भारतातील प्रांतांची तरी एकमेकास ओळख कोठे आहे? त्या त्या प्रांतांचे सांस्कृतिक कार्य, नवसर्जन आपणास कोठे आहे माहीत?

प्रान्तभारती भारतीयांना एकमेकांची भक्तिप्रेमानें ओळख करून देईल. त्या त्या प्रांतांतील प्रमुखांच्या सर्व तसबिरी तेथे राहतील, हे सारे नवभारत निर्माते असे नवपिढीला सांगण्यात येईल.

केवळ भाषांचा अभ्यास हेच काही या संस्थेचे ध्येय नव्हे तेथे दुसर्‍या ही अनेक चळवळी जोडाव्या असे मनात आहे. कला आणि ग्रामीण जीवन यांचा तेथे अभ्यास व्हावा. ग्रामीण धंद्यातून कला कशी नेता येईल ते तेथे कलावान सांगतील. साध्या चटयाच विणायच्या, परंतु त्यांच्यात सुन्दरता कशी आणता यईल; साध्या बांबूच्याच टोपल्या, परंतु त्यात कला कशी मिसळता येईल, साधी मातीचीच भांडी, परंतु ती रमणीय कशी करता येतील-हेही येथे अभ्यासिले जावे, शिकविले जावे.

म्हणून ग्रामोद्योग तज्ञ व कलावान यांना तेथे सन्मानाचे स्थान राहील. नाना प्रकारचे नृत्य प्रकार-तेही तेथे संग्रहीत करून त्यांचा प्रचार करू. सहकारी जीवनाचे येथे शिक्षण देऊ. जर संस्थेभोवती बरीच जमीन असेल तर फुलझाडे, शेती, फळझाडे यांचे प्रयोग करू. विद्यार्थी श्रमतील, नवीन नवीन निर्माण करतील. माझ्या मनातील स्वप्न अनंत आहे ते कागदावर कोठवर मांडू?

राष्ट्राचे महान ऐक्य जीवनात अनुभवण्याचे मंगल प्रयत्‍न होवोत. निरनिराळया थोर कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी देशातील सर्व प्रकारचे लोक एकत्र श्रमत आहेत असे देखावे राष्ट्रभर दिसू लागले पाहिजेत. हिंदू-मुसलमान, स्पृश्य-अस्पृश्य सारे एकत्र येऊन नवनिर्मिती करत आहेत, भिन्न भिन्न प्रांतीय लोकही परस्परांस प्रेमाने भेटत आहेत, परस्परांच्या संस्था पाहात आहेत, मदत देत आहेत, त्यातून स्फूर्ती घेत आहेत असे व्हायला हवे. भारतीय आत्म्याचे ऐक्यसंगीत अनुभवायला विविध कर्माची सहस्त्रतंत्री भारतभर वाजू लागली पाहिजे. मला अशा भव्य प्रयोगाला कोठे आरंभ करता येईल, प्रभू जाणे !

साहित्याबरोबर तेथे चित्रकला, नृत्यकला यांचाही अभ्यास असावा. सहकारी शिक्षण दिले जावे. नवभारताच्या निर्मितीचे ते एक तीर्थक्षेत्र असावे. माझ्या डोळयासमोर सुंदर स्वप्न आहे. प्रांतभारतीतील मुले सुटीत खेडोपाडी जातील. मेळे, संवाद करतील, स्वच्छता करतील. प्रांतभारतीतून सहकारी चळवळ फैलावायला ध्येयवादी तरुण बाहेर पडतील. ग्रामीण कला येथे फुलतील. कोकणातील काटखेळ, नाना नाच येथे अभ्यासले जातील. मौज-आनंद! सेवा, संस्कृती उदारता, ज्ञान, विज्ञान, कला-एक गंभीर अशी प्रवृत्ती प्रांतभारती निर्मू पाहील.

परंतु हे स्वप्न कृतीत कसे आणायचे? महाराष्ट्रभर भिक्षा मंडळे तालुक्या तालुक्याला स्थापावी. आठवडयातून एक दिवस या संस्थेसाठी भिक्षा मागणारे तरुण असावेत. शंभर तालुके धरले तर महिन्यातून चार वेळ म्हणजे ४०० वेळा भिक्षा मागितली जाईल. पाच रुपये प्रत्येक भिक्षेत मिळाले तर दोन हजार रुपये मिळतील. संस्थेचा खर्च त्यातून भागवावा. कोणी देणगी देईल. सरकारही आपले आहे. ते नाही का वार्षिक मदत देणार? सारे सुन्दर होईल. असे मनात तर येते, परंतु आरंभ केल्याशिवाय सरकारजवळ काय सांगू?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel