७६. मूर्खाला मौन शोभतें.

(सीहचम्मजातक नं. १८९)


एकदां बोधिसत्त्व एका गांवांत शेतकरी होऊन रहात असे. त्या समयीं एक फेरीवाला एका गाढवावर आपलें सामान घालून दारोदारी त्या सामानाची विक्री करून आपला निर्वाह करीत असे. गाढवाला चारा वगैरे देण्यासाठीं पैसे खर्च होऊं नयेत म्हणून त्यानें एक युक्ती योजिली होती. कोठून तरी एक सिंहाचें चामडें पैदा करून त्यानें तो आपल्या गाढवाला आच्छादित असे आणि लोकांच्या शेतांतून सोडून देत असे. गाढव यथेच्छ खाऊन परत आपल्या धन्याजवळ येत असे. हा प्रकार पुष्कळ दिवस चालला होता. एके दिवशीं तो फेरीवाला त्या गाढवाला घेऊन बोधिसत्त्व रहात होता त्या गांवीं आला. गांवाच्या वेशीजवळ गाढवावरील सामान उतरून घेऊन सिंहाच्या चामड्यानें झाकून त्याला त्यानें एका जवाच्या शेतांत सोडून दिलें; आणि तो आपल्या जेवणाच्या तयारीस लागला. इकडे त्या शेताचा राखणदार सिंह आला असें वाटून घाबरून गेला आणि धांवत जाऊन इतर शेतकर्‍यांना त्यानें ही खबर दिली. तेवहां बोधिसत्त्व म्हणाला, ''आपण शेतांत जाऊन सिंह कसा असतो तें तरी पाहूं. घाबरण्याचें कांहीं कारण नाहीं. दूर अंतरावरून वाद्ये शंख वगैरे वाजवल्यावर तो पळून जाईल. कदाचित् आपल्यावर चाल करून आलाच तर आपण दांडक्यांनीं त्याला बडवून काढूं.''

बोधिसत्त्वाला पुढारी करून सर्व गांवकरी त्या शेताजवळ गेले आणि वाद्यें वाजवून, त्यांनीं एकच घोष केला, व मोठमोठ्यानें आरोळ्या ठोकल्या. तो गाढव हा घोष ऐकून फार घाबरला, आणि जातिस्वभावाला अनुसरून ओरडूं लागला. तेव्हां बोधिसत्त्व जमलेल्या लोकांना म्हणाला, ''अहो ही सिंहाची किंवा व्याघ्राची आरोळी नव्हे. सिंहाच्या कातड्याखालीं हा हलकट गाढव ओरडत आहे.''

तेव्हां त्या शेतकर्‍यांनीं त्याच्यावर हल्ला करून त्याचें तें कातडें काढून घेतलें व त्याला बेदम मार दिला. तो मरणोन्मुख होऊन तेथेंच पडला. पुष्कळ वेळपर्यंत गाढवाची वाट पाहून त्याचा मालक त्याच्या शोधार्थ गेला. तेव्हां त्याला हा गाढव मरण्याच्या वाटेला लागलेला आढळला. ही त्याची दशा पाहून फेरीवाला म्हणाला, ''बा गाढवा, या सिंहाच्या चामड्याखालीं पुष्कळ दिवस तूं लोकांचीं शेतें खाल्लीं असतींस; परंतु एका ओरडण्यानें तूं हें आपणावर मरण ओढवून घेतलेंस !''

फेरीवाल्याचें हें भाषण संपतें न संपतें तों गाढवानें प्राण सोडला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel