ती स्त्री एक पोलिस अधिकारी असून एका तरुणीच्या खुनाच्या प्रकरणासंदर्भात तपास कार्य सुरु असताना ह्या मंत्र्याचा त्यात सहभाग असल्याचे तिच्या लक्षात आले होते. ज्यावेळी तिने त्या मंत्र्याच्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवले त्याचवेळी तिला मंत्र्याच्या सर्व भ्रष्ट कारस्थानांचा अंदाज आल्यामुळे तिने त्या संदर्भातील पुरावे गोळा करून त्या मंत्र्याविरुद्ध कारवाई केली. परंतु त्या मंत्र्याने आपल्या पद आणि प्रतिष्ठेचा वापर पोलीस यंत्रणाच आपल्या बाजूने वळवून घेतली आणि त्या स्त्री पोलिस अधिकारीवरच भलते-सलते आरोप करून तिला, तिच्या नोकरीवरून बडतर्फ करण्यात येईल अशी व्यवस्था केली. इतके करूनही तो शांत बसला नाही. तिची प्रसारमाध्यमांवर बदनामी करून त्याने तिची अत्यंत दयनीय अवस्था केली होती.

आपल्यावर तसेच इतरांवर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध म्हणून तिने त्या मंत्र्याचा खरा चेहरा समाजासमोर आणण्यासाठी तब्बल दोन वर्षे प्रयत्न करून, मंत्र्याच्याविरूद्धचे सर्व पुरावे एकत्र केले होते. पण तरीही तिला ह्या सर्व गोष्टी मंत्र्याच्या तोंडून ऐकायच्या होत्या. तिच्याबरोबर बंदूक घेऊन असलेला दुसरा व्यक्ती त्या पिडीत तरुणीचा पिता होता. जिच्यावर त्या मंत्र्याने अत्याचार करून तिचा खून घडवून आणला होता. खरेतर तो याआधीच त्या मंत्र्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार होता; पण ह्या पूर्व पोलिस अधिकारी तरुणीने त्यावेळची परिस्थिती बघून त्याला तसे करण्यापासून कसे बसे रोखले होते. कारण मंत्र्याच्या तोंडून त्याने केलेल्या गुन्ह्यांचे सत्य तिला जगासमोर आणायचे होते. बंदुकीचा धाक दाखवताच तो मंत्री पोपटासारखा बोलू लागला आणि बघता बघता त्याने एक-एक करत आपले सर्व गुन्हे कबुल केले. मंत्र्यांच्या मुखातून निघालेल्या या सर्व गोष्टी तिने आपल्या जवळील टेपरेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या. कायद्याची पर्वा न करता प्रसंगी चुकीच्या मार्गाने का होईना पण आज मंत्र्यांच्या तोंडून त्याच्या सर्व गुन्ह्यांची कबुली घेऊन, तिने खून झालेल्या पिडीत तरुणीलाच नव्हे तर तिच्यासारख्या असंख्य पीडितांना न्याय मिळवून दिला होता. तिच्या या कार्यात तिला पोलिस खात्यातील काही व्यक्तींनी गुप्तपणे सहाय्य पुरवले होते. म्हणूनच ती सुरक्षितपणे हे कार्य सिद्धीस नेऊ शकली होती. मंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आल्यावर तिच्याबरोबर असलेल्या पिडीत मुलीच्या पित्याने मंत्र्याची गोळी मारून हत्या केली आणि नंतर पोलिसांना आपल्या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली.

प्रकाशच्या डोळ्यासमोर मंत्र्याचा खून झाला होता. त्यामुळे त्याला आता नागराजसाठी दुसरा मनुष्य पकडावा लागणार होता. आपल्या हाती घेतलेले कार्य विसरून प्रकाश त्या तरुण पोलिस अधिकारीचा विचार करू लागला होता. त्याच्या इतक्या वर्षाच्या आयुष्यात असे पहिल्यांदाच घडले होते. ज्यावेळी त्याने तिच्या डोळ्यात बघून तिचा जीवनपट पहिला त्याच वेळी तिने प्रकाशच्या मनावर आपली छाप सोडली होती. त्याच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता.

माता-पित्याचा पत्ता नसलेली, अनाथ आश्रमात लहानाची मोठी झालेली, जिचे बालपण दिवसभर काबाड-कष्ट करण्यामध्ये व्यतीत झाले, मिळेल ते काम कसलीही तक्रार न करता मुकाट्याने करून स्वबळावर शिक्षण आणि नोकरी मिळवून आपल्या कमाईचा अर्धा हिस्सा अनाथांसाठी खर्च करणारी, नेहमीच माणसांच्या मायेपासून दुरावलेली तरीही प्रत्येकाबद्दल मनात प्रेम असणारी ती तरुणी म्हणजेच किरण. प्रकाशच्या आजवरच्या आयुष्यात त्याला इतके प्रभावित कोणीही केले नव्हते. तिच्या शारिरीक सुंदरतेपेक्षा तिच्या मनाच्या सुंदरतेनेच प्रकाशला अधिक मोहित केले होते. त्याने तिला पाहिल्यानंतर त्याच्या मनात सतत तिचेच विचार येऊ लागले होते. गेली कित्येक वर्षे ध्यानधारणा करून ज्याने आपल्या मनावर विजय मिळवला होता; आज त्याच प्रकाशचे मन किरणच्या विचाराने भरकटले होते. त्या घटनेनंतर जवळपास वर्षभराने किरण पुन्हा त्याच्यासमोर आली, ती घटना त्याला आठवू लागली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel