उत्तर : एस. एम. जोशींनी अप्पासाहेबांना विचारले की, 'तुम्ही काँग्रेसला का पाठिंबा देता?' ते म्हणाले, 'काँग्रेस, काँग्रेसचे मंत्री, सरकारी अधिकारी सर्वांवर माझा विश्वास आहे. माझा विश्वास गेला तर मी प्रथम विरोध करीन.' आजची काँग्रेस काही करू शकेल असे समाजवादी पक्षाला वाटत नाही. आजची काँग्रेस सरकारे भांडवलशाहीला अनुकूल धोरणच चालवित आहेत. जगाच्या आजच्या परिस्थितीत आस्ते कदम जाऊन चालणार नाही. सरंजामशाही, जमिनदारी त्वरित दूर व्हायला हवी. छोटे छोटे यांत्रिक ग्रामोद्योग देशभर न्यायला हवेत. तो बदल, आजच्या काँग्रेस सरकारजवळ कार्यक्रमच नाही. हा मंत्री बदल, तो बदल जयरामदास बदलले, आता मुन्शी आले. आर. के. पाटील आहेतच. तरी अन्न धान्य आहे तिथेच आहे. जिल्ह्यात १०-२० गावांच्यामध्ये लाखो रुपये घेऊन सर्वोदयी प्रयोग करून कायापालट नाही होणार. सर्वत्र सहकारी दुकानांना प्राधान्य द्या, जमिनदारी दूर करा, पडिक जमिनी भूसेना उभारून लागवडीस आणा, त्यांची मालकी सहकारी सामुदायिक करा, ज्याला जमीन घ्यायची इच्छा आहे, त्याला घेता येईल असे करा- हा मार्ग आहे. काँग्रेस सरकारचे कामगारविषयक धोरणही पक्षान्ध आहे. सर्वोदयवाल्यांना हे लोकशाहीविरोधी धोरण मान्य आहे का? दिल्ली सरकार जी कामगारविषयक बिले आणीत आहे ती किती घातक आहेत! अशोक मेहतांनी आव्हान दिले. जागतिक लोकशाही ट्रेड युनियन फेडरेशनने ही बिले योग्य आहेत असे सांगितले तर विरोध मागे घेऊ. आहे छाती काँग्रेस सरकारची? सर्वोदयवाले जर अशा काँग्रेसी नीतीलाच पाठिंबा देणारे असले तर कसे जमायचे? काँग्रेसवाले आज सत्याग्रहांचे नाव काढू देत नाहीत. श्री. मश्रूवाला यांनी प्रश्न विचारला, 'मग का तुम्हांला रक्तपात हवे आहेत?' परंतु असा नुसता प्रश्न विचारून तरी काय? सर्वोदयवादी किंवा सर्वसेवावादी कोठेही सत्याग्रह करीत नाहीत, किंवा समाजवादी पक्षाने केला तर त्याला आशीर्वाद देत नाहीत. तो सत्याग्रह योग्य का अयोग्य - या बाबतीत मतभेद होईल, परंतु अन्य घातक मार्गांनी न जाता निदान या मार्गाने समाजवादी पक्ष जात आहे ही समाधानाची गोष्ट आहे असे तरी कधी सर्वोदयवाले व सर्व सेवावाले म्हणतात का कोणी? म्हणून काँग्रेसवर या थोरांचा राग असला तरी उपयोग काय? (३ जून १९५०)

देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारत लोकशाही मार्गाने समाजवादी ध्येय प्राप्त करून घेईल अशी कोटयवधी भारतीयांस आशा वाटत आहे. हे ध्येय जास्तीतजास्त लौकर प्राप्त होण्यातच देशाचे जास्तीतजास्त कल्याण आहे. आंतरष्ट्रीय शांती, राहण्यासही भारताने त्वरेने समाजवादी ध्येय गांठणे आत्यंतिक जरूरीचे आहे, असे समाजवादी पक्षाला वाटते. स्वतंत्र राष्ट्रात अहिंसेचे व्यापक बंधन पत्करून आपापल्या मतांची नि योजनांची सर्वत्र प्रसिध्दी करायला सर्वांना वाव हवा, मोकळीक हवी. तरच लोकशाहीचा आत्मा जिवंत राहील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel