पण बोधिसत्त्वाचा धीर मात्र खचला नाहीं. सकाळच्याच प्रहरीं त्यानें आसपासची जमीन तपासून पाहिली. जवळच्या एका लहानशा झुडपाखालीं त्याच्या पहाण्यांत दूर्वा आल्या. तेव्हां त्यानें असें अनुमान केलें कीं, खालीं असलेल्या पाण्याच्या झर्‍याच्या ओलाव्यानें त्या जिवंत राहिल्या असाव्या. तो आपल्या लोकांजवळ येऊन त्यांना म्हणाला, ''गडे हो, आतां निजण्यांत अर्थ नाही. आपण जर हताश होऊन पडलों, तर आपणाला मरणोत्तरदेखील सद्‍गति मिळावयाची नाहीं. मृत्यु यावयाचाच असला तर तो प्रयत्‍नांनीं येऊं द्या. हताश होऊन मरणें हें शूराला शोभण्यासारखें कृत्य नाहीं. चला ! आमच्याजवळ जेवढ्या कुदळी, खोरी आणि पाट्या असतील तेवढ्या घेऊन आपण त्या पलीकडच्या झुडुपाजवळ खणून पाहूं, तेथें पाणी लागण्याचा संभव आहे.''

त्या मनुष्यांनी त्या झुडुपाजवळ एक मंडप उभारला व त्याखाली खोदण्यास आरंभ केला. पुष्कळ खोल खड्डा खणण्यांत आला; तथापि पाण्याचा पत्ता लागेना; इतक्यांत एकाची कुदळ जाऊन दगडावर आदळली ! तेव्हां त्या सार्‍यांची पूर्ण निराशा झाली ! परंतु बोधिसत्त्व मात्र डगमगला नाहीं. तो त्या खड्डयांत खालीं उतरला आणि त्या खडकाला त्यानें कान लावून पाहिला. तो खडक इतका पातळ होता कीं, त्याच्या खालून वाहणार्‍या झर्‍याचा आवाज स्पष्टपणें ऐकुं येत होता. बोधिसत्त्व आपल्या स्वतःच्या नोकरास हांक मारून म्हणाला, ''गड्या पहार घेऊन इकडे ये, आणि या दगडावर चार धक्के मार पाहूं कसे. आतां हातपाय गाळून बसण्याची वेळ नव्हे. ऊठ चल लवकर !''

नोकरानें भली मोठी पहार घेऊन त्या दगडावर जोरानें चार पांच प्रहार केले. तेव्हां तो दगड दुभंग होऊन खालच्या झर्‍यांत पडला. झर्‍याचा प्रवाह अडवला गेल्यामुळें पाण्याची धारा एकदम वर उडाली ! सगळ्या लोकांनी स्नान केलें व खाऊनपिऊन ते संतृप्‍त झाले. बोधिसत्त्वाच्या धीराची जो तो प्रशंसा करूं लागला. पाणी आहे असें दर्शविण्यासाठीं त्या ठिकाणी एक ध्वज उभारून ते लोक बोधिसत्त्वाबरोबर त्या कांतारांतून सुरक्षितपणें पार पडले.

* वाळूच्या कांतारीं यत्‍न करुनि लाभलें तयां पाणी ॥
साधु स्वयत्नें मिळावी शांतीची मानसीं तशी खाणी ॥१॥
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* मूळ गाथा--
अकिलासुनो वण्णुपथे खणन्ता अदंगणे तत्थ पयं अविन्दुं ।
एवं मुनी विरियबलूपपन्नो अकिलासु विन्दे हदयस्य सान्तिं ॥
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel