संस्कृतीचा आणि अहिंसक समाजवादाचा हा प्राणमय अर्थ सर्वांनी हृदयाशी धरला पाहिजे. तदनुरूप वागले पाहिजे. मी आशा करतो की, ते नवे पान उलटतील, मानव संस्कृतीचा अर्थ खरोखर त्यांना समजून घ्यायचा असेल, तर ज्याने तो अर्थ जीवनात प्रकट केला त्याची मूर्ती हे आदर्श मानतील. ज्याने मानवजातीला वीतभर उंच नेले त्याला शत्रू मानणे ही का संस्कृती? तो अविवेक होता.

आपण मंगलमूर्तीची मूर्ती आणतो. एखादा अवयव मोडला-तोडला, तर अशुभ मानतो. समग्र दर्शनात सत्य आहे. पावित्र्य आहे. Wholeness is holiness. गणपतीची संपूर्ण मूर्ती असेल तर ती पवित्र. गणपतीची मूर्ती म्हणजे मानवतेची मूर्ती. सकल गणांच्या, सकल मानवी समुदायांच्या पालनकर्त्याची ती मूर्ती. मानवतेच्या मंगलमूर्तीचे नका तुकडे करू. सर्वांच्या कल्याणातच तुमचे कल्याण. म्हणून शेक्सपिअरने म्हटले की, 'जे करशील ते देशासाठी, देवासाठी, सत्यासाठी असू दे.' त्याने नुसता देश असे नाही म्हटले. माझ्या देशसेवेत देवाची नि सत्त्याची सेवा आपोआपच व्हायला हवी. किंबहुना असे म्हटले तरी चालेल की, सत्य आणि देव यांच्या सेवेत देशाची सेवा येऊन जाते. मोठया वस्तूत छोटी वस्तू येऊन जाते.

संस्कृती म्हणजे जीवनाला जे जे उजाळा देते, सुंदरता देते, समृध्द करते, पुढे नेते, ते ते संस्कृतीच होय. संस्कृती म्हणजे संयम. मानवाला सुसंस्कृत व्हायचे असेल तर मानवाने संयम राखला पाहिजे. मी मोठा, माझा धर्म मोठा, माझी जात मोठी, माझा प्रांत मोठा. माझे तेवढे चांगले; बाकीचे त्याज्य, असे म्हणणार्‍याला संस्कृती कळली आहे असे मला वाटत नाही. संस्कृती जगातील जे जे चांगले ते ते घ्यायला तयार राहील. संस्कृती सहकार करील. संस्कृती संगम करील, असे न करणारी ती संस्कृती नसून विकृती होय.

म्हणून वेद गर्जना करतात, 'भूमा स्याम्' आम्हाला मोठया द्दष्टीचे होऊ दे. भूमा म्हणजे विशाल, महान्. दहा हजार वर्षांपासून वेद ही गर्जना करीत आहेत. संत सांगत आहेत. तोच संदेश महात्माजींच्या रूपाने उत्कटपणे मानव जातीसोमर प्रकट झाला. तो संदेश घेऊन चला सारे जाऊ. भारत मानव्याचे तीर्थक्षेत्र करू. प्रेमस्नेहाचे माहेरघर करू. तेथे नकोत क्षुद्र भेद. तेथे नको विषमता. येथे अहिंसक समाजवादाने मानवाची प्रतिष्ठा स्थापू. व्यक्ती आणि समाज यांचे सुमधूर सामंजस्य निर्मू आणि भारताचे व भारताच्या द्वारा मानवजातीचे सेवक बनू.

साहित्याचा, कलेचा तसा फारसा अभ्यास मी केलेला नाही. मराठी साहित्याशी माझा परिचय तीस सालापर्यंतचा. त्यानंतरचे वाङ्‌मय मी फारसे वाचले नाही, कारण गेली बरीच वर्षे खेडयापाडयातून हिंडण्यात गेली. साहित्य हा माझा जीवन-धर्म नाही. रवींन्द्रनाथांसारखे साहित्य हा स्वधर्म मानतात. ते गीतात्र्जलीत म्हणतात, ''माझ्या गीतांच्या पंखांनी मी तुझ्या पायांना स्पर्श करीन.'' साहित्याच्या द्वारा ते स्वतःचे जीवन कृतार्थ मानीत होते. साहित्याने प्रभूला, पूर्णतेला ते गाठू बघत होते. माझी तशी वृत्ती नाही. जुन्या भाषेत बोलायचे तर मी शूद्रवृ्त्ती आहे. लेखणीच्या लालित्यापेक्षा मला झाडू घेऊन झाडणे आवडते. आजार्‍यांची शुश्रूषा करायला आवडते. कोणाला स्वयंपाक करून जेवायला घालायला आवडते. मी थोडे फार लिहिले परंतु साहित्य, कला यांचा मोठा विचार करून लिहिले असे नाही. तेव्हा माझ्यापासून तसल्या व्याख्यानाची अपेक्षा करू नका.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel