पावनखिंड स्मारक
पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभु देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील. विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभु देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील.
शिवाजीराजांना ते पटेना पण 'बाजी'च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले. बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रितीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभु देशपांडे यांनी प्राण सोडले.
शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड.