प्रकाशच्या दिव्य नागमणीच्या तेजानेच, नागलोकातील सर्व नाग भयभीत झाले होते. नागराजने त्याचे पृथ्वीवरून अशाप्रकारे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे कदाचित प्रकाश ह्या गोष्टीचा सूड घेऊ शकतो आणि जर त्याने मनात आणले, तर तो संपूर्ण नागलोकाचे स्मशानभूमीत रुपांतर करू शकतो. अशी अनेक नागांना भीती वाटत होती. प्रकाशच्या मस्तकी असलेल्या अद्भूत नागमणीच्या शक्तीचे सामर्थ्य पाहून, नागलोकातील कित्येक नाग भयभीत झाले होते. आणि आत्तापर्यंत तर प्रकाशची वार्ता संपूर्ण नागलोकी पसरली असणार हे नागराजला चांगलेच ठाऊक होते.

ह्या सर्व गोष्टींचा विचार करताना, नागराजला महाभारताच्या काळातील नागांसाठी भयावह असलेली एक घटना आठवली. अभिमन्यूच्या पुत्राला, म्हणजेच परिक्षीत राजाला मिळालेल्या शापानुसार, तक्षक नागाने त्याला दंश केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अशाप्रकारे एका नागामुळे आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर नागांवर संतापून, ‘जन्मजय’ नामक परिक्षीत राजाच्या पुत्राने, पृथ्वीवरील नागांचा सर्वनाश करण्यासाठी सर्प यज्ञाचे आयोजन केले. त्या यज्ञामुळे पृथ्वीवरील कित्येक नाग मृत्युमुखी पडू लागले. अशा वेळी आपले प्राण संकटात असल्याचे जाणून तक्षक नागाने घाबरून देवराज इंद्राकडे आश्रय मिळवला. त्यावेळी नाग प्रजातीचे अस्तित्व संपवायला निघालेल्या राजा जन्मजयला त्याचवेळी यज्ञ करण्यापासून थांबवणे आवश्यक होते. नाहीतर संपूर्ण नाग प्रजातीचा सर्वनाश अटळ होता. त्यावेळी देवगुरु बृहस्पती यांनी राजा जन्मजयची कशी-बशी समजूत काढून त्याला नागांचा विनाशक ठरलेल्या त्या यज्ञाची समाप्ती करण्यास भाग पडले. म्हणून नागांचा विनाश टळला. ह्या घटनेनंतर नागांना मनुष्याची भीती वाटू लागली. मनुष्य आपल्याजवळील गुप्त विद्येच्या आणि तंत्र-मंत्राच्या सहाय्याने, नागांना त्यांच्यासमोर नमवू शकतो. हे त्याचे उदाहरण झाले होते. त्या घटनेनंतरच मनुष्याशी शत्रुत्व करणे, आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते असे नागांचे मत तयार झाले होते. ही घटना राहून राहून नागराजला सारखी आठवू लागली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel