अपकारी आला द्वारीं उभा ठेला । दुःखें पीडियेला शांतवी जो ॥१॥
तोचि साधु भला नको टिळे माळा । देवाला कंटाळा सोंगाचा ह्या ॥२॥
दया क्षमा शांति नित्याचे सांगाती । क्रोध नसे चित्तीं देव तोचि ॥३॥
अभय अचल मन तें निर्मळ । जैसें गंगाजळ वंद्य लोकीं ॥४॥
स्वप्नीं परनिंदा नसे नीच धंदा । परोपरी वंदा जीवें भावें ॥५॥
देहदंड खंड पापाचें उदंड । मायामय बंड जेथें नसे ॥६॥
राही तो स्मशानीं ’रंग’ जनीं वनीं । साक्षाज्जनार्दनीं भेद नसे ॥७॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.