दोन दिवसांपासून प्रकाश ध्यानाला बसला होता. अद्याप त्याने आपले नेत्र उघडले नव्हते. काहीही झाले तरी त्याला ध्यानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये, असे त्याने मोहनला सांगितले होते. म्हणून तो प्रकाशच्या ध्यानातून बाहेर येण्याची वाट बघत होता. ज्यावेळी प्रकाशने आपले नेत्र उघडले, त्यावेळी तो घामाने डबडबलेला होता.  त्याला ध्यानाच्या माध्यमातून काहीतर महत्वाची गोष्ट समजली असणार हे अनंताने ओळखले होते. पण मोहनला मात्र याबद्दल जाणून घेण्याची घाई होती. म्हणून त्याने प्रकाशकडे त्याबद्दल विचारणा केली असता नागराजने, नागतपस्वींना मृत्यूदंड दिल्याचे त्याने मोहनला सांगितले. प्रकाशचे बोलणे ऐकूनही अनंताला त्याबद्दल आश्चर्य वाटले नाही. कदाचित अनंताला ह्या गोष्टीची आधीच जाणीव झाली असावी, असा अंदाज मोहनने बांधला. प्रकाशचे बोलणे सुरु असतानाही तो शांतच होता. त्यामुळे त्याला नागतपस्वींच्या जाण्याचा धक्का बसला असावा. असे मोहनने प्रकाशला सांगितले. तितक्यातच मनाशी कसलातरी निर्धार करून अनंता आपल्या जागेवरून उठून उभा राहिला.

"मोहन, प्रकाश... मी नागलोकी जात आहे. आता जोपर्यंत मी त्या नागराजला यमसदनी पोहोचवत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. त्याकाळी नागतपस्वींच्या सांगण्यानुसार मी आपले राजपद त्यागून इथे आलो. आजवर बंधू या नात्याने मी नागराजविषयी कसलीही तक्रार केली नाही. आणि आता तर त्याने पुजनीय नागतपस्वींची... मी आता स्वस्थ बसू शकत नाही." इतके बोलून अनंताने आपले डोळे मिटले परंतु तो तोंडातल्या तोंडात कसलातरी मंत्र पुटपुटू लागला आणि क्षणार्धात तो तिथून अदृश्य झाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel