नागतपस्वी प्रकाशशी बोलत होते. “बाळ प्रकाश तू कोणी सामान्य नाग नसून दिव्य नागमणी असलेला, अलौकिक नागशक्तींचा स्वामी आहेस. तुझ्यामध्ये इतर इच्छाधारी नागांपेक्षा कितीतरी पट अधिक अद्भूत अशा शक्ती आहेत. या पृथ्वीवर तुला सुरक्षितपणे वास्तव्य करता यावे यासाठीच, तुला इतकी वर्षे तुझ्या वडीलांपासून आणि आजोबांपासून दूर राहावे लागले. हे मी जाणतो. तुझ्यासारखा शक्तीशाली सामर्थ्यवान नागाचा पृथ्वीवर मनुष्यरुपात जन्म झाला आहे, हे सत्य नागलोकातील इतर नागांपर्यंत पोहोचू नये,म्हणुनच मी तुझ्या लहानपणी तुझ्यातील नागशक्तींना तुझ्या शरीरातील सप्तचक्रांमध्ये बंदिस्त केले होते. म्हणजेच एका अर्थाने निष्क्रिय केले होते. पण आता मात्र, इतकी वर्षे तुझ्या शरीरात सुप्त अवस्थेत असलेल्या त्या शक्तींना जागृत करण्याची वेळ आलेली आहे.’’ इतके बोलून त्यांनी आपले डोळे मिटले आणि आपला हात प्रकाशच्या मस्तकावर ठेवला. तोंडामध्ये कुठलातरी मंत्र पुटपुटून झाल्यावर, त्यांच्या हातातून दिव्य स्पंदने बाहेर पडू लागली. त्यांच्या हातातून निघणाऱ्या दिव्य लहरी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच जाणवू लागल्या. क्षणार्धातच त्यांनी प्रकाशच्या मस्तकावरील सहस्त्रार चक्रातील शक्तींना जागृत केले. आता त्यांनी आपला हात त्याच्या कपाळावर ठेवला, आणि क्षणार्धातच त्याच्या अज्ञाचक्रातील निष्क्रिय शक्तींना सक्रिय केले. अशाप्रकारे एक-एक करत त्यांनी प्रकाशच्या विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, मणिपुर चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मुलाधार चक्र अशा सप्तचक्रांमधील बंदिस्त नागशक्तींना जागृत केले.

इतकी वर्षे प्रकाशच्या शरीरातील सप्तचक्रांमध्ये कैद असलेल्या शक्तींच्या जागृतीनंतर प्रकाशला आपल्या दिव्य शरीराची अनुभुती होऊ लागली. त्या क्षणानंतर त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होते, याची त्याला साधी कल्पनाही नव्हती. त्याचे मन, त्याचा आत्मा आणि त्याचे शरीर या सर्वच पातळीवरील त्याचे जीवन आता बदलणार होते. आता तो पूर्वीचा सर्व-सामान्य मनुष्य असणारा, प्रकाश रहाणार नव्हता. आता तो खऱ्या अर्थाने एक इच्छाधारी नाग बनला होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel