१३. गरिबी बरी.

(मुनिक जातक नं. ३०)

वाराणसींत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असतां बोधिसत्त्व एका कुणब्याच्या गाईच्या उदरीं जन्माला आला. त्याचें नांव महालोहित असें होतें, व त्याच्या भावाला चुल्ललोहित म्हणत असत. त्या घरची सर्व शेती ह्या दोघांवर अवलंबून असे. पण त्यांना खावयाला कडबा व भुसा ह्यांशिवाय दुसरे उंची पदार्थ मिळत नसत. त्याच कुणब्याच्या घरी मुनिक नांवाचा एक डुकर होता. त्याची मात्र चैन असे. त्याला पेज, भात वगैरे पदार्थ यथास्थित देण्यांत येत असत.

तें पाहून चुल्ललोहित महालोहिताला म्हणाला, ''दादा, हा काय बरें अन्याय ! आम्हीं ह्या कुटुंबाची सर्व शेतें नांगरतों आणि आम्हांला खावयाला फार झालें तर भुसा. पण ह्या मुनिकाची, कांहीं काम न करतां, कशी चैन चालली आहे पहा ! सकाळीं उठून पेज भात खाऊन डुरुं डुरुं करीत इकडे तिकडे खुशाल फिरत असतो.''

महालोहित म्हणाला, ''बा चुल्ललोहिता, तूं असा उतावळा होऊं नकोस. आमच्या मालकाच्या मुलीचें वर्षसहामहिन्यांत लग्न व्हावयाचें आहे, त्या वेळीं मुनिकाची काय स्थिती होते तें पहा; आणि तोंपर्यंत कडब्याभुशांतच संतोष मान.''

यजमानाच्या मुलीच्या लग्नसमारंभाच्या दिवशीं चुल्ललोहित वडील भावाजवळ त्वरेनें धांवत आला, आणि आश्चर्यचकित मुद्रेनें म्हणाला, ''दादा, तुम्हीं जें म्हणत होतां त्याचा आज अनुभव आला. मुनिकाचे हातपाय बांधून तो आरडाओरड करीत असतां यजमानाच्या नोकरांनीं त्याचा गळा अत्यंत प्रखर सुरीनें चिरला व त्याचे तुकडे तुकडें केले.''

महालोहित म्हणाला, ''ह्याजसाठीं त्याला पोसण्यांत आलें होतें. रिकामटेकडेपणें जो चैन करतो त्याची अशीच स्थिती होते. श्रम करून खाल्लेला कडबा भुसा चांगला; कारण तें दीर्घायुष्याचें लक्षण होय.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel