श्री रामेश्वर हे वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत. श्री रामेश्वर मंदिर वेंगुर्ला शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. मंदिराची रचना पुरातन असून मंदिराच्या अंतर्गत केलेले सजावटीचे काम नविन आहे देवस्थानचा पूर्व इतिहास तसेच रचना यासंबंधी थोडक्यात माहिती.... शंकर हे आदिदैवत आर्यपूर्व प्राचीन असून ते लिंगरुपाने दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात स्थापलेले आढळते. त्यावेळी वेंगुर्ल्याचे श्री देव रामेश्वर मंदिर इ. स. १७व्या शतकात स्थापन झाले असावे असा अंदाज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५५ च्या सुमारास दक्षिण-उत्तर कोकणातला बराच मुलुख काबीज केला आणि संगमेश्वरापासून मालवणपर्यंत आपली सत्ता स्थापन केली. त्यावेळी राजापूरची काही ब्राह्मण घराणी कुडाळ येथे स्थायीक झाली. या ब्राह्मणांचे आणि सावंतवाडी खेमसावंत यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. अशाच एका ब्राह्मण कुटुंबातील कै. ग. बा. धामणकर नावाच्या गृहस्थास हे श्री रामेश्वराचे लिंग सापडले धामणकर हे वेंगुर्ले व तुळस गावच्या हद्दीतील वडखोलवाडी याठिकाणी जमीन घेऊन शेती करत. तुळस गावाहून एक ओढा येथे वाहत येत होता. या ओढ्यावर बांध घालून त्यांनी तलाव निर्माण केला. या तलावास निशाण तलाव म्हणून ओळखले जाते. या तलावाच्या निर्मितीसाठी धामणकर खोदाई करत असतांना ओढ्याच्या खोलगट भागात श्री देव रामेश्वराचे लिंग सापडले. श्री. धामणकरांनी हे लिंग आपल्या घराजवळ आणून त्याची पूजा अर्चा केली. गावातील गावकर मंडळी व गौड सारस्वत व्यापारी वर्गाची संमती घेऊन या लिंगाची स्थापना गावच्या मध्यवर्ती ठिकाणी नागेश्वर-भगवती मंदिरात त्यांनी ३५० वर्षापूर्वी केली. श्री देव नागेश्वराच्या ठिकाणी श्री देव रामेश्वराचे लिंग स्थापन करण्यात आले. तर श्री देव नागेश्वर मूळ स्थानापासून उचलून श्री देव रामेश्वराच्या डाव्या बाजूस नंदीसह स्थापन करण्यात आला. श्री देव रामेश्वर मंदिराची रचना - श्री देव रामेश्वर देवालयाच्या गाभार्‍याt श्री रामेश्वराचे लिंग असून लिंगासमोर नंदी आहे. बाजूला जैन ब्राह्मणाचे शिला प्रतिक आहे. गाभार्‍याच्या बाहेरील उजव्या बाजूस गणपतीची मूर्ती, तीन लिंगाकार शिला व एक नागाची शिला आहे. तर डाव्या बाजूस भगवतीची मूर्ती तसेच भगवतीच्या चाळा कुळ पुरुषाची मुर्ती आहे. गाभार्‍याच्या डाव्या बाजूस स्वतंत्रपणे नागनाथ देवालय असून यात लिंगावर धातूचा नाग विराजमान आहे व समोर नंदी आहे. या देवालयाच्या समोर लहानसे दत्त मंदिर आहे. त्रैमुर्ती दत्ताचे दर्शन व नागनाथाचे दर्शन एकाच प्रदक्षिणेत घडते हे महत्त्वाचे. दत्तमंदिराच्या मागच्या बाजूस औदुंबर वृक्ष आहे. देवालयाच्या गाभार्‍याच्या बाहेर सभा मंडपात उजव्या बाजूस श्री देव नितकारी तर डाव्या बाजूस असलेल्या लहान मंदिरात मारुती असून मंदिराच्या मागील बाजूस शनिदेव व मारुती आहे. रामेश्वर देवालयाच्या बाजूस स्वतंत्र असे राम-सीता मंदिर आहे. सभा मंडपातील सर्व खांबांवर वेगवेगळ्या देवतांच्या संगमरवरी टाईल्स लावल्या असून आकर्षक असे कोरिव काम केले आहे. देवालयाच्या समोरच्या भागात डावीकडे असलेल्या घुमटीत गारुडेश्वराची मूर्ती आहे. तर उजव्या बाजूस तुळशी वृंदावन, दिपमाळी आहे. मंदिर परिसरात धर्मशाळा असून वरच्या बाजूस नगारखाना आहे. समोरील भागात पिंपळाचे झाड असून त्या पारावर दुर्गादेवीचे मंदिर आहे. त्याही पुढे एक मोठा तलाव आहे. या मंदिरामध्ये वर्षभर कार्यक्रम सुरु असतात. दर संकष्टीला गणपतीची पालखी, दर सोमवारी भजन, चैत्र महिन्यात जागर, राम नवमी, हनुमान जयंती, अक्षय तृतीया (रामेश्वर वर्धापनदिन), आषाढातील भजनी सप्ताह, श्रावणातील सोमवार होणा-या वरदशंकर पूजा, दसरा, जत्रौत्सव दत्त जयंती, माघ महिन्यातील श्री गणेश जयंती व शिवरात्री हे उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरे होतात. आषाढ महिन्यात होणार सप्ताहाला सात दिवस विविध ठिकाणाहून भाविक दर्शनाला येतात. सप्ताहामध्ये स्थानिक कलाकार रांगोळी घालून आपल्या कलेचे प्रदर्शन करतात. रामेश्वर मंदिर व राम मंदिराता पौराणिक कथांवर आधारीत हालते देखावे साकारले जातात. सातव्या दिवशी दिडी कार्यक्रम होतो व आठव्या दिवशी पालखीवर लाडवांचा वर्षाव करुन काल्याने सप्ताहाची सांगता होते. तसेच महाशिवरात्रीला होणारा रथोत्सवही खास आकर्षणाचा विषय आहे. शिवरात्री दिवशी रात्री पालखी झाल्यानंतर रामेश्वराचे मोहरे (रुपडे) वाजत गाजत रथावर ठेवले जाते. त्यानंतर तरंगदेवतांकडून रथावर नारळ वाढवून रथ प्रदक्षिणेस सुरुवात होते. यावेळी अबालवृद्ध एकच गर्दी करतात. श्री रामेश्वराची पालखी कार्तिक पौर्णिमेला श्री सातेरीच्या भेटीस जाते व कार्तिक प्रतिपदेला रवळनाथ, भुतनाथ, गावडेश्वर यांच्याही भेटीस जाते. त्यावेळी तिथे यथोचित पाहुणाचार केला जातो. कार्तिक एकादशीला रामेश्वराच्या जत्रेस सातेरीची पालखी व तरंगदेवता भेटीस येऊन दोन्ही पालख्यांची मंदिराभोवती प्रदक्षिणा होते. कार्तिक शुद्ध त्रयोदशी गावडेश्वरच्या जत्रेला पुन्हा रामेश्वराची पालखी भेटीस जाते तेव्हा गावडेश्वरची पालखी विठ्ठल मंदिर येथे रामेश्वराची पालखी आणण्यासाठी येते. त्यावेळी होणारा दोन्ही पालख्यांच्या भेटीचा क्षण हा अर्वणीय असतो आपल्या इच्छापूर्तीसाठी म्हणून श्री रामेश्वरला दही भात लिपणे, साखरभात लिपणे, महानैवेद्य, अभिषेक अशा प्रकारचे नवस बोलण्याची प्रथा आहे. संदर्भ : सिंधुदुर्ग . स्वर्गाहुन सुंदर ...
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel