माझे शरीर म्हणजे पंढरपूर, आत्मा हाच विठ्ठल. माझ्या जीवनातून भेदभाव जावोत. धर्मभावना सर्वत्र हवी. 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती' परमेश्वर नेहमीच जवळ आहे. धर्मभावना अमक्या वेळेस हवी, तमक्या वेळेस नको असे का आहे? कोणी म्हणतात, ''राजकारणात धर्म कशाला?'' त्यांना तुकारामाचे उत्तर की जेथे जाशील तेथे देव जवळ हवा. त्याला आवडेल की नाही हे मनात आणून वागा. गीता सांगते,

सर्वधर्मान् परित्यज्य
मामेकं शरणं व्रज


सारे धर्म सोडून प्रभूशरणवृत्तीने वागावे, म्हणजेच प्रत्येक कर्म ईश्वराला आवडेल की नाही हा विचार करून करावे. ही कसोटी आहे.

तुकारामांचे अभंग म्हणजे-तुमचे आमचे वेद. ते स्वतःच गर्जना करून सांगतात,

वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा
येरांनी वहावा भार माथा


इतरांनी शब्द घोकावे. परंतु शब्दातील अर्थ, वेदांचा अर्थ आम्हांसच माहित आहे. सर्वत्र अद्वैत अनुभवणे हा वेदांचा खरा अर्थ. देवाची पूजा म्हणजे नुसती फुले वाहणे नव्हे.

कोणाही जीवाचा न घडो मत्सर
वर्म सर्वेश्वर पूजनाचे ॥


या चरणातील 'सर्वेश्वर' शब्द मला फार महत्त्वाचा वाटतो. अमक्या जातीचा, अमक्या धर्माचा देव नव्हे. त्या वेळेस शववैष्णवांची भांडणे असत. त्या त्या उपास्य देवतांवरून भांडणे होत. तुकाराम तुम्हाला म्हणतात, ''जर विश्वंभराची पूजा करायची असेल तर कोणाचा द्वेष-मत्सर नाही करता येणार.'' कारण कोणाचा द्वेषमत्सर करणे म्हणजे तो देवाचाच करणे होय. कारण तो सर्वत्र आहे ना? संत सर्वेश्वराची पूजा करणारे होते. म्हणूनच ते चराचरावर प्रेम करणारे झाले. परंतु असे हे जीवन क्षणांत अनुभवता येणार नाही. त्यासाठी मागे ओढणारे शतबंध तोडले पाहिजेत. सूर्याजीने मावळे पळत आहेत असे पाहताच दोर तोडून टाकला. असक्तीचा दोर तोडल्याशिवाय विजय कसा मिळणार? ध्येयासाठी देहावर निखारा ठेवायची तयारी हवी.

संसारासी आग लावूनिया हाते
मागुतें परौते पाहू नये


असे तुकाराम सांगत आहेत. ते पुन्हा म्हणतात,

तुका म्हणे व्हावी प्राणांसवे ताटी
नाही तरी गोष्टी बोलू नये


परम पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा असेल तर प्राणांवर पाणी सोडण्याची तयारी हवी. संत हे खरे झुंजार. ते कामक्रोधाची डोकी फोडतात.

रात्रंदिन आम्हां युध्दाचा प्रसंग
अंतर्बाह्य जग आणि मन


बाहेरच्या जगात आणि स्वतःच्या मनात संत रात्रंदिवस झगडत असतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel