त्यावर ब्रह्मदत्ताचा सारथी म्हणाला, ''वाहवारे गुण ! आमच्या राष्ट्रांत अशा गोष्टींना आम्ही गुण समजत नसतों. यांना जर गुण म्हणावें तर दोष कोणते ? आमच्या राजाचे गुण याहून फारच निराळे आहेत. त्यांतले कांहीं ऐकण्याची तुझी इच्छाच असली तर ऐकून घे. * आमचा राजा अक्रोधानें क्रोधास जिंकतो; दुष्टाला साधुत्वानें जिंकतो; कृपणाला दानानें जिंकतो, व खोटें बोलणार्‍याला सत्यानें जिंकतो. असा हा राजा आहे. तेव्हां आमच्याच रथाला तूं वाट दिली पाहिजे.''
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* मूळ गाथा --
अक्कोधेन जिने कोधं असाधुं साधुना जिने ।
जिने कदरियं दानेन सच्चेनालीकवादिनं ।
एतादिसो अयं राजा मग्गा उय्याहि सारथी ॥
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हें त्या सारथ्याचें भाषण ऐकल्याबरोबर मल्लिक राजा रथांतून खालीं उतरला, आणि बोधिसत्त्वाच्या जवळ जाऊन नमस्कार करून म्हणाला, ''इतके दिवस माझे दोष दाखवून देणार्‍या मनुष्याचा मी शोध करीत होतों; परंतु माझ्या राज्यांत एक देखील माणूस माझे दुर्गुण मला दाखवून देऊं शकला नाहीं. आज आपल्या आकस्मित दर्शनानें माझे दोष मला कळून आले. तेव्हां आपण मला गुरूसारखे वंद्य आहां.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''हा तुमचा दोष नसून परिस्थितीचा दोष आहे. व्यवहारांत सामान्य लोक 'जशास तसें' अशा आचरणाला महत्त्व देत असतात. परंतु अशा वर्तनानें जगाच्या सुखांत भर न पडतां दुःख वाढत जाईल, ही गोष्ट त्यांच्या लक्षांत येत नाहीं. खरें म्हणाल तर दुष्टांना साधु उपायांनीं जिंकावें या सारखा दुसरा राजधर्म नाहीं.''

याप्रमाणें बोधिसत्त्वानें मल्लिकाला उपदेश करून वाराणसीचा रस्ता धरला. मल्लिक राजाहि बोधिसत्त्वाला वंदन करून आपल्या राजधानीला गेला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel