१३६. मित्रामित्रांची लक्षणें.

(मित्तामित्तजातक नं. १७३)


एकदां बोधिसत्त्व वाराणसीच्या राजाचा प्रधान झाला होता. त्याला राजानें एके दिवशीं मित्रामित्रांची लक्षणें विचारिलीं असतां तो म्हणाला ः- (१) पाहिल्याबरोबर प्रमुदित होत नाहीं; (२) अभिनंदन करीत नाही; (३) आस्थेनें आपणाकडे पहात नाहीं; (४) आपल्या मताविरुद्ध वर्तन करितो; (५) आपल्या शत्रूंचा सहवास धरितो व मित्रांची संगति धरत नाहीं; (६) आपली स्तुति करणार्‍याला विरोध करितो; (७) आणि निंदा करणार्‍याला उत्तेजन देतो; (८) आपलें स्वतःचें इंगीत कळूं देत नाहीं; (९) व आपलें इंगीत सांगितलें असतां तें गुप्‍त ठेवित नाहीं; (१०) आपल्या वर्तनाची निंदा करितो; (११) आपल्या शहाणपणाची टर उडवितो; (१२) आपली अभिवृद्धि ज्याला आवडत नाही; (१३) व हानि आवडते; (१४) घरीं कांहीं भोजनसमारंभ असला, तर ज्याला आपली आठवण होत नाहीं; (१५) आणि आपणावर सतत प्रेम करीत नाहीं हा आपला अमित्र आहे असें समजावें. कांकीं, वर सांगितलेलीं हीं अमित्रांची लक्षणें होत.

आतां मित्रांचीं लक्षणें सांगतों ः-
(१) आपलीं तीं तीं भाषणें स्मरतो; (२) पाहिल्याबरोबर आपलें अभिनंदन करतो; (३) आपणावर अत्यंत प्रेम करतो; (४) आणि सतत गोड शब्द बोलतो; (५) आपल्या मित्रांचीच मैत्री करतो; (६) व अमित्रांची करीत नाहीं; (७) निंदेचें निवारण करितो; (८) आणि स्तुति करणाराला उत्तेजन देतो; (९) स्वतःचें इंगीत सांगतो; (१०) व आपलें इंगीत सांगितलें असतां त्याचा स्फोट होऊ देत नाहीं; (११) आपल्या कृत्याची प्रशंसा करितो; (१२) प्रज्ञेची प्रशंसा करितो; (१३) आपल्या वृद्धीबद्दल ज्याचा आनंद होतो; (१४) व हानीबद्दल दुःख होतें; (१५) भोजनसमारंभादिक प्रसंगीं आपली ज्याला आठवण झाल्यावांचून रहात नाहीं; (१६) जो आपणावर सतत अनुकंपा करितो; आपल्या लाभाविषयीं आस्था बाळगतो तो खरा मित्र होय. कां कीं, सूज्ञजन व सांगितलेल्या १६ लक्षणांनीं मित्रांची पारख करितात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel