इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. शिवाजीमहाराजांसाठी परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे वडील शहाजीराजे कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १४ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला.
शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.
खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला करून पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला.
या तहान्वये महाराजांनी आग्राला भेट देण्याचे तसेच दक्षिणेकडील मुघलांना मदत करण्याचे मान्य केले व चार लाख होणचा प्रदेश व २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,
१. अंकोला
२. कर्नाळा
३. कोंढाणा (सिंहगड)
४ कोहोज
५. खिरदुर्ग (सागरगड)
६. तिकोना
७. तुंग
८. नंगगड
९. नरदुर्ग
१०. पळसगड
११. किल्ले पुरंदर
१२. प्रबळगड - मुरंजन
१३. भंडारगड
१४. मनरंजन
१५. मानगड
१६. मार्गगड
१७. माहुलीगड
१८. रुद्रमाळ
१९. रोहिडा
२०. लोहगड
२१. वसंतगड
२२. विसापूर
२३. सोनगड