'शेतकरी कामकरी राज्य' आहे असे सारे म्हणतात. परंतु शेतकरी हरिजनांना जवळ घ्यायला तयार नाहीत. कामगारही त्यांना समानतेने सर्वत्र किती वागवतील याची वानवाच. इतर पांढरपेशांची गोष्टच निराळी. गडहिंग्लज येथील मित्र लिहितो, तुम्ही आलात त्या वेळेस हरिजन मंदिर प्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर परवाच्या गांधी जयंतीपर्यत स्पृश्य-अस्पृश्य भेद दूर करण्यासाठी काहीच झाले नाही. कोल्हापूरच्या राजकारणामुळे नाना भेद माजले आहेत, आणि त्याचाही परिणाम म्हणजे हे औदासिन्य असेल. ते काही असो, आम्ही येत्या गांधी जयंतीला गडहिंग्लज येथे मंदिर-प्रवेश, हॉटेल-प्रवेश इत्यादी कार्यक्रम ठेवले. आम्हांला वाटले होते, आता विरोध नाही होणार. परंतु आमचे डोळे उघडले. आम्ही कोठे आहोत याची जाणीव झाली. मोठमोठे विद्वान नागरिकही विरोध करू लागले. विरोधामुळे विद्यार्थी अधिकच खंबीरपणे उभे राहिले. वीस विद्यार्थ्यांनी उपोषणाची तयारी केली. गांधींच्या जन्मदिनी सकाळी आठ वाजता मंदिरप्रवेश, हॉटेलप्रवेश व्यवस्थितपणे पार पाडले. दुसरे दिवशी पुन्हा ये रे माझ्या मागल्या. त्यांना पुन्हा हॉटेल प्रवेश बंदी. कित्येक शतेकर्‍यांनी त्यांना खळयावर येऊ नका म्हणून धमकी दिली.

ही भेदाची भुते आम्ही शान्तपणे करू पाहात आहोत. परंतु ज्या शेतकर्‍यांचे राज्य निर्माण होणार म्हणतो त्यांनीही विरोध करावा हे किती वाईट! तसेच सुशिक्षित आणि मोठया माणसांचे सहकार्यही मिळत नाही. किती लाजिरवाणी गोष्ट. नवीन पिढी तरी नवयुगाचा अर्थ जाणून वागो.

हरिजनांना अजूनहि मानवतेचे हक्क द्यायला आपण तयार नसू तर स्वराज्याचा अर्थच आम्हास कळला नाही म्हणायचा.

जोपर्यंत मानव मानवाला मानवतेनें वागवायला तयार नाही तोपर्यंत स्वातंत्र्याचा अर्थ आम्हांला कळला नाही. परकीयांची सत्ता झुगारायला आपण अधीर असतो, परंतु आपणच आपल्या बांधवांवर गुलामगिरी लादीत असतो, तिचे समर्थन करीत असतो, हे आश्चर्य नव्हे काय? हैदराबादमधील हिंदी जनता निझामी जुलुमाला कंटाळली. रझाकारी जाचांनी त्रस्त झाली. परंतु हैदराबादमधील तमाम हरिजनांना सारे नागरिकत्वाचे हक्क मिळाले का? ज्या एकनाथांनी हरिजनाचे मूल कडेवर घेतले, त्या नाथांच्या समाधीचे दर्शन हरिजनांना घेता येते का? कार्तिकी एकादशीला पैठणला हरिजन मंदिरात जाणार आहेत असे ऐकले परंतु मागून कळले की तेथे एक अडसर घालून तेथपर्यंत त्यांना येऊ द्यायचे असे ठरले. जोपर्यंत हे असे अडसर आहेत, तोपर्यंत तुमची माणुसकी अर्धमेली आहे, तुमचे स्वातंत्र्य अपुरे आहे हाच त्याचा अर्थ. क्षणाचाही उशीर न लावता हरिजनांना सर्वत्र मोकळीक द्या. हे समजावयाचे तरी कधी आमच्या लोकांना? दुसर्‍याच्या मनाची, त्याच्या वेदनांची ज्यांना जाणीव होत नाही त्यांना काय म्हणावे?

भंग्यांची जातच्या जात मळाच्या टोपल्या उचलून नेत आहे हे माणुसकीस शोभत नाही. काही तरी करून एकाच जातीचे हे काम पिढयान पिढया करणे बंद व्हायला हवे. कामात सुधारणा व्हायला हवी. ते सुसह्य केले जावे, जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता शास्त्रीय केले जावे. भंगीही मग दुसरे उद्योगधंदे करू लागतील, शिकतील. भंगी समाजात स्वाभिमानाची प्रखर ज्वाला पेटली पाहिजे. मागे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महारबंधूंना सांगितले, ''नका मृत गुरे फाडू.'' कारण यांची ढोरे फाडायची, आणि तुम्ही गलिच्छ काम करता, दूर रहा- हे बक्षीस मिळायचें. नकोच ते काम. त्यात राष्ट्रीय संपत्तीची हानी होते. परंतु स्वाभिमानाची हानी ही सर्वात मोठी हानी होय! भंगी बंधूंनी दुसरी कोणतीतरी मोलमजुरी करावी, आपल्या मुलाबाळांना शिकवावे, चरखा चालवावा. परंतु पिपे आजपासून उचलणार नाही अशी प्रतिज्ञा करावी.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel