१४४. राजाचीं कर्तव्यें.

(संभव जातक नं. ५१५)


प्राचीनकाळीं कुरुराष्ट्रांत इंद्रप्रस्थ राजधानींत धनंजय, कौरव्य नावाचा राजा राज्य करीत असे. सुचीरत नावाचा त्याचा पुरोहित होता. एके दिवशीं राजा त्याला म्हणाला, ''राजधर्म कोणता हें मला संक्षेपानें सांग.'' पुरोहित म्हणाला, ''महाराज, हा प्रश्न थोडक्यांत सोडवितां येण्यासारखा नाहीं. आमच्या सर्व राष्ट्रांत विदुर पंडिताला मात्र या प्रश्नाचें संक्षेपानें उत्तर देतां येईल.'' राजा म्हणाला, ''असें आहे तर तुम्ही ताबडतोब विदुराजवळ जाऊन तो या प्रश्नाचें जें उत्तर देईल तें मला कळवा.''

राजाच्या इच्छेप्रमाणें पुरोहित ब्राह्मण विदुराजवळ गेला. आणि त्याला म्हणाला, ''पंडितश्रेष्ठ राजधर्माचें संक्षेपानें आपण कथन करावें अशी आमच्या महाराजांची इच्छा आहे.''

विदूर म्हणाला ''हे ब्राह्मणश्रेष्ठ सध्यां गंगेच्या प्रवाहाला आळा घालण्याच्या प्रयत्‍नांत मी गुंतलों आहे. तेव्हां आपल्या प्रश्नाचें उत्तर देण्यास मला पळाचा अवकाश नाहीं.'' (गंगेचा प्रवाह वळविण्यांत गुंतलों आहे याचा अर्थ टीकाकारानें व्यापारांत गुंतलों आहे असा केला आहे. परंतु हा अर्थ बरोबर नाहीं असें वाटतें. या अर्थी विदुराचें म्हणणें असें असावें कीं, गंगेच्या प्रवाहासारखा वहाणारा लोकप्रवाह मी नीतीच्या उपदेशानें वळवूं पहात आहे आणि या अशक्य कामांत गुंतल्यामुळें मला अशा लहान सहान प्रश्नांचीं उत्तरें देण्यास सवड नाहीं.)

ब्राह्मण म्हणाला, ''जर तुम्ही या प्रश्नाचें उत्तर दिलें नाहीं तर दुसरा कोण देईल बरें ?'' विदुर म्हणाला, ''माझा वडील मुलगा भद्रकार याजपाशीं तुम्ही जा, तो या प्रश्नाचें समर्पक उत्तर देईल.''

तेव्हां ब्राह्मणानें त्याच्याजवळ जाऊन त्यालाहि हा प्रश्न विचारिला. तो म्हणाला, ''पुरोहित महाराज, मी तुम्हांला एक गोष्ट सांगतों. एक मनुष्य जंगलांतून मांसानें भरलेली कावड घेऊन चालला होता. इतक्यांत त्याला एक घोरपड दिसली. जवळ असलेल्या मांसानें संतुष्ट न होतां तो मनुष्य कावड खालीं ठेवून त्या घोरपडीच्या मागें लागला. इकडे कांहीं चोर त्या रस्त्यानें जात होते. त्यांनीं ती कावड लांबविली. अर्थात् त्या मनुष्याचें 'इदं च नास्ति न परं च लभ्यते' आतां ही गोष्ट सांगण्याचें कारण हेंच कीं, माझ्या हातांतील परोपकाराचीं कामें सोडून तुमच्या प्रश्नाची उठाठेव करण्यांत मी गुंतलों असतां माझीहि स्थिती त्या माणसासारखी होईल. म्हणून तुम्ही माझा वेळ न घेतां माझा धाकटा भाऊ संजय याजकडे जाऊन आपल्या प्रश्नाचा खुलासा करून घ्या.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel