स्वामी विवेकानंद रामनवमी, गोकुळाष्टमी या दिवशी उपवास करीत. त्याचप्रमाणे पैगंबराची जयंती, पुण्यतिथी या दिवशीही उपवास करीत. हिंदुधर्म सर्व धर्मांना आदरील. अमेरिकेतील सर्वधर्मपरिषदेत विवेकानंद म्हणाले, 'हिंदु धर्म विश्वधर्म होऊ शकेल, कारण तो माझ्यातच सत्य असे मानीत नाही. इस्लाम, ख्रिश्चन धर्म, सर्वामध्ये सत्य आहे असे तो मानतो. सत्याचे बाह्य अविष्कार निराळे. आतील गाभा एकच. 'एक सत् विप्रा बहुधा वदान्त' हे महान् ऐक्यसूत्र हिंदुधर्माने शिकविले आहे.

जगात सर्वत्र द्वेषमत्सर. एकीकडे दुनिया जवळ येत आहे. तर हृदये मात्र दूर जात आहेत. अशावेळेस तुमचा सर्वांचा आत्मा एकच आहे, अशी घोषणा करणारा प्रबळ पुरुष हवा होता. ही घोषणा अमेरिकेत शिकागो येथे स्वामींनी केली. या सर्वधर्मपरिषदेत स्वामींची आधी दादच लागेना. परंतु एके दिवशी त्यांना संधी मिळाली. भगव्या वस्त्रातील ती भारतीय मूर्ती उभी राहिली आणि 'माझ्या बंधू-भगिनींनो' असे पहिलेच शब्द त्या महापुरुषाने उच्चारले आणि टाळयांचा गजर थांबेना. का बरे? त्या दोन शब्दात कोणती जादू होती? त्यांच्या आधी जे जे व्याख्याते बोलून गेले ते सारे 'Ladies and Gentlemen- सभ्य स्त्रीपुरुषहो' अशा शब्दांनी आरंभ करीत, परंतु ही विश्वैक्याची मूर्ती उभी राहिली. सर्वत्र एकता अनुभवणारे ते डोळे, आपलीच आत्मरूपे पाहणारे ते डोळे, प्रेमसिंधूतून बुचकळून वर आलेले ते शब्द! त्या दोन शब्दांनी अमेरिकन हृदय जिंकून घेतले आणि मग ते अपूर्व व्याख्यान झाले. स्वामीजी विश्वविख्यात झाले आणि भारताचा विजयी सुपुत्र घरी आला. मायभूमीने अपूर्व स्वागत केले. विवेकानंद धर्ममूर्ति होते, परंतु त्यांचा धर्म रानावनात जा सांगणारा नव्हता. सभोवती दुर्दशा असताना हिमालयात कोठे जायचे?

महान फ्रेंच साहित्यिक रोमा रोलां याने विवेकानंदावर एक उद्‍बोधक ग्रंथ लिहिला आहे. त्यात तो म्हणतो 'Vivekananda was first a Nation builder then a religious reformer' विवेकानंद हे आधी राष्ट्र निर्माते होते, मग धर्मसुधारक होते. विवेकानंदांचा धर्म राष्ट्राची उभारणी हा होता. भारतावर त्यांचे अपार प्रेम. ते म्हणतात, ''माझ्या बाळपणाचा पाळणा म्हणजे ही भारतभूमी; आणि माझ्या उतार वयातील मोक्षाची वाराणसी म्हणजे हीच भारतमाता. तिचे सारे सारे मला प्रिय आहे. ये पंडिता, तू मला प्रिय आहेस, कारण तू भारताचा आहेस आणि ये अज्ञानी बंधू, तूही मला प्रिय आहेस, कारण तू भारताचाच. सुष्ट वा दुष्ट, ब्राह्मण वा चांडाळ, सारे मला प्रिय. सर्वांना मी हृदयाशी धरीन, सर्वांवर प्रेम करीन.'' भारताची दुर्दशा पाहून ते कासावीस होत. एकदा एका अमेरिकन कोटयधीश कुबेराकडे ते होते. रात्री सुंदर पलंगावर ते निजले होते. तेथले ते वैभव, तो थाटमाट. स्वामीजींना झोप येईना. त्यांना सारखे रडू येत होते. उशी भिजून गेली. तो पलंग त्यांना निखार्‍या प्रमाणे वाटू लागला. ते जमिनीवर झोपले. सकाळी मित्राने विचारले, ''उशी ओलीचिंब कशाने?'' ''मी रात्रभर रडत होतो. अमेरिकेत केवढे वैभव आणि भारतात पोटभर खायलाही नाही.'' ते एका पत्रात लिहितात, ''आपण हिंदुस्थानात पाप केले. त्या पार्थसारथी गोपाळकृष्णाच्या भूमीत स्त्रियांची, अस्पृश्यांची पशूहूनही वाईट स्थिती आपण केली आहे.'' अमेरिकेतील लोकांना ते म्हणायचे, ''कृपा करून हिंदुस्थानला मिशनरी नका पाठवू. मोठी मोठी धर्मतत्त्वे आईच्या दुधाबरोबर तेथे मुलांना मिळतात. रस्त्यातील भिकारी महान् धर्मतत्त्वे सांगणारी गाणी म्हणत जातात. मूठभर भिक्षा घेऊन संबंध हिंदुस्थानभर ते उदारधर्म पसरवीत असतात. भारताला तुम्ही संसार सुखी करणारे विज्ञान, पोटभर जगता येईल असे धंदेशिक्षण द्या.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel