१२४. शुद्ध वस्त्राला डाग शोभत नाहीं.*

(भिसपुप्फजातक नं. ३९२)

एका जन्मीं बोधिसत्त्व ब्राह्मण होऊन वयांत आल्यावर परिव्राजकवेषानें अरण्यांत वास करीत असे. तेथें एका तलावांत सुंदर कमळें उत्पन्न होत असत. एके दिवशी एक जटिल तापस त्या तलावांत स्नानासाठीं आला होता. त्यानें कमलिनी मुळासकट उपटून टाकिल्या व पुष्कळ कमळें तोडून त्यांची माला करून गळ्यांत घालून चालता झाला. त्यावेळीं बोधिसत्त्वहि स्नानासाठीं तेथें आला होता. तो मनांत म्हणाला, ''काय हा अधम तपस्वी ! या सुंदर कमळांची त्यानें कशी नासाडी करून टाकिली बरें ! आहा ! किती तरी सुशोभित कमळें हीं ! आणि यांच्या शोभेला अनुरूप सुगंधहि असला पाहिजे.''
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* हीच गोष्ट वनसंयुत्तांत सांपडते. तेथें ही एका भिक्षूची म्हणून दिली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
असे उद्‍गार काढून तो त्या सरोवरांत उतरला आणि एक कमळ वांकवून हळूच त्याचा वास घेऊ लागला. तें त्याचें कृत्य पाहून तलावाच्या कांठीं रहाणारी वनदेवता त्याला म्हणाली, ''भे परिव्राजक, हें तूं काय चालविलें आहेस ? हें कमळ तुला कोणीहि न देतां याचा तूं वास घेत आहेस, ही एक प्रकारची चोरी नव्हे काय ? मी तर तुला सुगंधाचा चोर असें म्हणत्यें ?''

बोधिसत्त्वाला देवतेचें भाषण ऐकून फारच विस्मय वाटला आणि तो म्हणाला, ''नुकत्याच आलेल्या जटिलानें कमलिनी उपटून टाकिल्या, कमळें तोडून नेलीं, आणि सर्व प्रकारें या तलावाच्या शोभेची हानि केली. असें असतांहि तूं त्याला एक शब्द देखील बोलली नाहींस ! परंतु मला मात्र उपदेश करावयास पुढें सरसावलीस हें मोठें आश्चर्य नव्हे काय ?''

देवता म्हणाली, ''तुला त्या जटिलाचा इतिहास माहित नाहीं. पापकर्मांनीं याचें अंतःकरण इतकें मलिन झालें आहे कीं, या त्याच्या यःकश्चित् कृत्यानें त्यावर आणखी डाग पडण्यास जागा राहिली नाहीं. मुलांना संभाळणार्‍या दाईचें लुगडें जसें घाणेरडें असतें तसा तो घाणेरडा आहे. त्याला म्यां काय सांगावें ? परंतु तुला उपदेश करणें योग्य आहे असें मला वाटतें. कांकीं, तुझें वर्तन शुद्ध आहे. आणि त्यावर या अत्यल्प पापकर्माचा डाग शोभत नाहीं. जो मनुष्य आजन्म सदाचरण करितो त्यावर केसाएवढा देखील दुराचरणाचा डाग पडलेला एकदम लोकांच्या नजरेस येतो. म्हणून तुला सावध करण्यासाठीं आणि अशा लहानसहान पापांपासून निवृत्त करण्यासाठीं मी उपदेश करीत आहे.''

हें त्या देवतेचें भाषण ऐकून बोधिसत्त्व फारच ओशाळला आणि म्हणाला, ''भो वनदेवतें ! मला ओळखून माझा दोष तूं वेळींच दाखवून दिला आहेस. तेव्हां माझी तुला अशी विनंति आहे कीं, पुनः माझ्या हातून असें कृत्य घडलें तर मला सांगत जा.''

देवता म्हणाली, ''भो प्रव्रजित ! मी कांहीं तुझी दासी नाहीं किंवा वेतन घेऊन काम करणारी मोलकरीणहि नाहीं, तेव्हां तुझ्या बरोबर फिरत राहून तुझे दोष दाखवण्याचें मला काय प्रयोजन बरें ? जेणें करून सद्‍गतीला जाशील असा मार्ग तुझ्या तुंवाच शोधून काढला पाहिजे. दुसरा तुला उपदेश करील आणि सन्मार्गाला लावील याची वाट पहात बसूं नकोस !

बोधिसत्त्वानें देवतेचे आभार मानल्यावर ती तेथेंच अंतर्धान पावली. आपल्या शुद्धाचरणावर पापाचा डाग पडूं नये या बद्दल बोधिसत्त्वानें आमरण फार काळजी घेतली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel