शांता शेळके

ज्यांचं साहित्यही व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच स्वच्छ, निर्मळ, नितळ, प्रसन्न, स्निग्ध, आनंददायी व शालीन आहे अशा ज्येष्ठ साहित्यिक!

 

मराठी साहित्यातील रसिकप्रिय कवयित्री ! गीतकार, कथालेखिका, कादंबरीकार, अनुवादक, ललितलेखिका, बालवाङ्‌मयकार, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका अशा वेगवेगळ्या साहित्यिक भूमिकांवरही हुकूमत असणार्‍या बहुश्रुत साहित्यिक म्हणजे शांता जनार्दन शेळके होत.

यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर या गावचा. बालपण याच जिल्ह्यातील खेड, मंचर या परिसरात गेले. शालेय शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा शाळेत झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षणही पुण्यात (स. प. महाविद्यालयात) झाले. कोष्टी समाजातील पहिली एम. ए. महिला अशीही त्यांची वेगळी ओळख. श्री. म. माटे, रा. श्री. जोग, प्र. के. अत्रे यांच्यासारख्या दिग्गजांमुळे साहित्याचे सखोल संस्कार त्यांच्या मनावर झाले. अत्रे यांच्या साप्ताहिक नवयुग व दैनिक मराठामध्ये त्यांनी काही काळ काम केले. मुंबईच्या रुईया, महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीचे अध्यापनही केले.

मराठी साहित्यामधे त्यांनी विपुल लेखन केले आहे. सुमारे १०० पुस्तकांची निर्मिती त्यांनी केली. वेगवेगळे वाङ्‌मयप्रकार हाताळले, तरीही त्या त्यांच्या कविता व गीतांमुळेच जनमानसात घर करून आहेत. नवकवींच्या कवितांविषयी आत्मीयता बाळगणार्‍या रसिक श्रोत्या व मार्गदर्शक म्हणूनही त्यांचे मराठी साहित्यात एक वेगळे स्थान आहे. उत्कृष्ट वक्तृत्व हा आणखी एक गुणविशेष त्यांच्या अंगी होता. आळंदी येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून केलेल्या ओघवत्या शैलीतील, रसाळ भाषणाचा आनंद संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांनी घेतला.

मोठा गोल चेहरा, भव्य भालप्रदेशावर ठळक कुंकू, चष्मा, डोक्यावरून पदर, बोलण्यात अदब, स्निग्धता आणि मार्दव. या अशा व्यक्तिमत्त्वातून त्यांच्यातला खानदानीपणा दिसून येई. त्यांचा व्यासंग, बुद्धिमत्ता व अफाट स्मरणशक्ती यांमुळे रसिक श्रोते त्यांच्या वक्तव्यात गुंगून जात. जुन्या काळच्या संतकवींपासून ते आधुनिक कवींपर्यंत आवडलेल्या सर्व कविता त्यांना तोंडपाठअसत. अभिजात पौर्वात्य व पाश्र्चिमात्य साहित्याची बहुश्रुतता, भाषेतील सहजलालित्य आणि आत्माविष्काराची उर्मी यांमुळे त्यांचे लेखन वाचकांच्या मनाची पकड घेणारे ठरले. भोवतीच्या सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्‌मयीन स्थित्यंतराचे अंतर्गत पडसाद त्यांच्या लेखनातून परावर्तीत होत राहिले, तसेच त्यांची मूळची सौंदर्यवादी वृत्तीही तशीच टिकून राहिली.

ग. दि. माडगूळकरांप्रमाणेच उत्कृष्ट व भावानुकूल भावगीते व चित्रपटगीते त्यांनी लिहिली. सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गीतकार म्हणून भूमिका निभावली. तोच चंद्रमा नभात, मी डोलकर डोलकर, जीवलगा राहिले रे दूर घर, गणराज रंगी, मागे उभा मंगेश, रेशमांच्या रेघांनी, ही वाट दूर जाते, वादळ वारं सुटलं ग ... अशा कितीतरी अविस्मरणीय गीतांनी मराठी मनाला त्यांनी गुंगवून ठेवले. वर्षा (१९४७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होय. त्यानंतर रूपसी (१९५६), गोंदण(१९७५), अनोळख (१९८६), जन्मजान्हवी (१९९०), तोच चंद्रमा (१९७६), कळ्यांचे दिवस फुलांच्या राती (१९८६), इत्यर्थ असे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. कथा, ललित लेखसंग्रह, कादंबर्‍या यांबरोबरच जपानी कवींच्या हायकूंचे भावांतर (पाण्यावरच्या पाकळ्या), कालिदासाच्या मेघदूताचा अनुवाद अशी साहित्यनिर्मिती त्यांनी केली. शांता शेळके यांची संपादन क्षेत्रातील कामगिरीही मोठी आहे. गदिमांच्या गीतांचे संकलन, कुसुमाग्रजांच्या कथांचे व कवितांचे संपादन, पु. ल. देशपांडे यांच्या विविध भाषणांचे ‘रसिक हो!’ व ‘श्रोते हो!’ या ग्रंथांच्या माध्यमातून संपादन आणि विविध साहित्यकृतींसाठी प्रस्तावना लेखन - हे शांताबाईंचे कार्य म्हणजे मराठी साहित्यातील अनमोल योगदान आहे.

१९९६ मध्ये आळंदी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. चिमणचारा, गोंदण या त्यांच्या पुस्तकांना शासकीय पुरस्कार लाभला. काव्यलेखनासाठी ‘ग.दि.मा. गीतलेखन पुरस्कार’ ही त्यांना प्राप्त झाला.

मराठी सारस्वताची अखंड सेवा करत असतानाच त्यांची प्राणज्योत (२००२) मालवली. त्या वेळी ‘असेन मी नसेन मी... ’ ही त्यांचीच कविता उभ्या महाराष्ट्राला चटका लावणारी ठरली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel