गेला होता; व उदायी विहाररक्षक होता. भगवंताला देण्यासाठीं तें मांस तिनें त्याच्या स्वाधीन केलें. तेव्हां उदायी तिला म्हणाला, “भगिनी, भगवंताला तूं मांस दिलेंस. मग मला तेवढें चीवर देना. उत्पलवर्णेजवळ भिक्षुणीला लागणारी अवघीं पांचच चीवरें होतीं. ती म्हणाली, “स्त्रियांना विशेष दान मिळत नसतें; व हें माझें पांचवें चीवर आहे. मी तुम्हांला कसें देऊं?” उदायी म्हणाला, “जसा एकादा मनुष्य हा.... देऊन त्याच्या पट्ट्याचा लोभ धरतो त्याप्रमाणें भगवंताला मांस देऊन मला अंतरवासक देत नाहींस.” अशा रितीनें तिला त्रस्त करून उदायीनें तिच्याकडून अंतरवास घेतला. जेव्हां उत्पलवर्णा उपाश्रयांत आली तेव्हां भिक्षूणींला ती गोष्ट समजली; व उदायीवर त्यांनीं टीका केली. त्यांनीं ती गोष्ट भिक्षूंना व भिक्षूंनीं ती गोष्ट भगवंताला सांगितली. भगवंतानें उदायीचा निषेध करून नियम घालून दिला तो असा:-

“जो भिक्षु अज्ञाति भिक्षुणीच्या हातून चीवर घेईल त्याला निस्सग्गिम पाचित्तिय होतें.”

त्या काळीं भिक्षु भिक्षुणीकडून दुसर्‍या वस्तूबद्दल चीवर घेऊं इच्छीत नसत. भिक्षुणींना तें आवडलें नाहीं; व ती गोष्ट भिक्षूंनीं भगवंताल सांगितली. तेव्हां ह्या प्रकरणीं भगवान् भिक्षूंनां म्हणाला, “भिक्षु, भिक्षुणी, शिकणारी स्त्री, श्रामस्ती आणि श्रामणेरी ह्या पांचांकडून दुसर्‍या वस्तूबद्दल चीवर घेण्यास मी अनुज्ञा देतों.” आणि त्यानें वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

जो भिक्षु दसर्‍या वस्तूची बदली केल्यावांचून अज्ञाति भिक्षुणीच्या हातून चीवर घेतो, त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।५।।

२५. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथ पिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं उपनंद शाक्यपुत्र धर्मोपदेश करण्यांत प्रसिद्ध असे. एक श्रेष्ठीपुत्र त्याजपाशीं येऊन नमस्कार करून एका बाजूला बसला. त्याला उपनंदानें धर्मोपदेश केला. तेव्हां तो म्हणाला, “तुम्हांला चीवर, पिंडपात, शयनासन किंवा औषध ह्यांपैकीं जें पाहिजे असेल तें आम्हांला सांगत चला. तें देण्याजोगे सामर्थ्य आम्हांला आहे.” उपनंदानें त्याचें उपवस्त्र मागितलें. श्रेष्ठिपुत्रानें एक दिवस दम धरण्यास विनविलें, तरी उपनंदा हट्टच धरून बसला. तेव्हां श्रेष्ठिपुत्रानें आपलें उपरणें त्याला दिलें. वाटेंत लोकांनीं त्याला विचारलें कीं, तूं आज एकच वस्त्र नेसून कां चालला आहेस? त्याने घडलेलें वर्तमान त्यांस सांगितलें. तेव्हां शाक्यपुत्रियांवर टीका करूं लागले. अनुक्रमें ही गोष्ट भगवंताला समजली. भगवंतानें उपनंदाचा निषेध करून नियम घालून दिला तो असा:-

“जो भिक्षु अज्ञाति गृहपतीकडे किंवा गृपत्नीकडे चीवर मागून घेईल त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel