नागतपस्वी बोलू लागले.

"प्रकाश तुला आतापर्यंत नागप्रजातीबद्दल बरीच माहिती मिळाली आहे. पण काही गोष्टी तुला अद्याप  माहिती नाहीत. त्या नीट लक्षपूर्वक ऐक."

"लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर नागांचे साम्राज्य होते. त्यावेळी मनुष्याचा पूर्णपणे विकास झाला नव्हता. तेव्हा तो सतत भ्रमण करत असे. तेव्हाचा मनुष्य आपल्या अल्पबुद्धीमुळे झाडे आणि गुहा यांनाच आपल्या जीवनाचा आधार मानत असे. त्यावेळी पृथ्वीवर मनुष्याची संख्या फारच कमी होती. तर नागांसारख्या अंडज जीवांची संख्या मानवाच्या लाखो पटींनी अधिक होती, साहजिकच, शक्तिहीन आणि अल्पसंख्येमुळे मनुष्यावर सुद्धा नागांची सत्ता होती. तेव्हा मनुष्य नागांचा गुलाम होता."

"त्या काळात पृथ्वीवर नागांबरोबरच देव,दैत्य,राक्षस, दानव, यक्ष, गंधर्व, गरुड यांसारख्या जीवांची ही उत्पत्ती झाली होती. या सर्व जीवांकडे अलौकिक शक्तीसामर्थ्य होते. या सर्व जीवांच्या प्रजाती आपापसांत सत्तेसाठी व एकमेकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी युद्धे करत असत. ज्यांचे दुष्परिणाम पृथ्वीवरील शक्तिहीन मनुष्यालाच जास्त भोगावे लागत होते. या सर्व प्रजातींमध्ये सतत युद्धे होऊन, त्यांच्या वृत्तीनुसार त्यांचे विविध गट पडू लागले. ह्या प्रजातींमधील सत्वगुण आणि तमोगुण त्यांच्यातील भिन्न प्रवृत्तींचा आधार होता. इतर प्रजातींपेक्षा देव आणि दानव आपल्यातील रजोगुणामुळे एकमेकांशी सतत युद्धे करीत होते. परंतु, देवतांच्या अंगी राजोगुणाबरोबरच सत्वगुणाची अधिकता होती. तर दैत्यांच्या अंगी तमोगुणाची अधिकता होती. काळाच्या ओघात ह्या प्रजातींच्या भिन्न प्रवृत्तींमुळे त्यांचे दोन गटात विभाजन झाले. देवांच्या बाजूने गंधर्व आणि यक्ष होते, तर दैत्यांच्या बाजुने दानव आणि राक्षस होते. गरुड आणि नाग यांचे आपापसात मोठे वैर होते. त्यामुळे ते कधी देवांच्या तर कधी दैत्यांच्या बाजुने युद्ध करीत होते. ह्या सर्व प्रजातींमध्ये मनुष्य दिव्य शक्तीच्या अभावी एकटा पडला होता."

"बऱ्याच काळापासून नागांच्या गुलामगिरीत असलेला त्यावेळचा मनुष्य वर्ग कधी देवांच्या तर कधी दैत्यांच्या बाजूने असे. परंतु, शक्तिहीन असलेल्या मनुष्याच्या, असल्या किंवा नसल्यामुळे इतर प्रजातींवर त्याचा फारसा काही प्रभाव पडत नसे."

"पुढे नागांची आणि गरुडांची सतत युद्धे होऊ लागली. युद्धांमध्ये गरुड नागांपेक्षा श्रेष्ठ ठरले. गरुडांनी नागांच्या अनेक प्रजाती नष्ट केल्या. त्याचप्रमाणे देवांनी यक्ष आणि गंधर्वाच्या सहाय्याने दैत्यांचा, दानवांचा आणि राक्षसांचा मोठ्या प्रमाणावर संहार घडवून आणला. त्यानंतरच्या काळात गंधर्व आणि यक्ष देवांबरोबर स्वर्गात राहू लागले. तर उरले सुरलेले दानव आणि राक्षस दैत्यांबरोबर पाताळात शांततेने राहू लागले."

"इतर प्रजातींमधील सततची युद्धे थांबल्याने व  पृथ्वीवरील नागांची संख्या घटल्याने मनुष्य जीवन स्थिरावले. त्याच काळात मनुष्याने आपल्या जीवनात भरपूर प्रगती केली. त्याचबरोबर पृथ्वीवरील  मनुष्याची संख्याही झपाट्याने वाढु लागली. त्यामुळे आता संख्येने कमी असलेल्या नागांना मनुष्यावरची आपली सत्ता टिकवून ठेवणे फार कठीण झाले. कालांतराने मनुष्याने नागांमध्ये भिती आणि त्यांच्या नाग प्रजातीवरील सत्तेचा लोभ निर्माण करून, आपल्या चातुर्याने नागांशी पृथ्वीवरुन निघून जाण्यासाठी करार केला."

"मनुष्याशी झालेल्या करारानंतर, पृथ्वीवरील इच्छाधारी नागांचे अस्तित्व आता जवळ जवळ नष्टच झाले होते. हजारो वर्षापूर्वी देव आणि दानव यांनी सृष्टीच्या कल्याणाकरीता प्रथमच एकत्र मिळून केलेल्या समुद्र मंथनात नागांचा राजा वासुकीने आणि त्याचबरोबर इतर नागांनाही महत्वाची भुमिका बजावली होती. जर वासुकी नसता, तर समुद्रमंथन झालेच नसते. या गोष्टीचा आता सर्वांनाच विसर पडला होता. भगवान शिवाने ज्याला एखाद्या अलंकाराप्रमाणे आपल्या गळ्याभोवती गुंडाळून नाग प्रजातीला धन्य केले, त्या तक्षक नागाच्या प्रजातीचे महत्वही आता कमी झाले होते. समुद्र मंथनाच्यावेळी समुद्रातून बाहेर आलेले विष भगवान शंकरांनी प्राशन केले. पण त्याचबरोबर त्या विषाचा एक अंश नागांनीही सृष्टीच्या कल्याणाकरिता स्वखुषीने प्राशन केला. ज्यांनी आपल्या शरीरात विषाला स्थान दिले आणि त्या विषाच्या दुष्परिणामामुळे जे स्वतः विषारी बनले अशा नागांचे हे थोर उपकार आता कोणाच्याच ध्यानात नव्हते. शेषनागाने सतत गतिशील असणाऱ्या पृथ्वीला स्थिर ठेवण्यासाठी, आपल्या मस्तकावर धारण केले. क्षीरसागरात भगवान विष्णू सदैव शेषनागाच्या शरीररुपी आसनावर विराजमान असतात. ह्या गोष्टी आता निव्वळ दंत कथा म्हणून शिल्लक राहिल्या होत्या. थोडक्यात काही दृष्ट नागांमुळे पराक्रमी, परोपकारी व त्यागी नागांचेही, पृथ्वीवरील महत्व आता कमी झाले होते. त्यांचे महत्व आता फक्त नागपंचमी पुरतेच मर्यादित राहिले होते."
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Sayali Raje

Dear team Bookstruck. Please provide more such stories.

हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel

Books related to नागमणी एक रहस्य


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
अजरामर कथा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
झोंबडी पूल
श्यामची आई
खुनाची वेळ
लोकभ्रमाच्या दंतकथा
गांवाकडच्या गोष्टी
गावांतल्या गजाली
पैलतीराच्या गोष्टी
रत्नमहाल
 भवानी तलवारीचे रहस्य