धनिय बिंबिसार राजाच्या वाड्यांत आणि तेथें त्याच्यासाठीं मांडलेल्या आसनावर बसला. बिंबिसार राजा त्याला नमस्कार करून एका बाजूला बसला आणि म्हणाला, “भदंत, मी तुम्हाला सरकारी लांकडें दिलीं ही खरी गोष्ट आहे का?” “होय, महाराज” धनियानें उत्तर दिलें. राजा म्हणाला, ‘आम्ही राजेलोक म्हणजे अनेक कामांत गुंतलेले असावयाचे. दिलें असतांहि विसर पडणें शक्य आहे. तेव्हां मी लांकडें कधीं दिली ह्याची मला नीट आठवण द्या.” धनिया म्हणाला, “जेव्हां तुमचा राज्यभिषेक झाला तेव्हां श्रमणब्रह्मणांला तृणकाष्ठोदकहि दिलें आहे, असें म्हटल्याचें तुम्हांस स्मरतें ना?” राजा म्हणाला, “होय, मला आठवतें. साधुवृत्ति आणि सज्जन श्रमणब्राह्मण पुष्कळ आहेत. लहान सहान गोष्टींतहि त्यांना शंका उत्पन्न होते. म्हणून त्यांना उद्देशून मी असें बोललों, तें अरण्यांत ज्याला कोणी मालक नाहीं अशा तृणकाष्ठासंबंधानें. पण तुम्ही एवढ्या वाक्यावर अवलंबून न दिलेलीं लांकडें घेऊन जातां हें कसे? माझ्यासारख्या राजाला राष्ट्रांत रहाणार्‍या श्रमणाला किंवा ब्राह्मणाला ठार मारणें, कारागृहांत टाकणें किंवा हद्दपार करणें उचित नाहीं. तुम्ही आतां येथून जा. केशाच्या अंतरानें तुम्ही सुटलां असें समजा, व पुन्हां असें काम करूं नका.”

ही गोष्ट लोकांना समजली, तेव्हां ते भिक्षूंची निंदा करूं लागले. भिक्षूंना ही गोष्ट समजली तेव्हां धनियाला दोष देऊं लागले, व त्यांनीं ती भगवंताला कळविली. भगवंतानेंहि धनियाला दोष दिला व ह्या प्रकरणीं नियम केला तो असा:-

“जो भिक्षु न दिलेली चोरीची वस्तु-जिच्यासाठीं राजेलोक चोराला पकडून तूं चोर आहेस, मूर्ख आहेस, मूढ आहेस, स्तेन आहेस असें म्हणून मारतील, तुरुंगांत टाकतील किंवा हद्दपार करतील-घेईन तो देखील पाराजिक होतो, सहवासाला अयोग्य होतो.”
हा नियम केल्यानंतर षडवर्गीय भिक्षूंनीं अरण्यांत एका धोब्याच्या वस्त्रांचें गाठोडें चोरलें; व इतर भिक्षूंनीं तुम्ही असें कां केलें असें विचारलें असतां, भगवंतानें केलेला नियम गांवापूरता आहे. अरण्याला लागू पडत नाहीं, असें ते म्हणू लागले. तेव्हां पूर्वींच्या नियमांत भगवंतानें फेरफार केला तो असा:-

जो भिक्षु गांवांतून किंवा अरण्यांतून न दिलेली चोरीची वस्तु जिच्यासाठीं राजेलोक चोराला पकडून, तूं चोर आहेस, मूर्ख आहेस, मूढ आहेस स्तेन आहेस असें म्हणून मारतील, तुरुंगांत टाकतील किंवा हद्दपार करतील-घेईल तो देखील पाराजिक होतो., सहवासाला अयोग्य होतो.।।२।।

३.बुद्ध भगवान् वैशाली येथें महावनांत कूटागार शाळेंत रहात होता. त्या काळीं तो शरीराच्या अशुभतेची भावना करण्याविषयीं भिक्षूंला उपदेश करीत असे; शरीराच्या अशुभतेच्या ध्यानाची स्तुति करीत असे. एकदां तो भिक्षूंला म्हणाला, ‘एक पंधरवडाभर मी एकान्तांत राहूं इच्छितों. ह्या अवधींत भिक्षा घेऊन येणार्‍या भिक्षूशिवाय दुसर्‍या कोणीहि माझ्याजवळ येतां कामा नये. त्याप्रमाणें भगवान् एकान्तांत राहिला. इकडे भिक्षु भगवंतानें सांगितल्याप्रमाणें अशुभ भावना करूं लागले, व त्यामुळें शरीराचा त्यांना कंटाळा येऊं लागला. त्यांपैकीं कांहींनीं आत्मघात केला; कांहींनीं परस्परांला ठार केलें; कांहीं मिगलंडिक नांवाचा एक श्रमणवेषधारी होता त्याजपाशीं जाऊन म्हणाले “तूं जर आम्हांला ठार मारशील तर आमचीं पात्रचीवरें तुला देऊं.” मिगलंडिकानें पात्रचीवरांचें वेतन घेऊन त्यांना ठार मारलें; व रक्तानें माखलेली तलवार घेऊन तो वल्गुमुदा नदीवर गेला. तेथें तलवार धूत असतां त्याला मनस्ताप उत्पन्न झाला. मीं हें किती वाईट कृत्य केलें असें त्याला वाटूं लागलें. इतक्यांत एक मारलोकींची देवता तेथें उदकावर प्रगट झाली, व म्हणाली, “हे सत्पुरुषा, तूं फार चांगले कृत्य केलेंस. ज्यांना मोक्ष मिळाला नाहीं त्यांना मोक्षला पाठवून तूं पुष्कळ पुण्य जोडलेंस.” तें त्या देवतेचें भाषण ऐकून मिगलंडिकाला फार आनंद झाला; व तीक्ष्ण तलवार घेऊन प्रत्येक विहारांत जाऊन तो म्हणूं लागला कीं, ‘मोक्ष मिळाला नाहीं असा कोण आहे? मी कोणाला मोक्षाला पाठवूं?’ हें त्याचें भाषण ऐकून जे भिक्षू अवीतराग असत त्यांना भय वाटत असे. पण जे वीतराग असत त्यांना त्याचें कांहींच वाटत नसे. मिगलंडिक दररोज एकपासून साठपर्यंत भिक्षु ठार मारूं लागला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel