''उपनिषदांचा अभ्यास तेजस्वी बनवितो. नेभळट नाही बनवीत. तुमचा स्वतःवर विश्वास आहे की नाही बोला. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही त्याचा देवावर तरी कोठून बसणार? रडक्या दुबळया आस्तिकापेक्षा स्वतःच्या कर्म-शक्तिवर विश्वास असणारा नास्तिक बरा.''

स्वामींची अशी जळजळीत वाणी आहे. ते एकदा बंगाली तरुणांना म्हणाले, 'तुम्हाल देव पाहिजे? जा फूटबॉल खेळा. हसू नका. बलवान बना. उत्साही बना. लाथ मारीन तेथे पाणी काढीन ही शक्ती हवी.'

स्वामीजींनी मृतवत पडलेल्या राष्ट्राला वीरवाणी ऐकविली.
एकदा मिशनर्‍याजवळ वाद चालला होता. स्वामींनी त्याचे सारे मुद्दे खोडून काढले. तरी तो हट्ट सोडीना. तेव्हा म्हणाले, ‘आता हा सोटा पाठीत घालतो म्हणजे ऐकशील.’ अशी ती मूर्ती होती.

त्यांची किर्ती जगभर गेली. कलकत्त्यात त्यांचे अपार स्वागत झाले. हत्तीवरून मिरवणूक. तो गर्दीत त्यांना बाळपणाचा लंगोटी मित्र दिसला. त्यांनी एकदम खाली उडी मारली नि कडाडून भेटले.

विवेकानंदांच्या अशा शतस्मृति आहेत. ते महान् जीवन आहे. त्यातून भारताला सदैव स्फूर्ती मिळेल. आज देज्ञ स्वतंत्र झाला आहे. परंतु फुटीर वृत्ती बळावत चालली आहे. अशा वेळी सर्व धर्माच्या ऐक्याची मूर्ती जे विवेकानंद त्यांच्यापासून आपणांस अमर संदेश मिळत आहे. भारताचा मोठेपणा कशात यासंबंधी ते म्हणतात, 'या देशाने कधी कोणावर आक्रमण केले नाही. हा या देशाचा मोठेपणा असे मला विचार करता करता वाटू लागते.' सर्व धर्माचा, संस्कृतीचा मेळ घालणे, जगाला प्रेमधर्माने राहायला शिकविणे हे भारताचे कर्तव्य आहे; परंतु आधी स्वतःच्या देशात हे अनुभवू या. देशात एकमेकांची काळाजी घेऊ या.

विवेकानंद म्हणतात, 'समता उत्पन्न करायची असेल तर विशेष हक्क नाहिसे व्हायला हवेत. हे विशेष हक्क नष्ट व्हावेत म्हणून व्यक्तिने नव्हे, एखाद्या राष्ट्रानेच नव्हे तर सार्‍या जगाने खटपट केली पाहिजे. पैशाचे दोन पैसे कसे करावे ही अक्कल एखाद्याच्या अंगी उपजत असणे स्वाभाविक आहे. परंतु तेवढयानेच गोरगरिबांना तुडविण्याचा हक्क प्राप्त होतो की काय?'

श्रीमंत आणि गरीबी यांच्यातील तेढ विकोपास जाऊ पाहात आहे. आपल्या अंगातील विशेष गुणांचा उपयोग दुसर्‍याला नाडण्याकडे करणे ह्यालाच विशिष्ट हक्क म्हणतात. हे राक्षसी हक्क नष्ट करण्यासाठी त्या त्या काळातील लोक लढत असतात. नीतीशास्त्राचा हाच रोख असतो. आपणही हे विशेष हक्क नष्ट करू तर विविधता राहूनही ऐक्य प्रवृत्ती वाढेल, साम्यावस्था वाढेल.

महात्माजींनी सर्वोदयाचा हाच मार्ग दाखविला. विशेष हक्क नष्ट केल्याशिवाय समता कोठून येणार? विवेकानंद हेच सांगत आहेत. समाजवादी पक्ष याच दिशेने चला म्हणून सांगत आहे. हा गुणधर्मच आहे. याने जाऊ तर कल्याण आहे, नाहीतर हा देश रक्ताळ वातचक्रात सापडल्याशिवाय राहणार नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel