छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.[१] महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.

महाराष्ट्र सरकारने २००१ साली फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली.[२] त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांंमधे वेगवेगळी तारीख दाखविलेली असते.

इतिहास

इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदीर्घ असा पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य घरांघरांत पोहचावे यासाठी फुले यांनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली. ही पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. पुढे २०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

उद्देश

शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की शिवाजी महाराजांचे उदात्त विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत.

सण

शिवाजीच्या जयंतीला महाराष्ट्रात शिवजयंती म्हणतात. शिवाजीच्या जन्मतारखेबद्दल वाद असल्याने शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात किमान दोनदा साजरी होते. त्या दिवशी दिवसभर ढोल-ताशे वाजवीत मिरवणुका निघतात आणि शिवाजीच्या पुतळ्यांना हार घालण्याचा कार्यक्रम होतो. मुंबईसारख्या शहरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत १००च्या वर मालमोटारी व त्यांवर देखावे असतात.

भिवंडी आणि मालेगाव येथे या दिवशी अनेकदा दंगली झाल्या. इ.स. १९७० साली भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक मशिदीसमोर फार काळ रेंगाळल्यामुळे तुफान दंगल झाली. त्यामुळे भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक काढायला १४ वर्षांची बंदी घातली गेली. इ.स. १९८४ साली परवानगी मिळाली आणि त्यावर्षी झालेल्या भीषण दंगलीत अनेक वाहने जळून खाक झाली. त्यामुळे आता मिरवणुकीत सामील होण्यास वाहने मिळत नाहीत. प्रत्येक शिवजयंतीच्या एक आठवडा आधी भिवंडीतले झोपडपट्टीवासी आपले चंबूगबाळे आवरून झोपडी सोडून परगावी जातात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel