पत्रकारिता, लेखन, वक्तृत्व, राजकारण व समाजकारण या क्षेत्रांतील नि:स्वार्थीपणे अन्‌ अविरतपणे केलेल्या कार्यामुळे ज्यांचे आयुष्यच ‘एक धडपडीचा इतिहास’ बनून गेले असे समाजवादी लढवय्ये!

परकीय सत्ता गेली. देश स्वतंत्र झाला. देशासाठी लढणार्‍यांना जनसामान्यांनी देवत्व बहाल केले. दुर्दैवाने काहींना हे देवत्व पचलं नाही. पण अनेकांनी हे देवत्व पचवले. स्वार्थाकडे दुर्लक्ष करून , देशार्थासाठी कार्यरत राहणे अनेकांनी सातत्याने चालू ठेवले. ध्येयाचा मार्ग त्यांनी सोडला नाही. मानवाच्या सुखासाठीची लढाई अखंड चालू ठेवली. सरकारी गाडीवरच्या लाल दिव्यापेक्षा सेवेचा नंदादीप आत्मज्योत समजून जपणारे हे देशसेवक या देशात शिल्लक उरलेल्या सेवाव्रताची मंदिरे आहेत. असेच एक नि:स्वार्थी, ध्येयवेडे, निष्पाप तीर्थक्षेत्र म्हणजे एस. एम. तथा श्रीधर महादेव जोशी.

एस. एम. जोशींचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावी झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरीजवळील गोळप होय. एकत्रित असलेले मोठे कुटुंब व एकटे वडील कमवते अशा स्थितीत जेमतेम भागणार्‍या घरात त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली आणि पुढे ही स्थिती आणखीनच बिघडत गेली. १९१५ साली वडिलांचा मृत्यू झाला आणि कुटुंबाची परवड झाली. अशाही परिस्थितीत शिक्षणाविषयीची त्यांची ओढ कायम राहिली. सवलती, शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी अध्ययन सुरूच ठेवले.

घरात दोन वेळच्या जेवणाची पंचाईत असताना आणि स्वत:चेच दु:ख डोंगराएवढे असतानाही देशहिताच्या गोष्टी करण्याची इच्छा त्यांना लहानपणापासूनच होती. जो दुबळा आहे त्याच्या बाजूने आपल्या तत्त्वांची ताकद उभा करणारा हा लढवय्या अगदी लहानपणापासून लोकहितदक्ष असे. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजी शिकविणार्‍या मास्तरांनी चेहर्‍यावर देवीचे व्रण असणार्‍या एका विद्यार्थ्याला मागे बसायला सांगितले; तेव्हाचा प्रसंग त्यांच्या इतरांसाठी लढण्याच्या वृत्तीचे दर्शन घडवितो. त्या मास्तरांना त्यांच्या तासाला छान दिसणार्‍या मुलांनीच पुढे बसावे असे वाटायचे. म्हणून मास्तरांनी ‘त्या’ विद्यार्थ्याला मागे बसायला सांगितले. एस. एम. यांनी याला विरोध केला. समर्पक कारण देऊन त्यांनी त्या विद्यार्थ्याला हट्टाने पुढेच बसवले. हा प्रसंग इथे देण्याचं कारण एवढचं की, ज्यांना समाज चुकीच्या कारणासाठी नाकारतो, त्यांना स्वीकारण्याची मानवतावादी दृष्टी एस.एम. यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भागच होती - हे सांगणारा हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे.

देश स्वतंत्र व्हावा म्हणून आपापल्या परिने आणि मार्गाने प्रत्येक जण लढत होता. जहाल - मवाळांच्या अखंड प्रयत्नातून आशेचा किरण सामान्यांच्या नजरेच्या टप्प्यात येत होता. हे प्रयत्न, राष्ट्रभक्तीचे वातावरण या सर्वांविषयी एस.एम. यांना विलक्षण ओढ होती. चिरोल खटला लढवून परत आलेल्या लोकमान्य टिळकांची मिरवणूक पाहण्यासाठी गेल्यामुळे त्यांना छड्या खाव्या लागल्या होत्या. हा अनुभव असतानाही १९२० साली टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थिंची मिरवणूक काढली गेली, त्यातही ते सामील झाले. याही वेळी त्यांना छड्या खाव्या लागल्या. पण पर्वताएवढ्या निष्ठेसमोर ती शारीरिक शिक्षा त्यांच्यासाठी नगण्य होती. पुणे येथे विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करून त्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी प्रयत्न, मुंबईत युथ लीग परिषदेचे आयोजन अशी कामे करत असताना त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले.

जात-पात व धर्मभेदापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे हा विचार घेऊन एस.एम. यांनी सनातन्यांचे विचार नाकारले. १९२९ मध्ये तत्कालीन अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून केलेल्या पर्वती येथील (पुणे) सत्याग्रहात त्यांनी पुढाकार घेतला. या सत्याग्रहाला विरोध करायला आलेले सनातनी हजारोंच्या संख्येत होते. पर्वती सत्याग्रहानंतर सनातन्यांनी सत्याग्रहाला विरोध म्हणून सभाही घेतली. त्या प्रचंड सभेचा रोष एस. एम. यांना स्वीकारावा लागला. पण सत्य आणि न्याय्य बाजूसाठी कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्याची त्यांची तयारी होती.

सविनय कायदेभंग चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. या तुरुंगवासाच्या काळात ते ज्येष्ठ नेत्यांच्या सान्निध्यात आले. येथेच त्यांना मार्क्सवाद व समाजवाद या संकल्पनांचा सखोल परिचय झाला. यातूनच पुढे ते कॉंग्रेस-समाजवादी पक्षाच्या स्थापनेत व कार्यात पुढाकारासह सहभागी झाले. भारतात, प्रामुख्याने महाराष्ट्रात समाजवादी तत्त्वज्ञानाचा निष्ठेने प्रसार करण्याचा यशस्वी प्रयत्न एस.एम. यांनी यथाशक्ति केला. समाजवादी विचारसरणीचे एक प्रमुख अग्रणी, एक निष्ठावंत आधारस्तंभ म्हणूनच त्यांना ओळखले जात असे.

देशाला स्वातंत्र्य आणि देशबांधवाना अधिकाराचं जगणं मिळावं यासाठी त्यांनी वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष केले. १९ ऑगस्ट, १९३९ रोजी त्यांचे लग्न झाले. पण देशाच्या संसारात गुंतलेले हात घरच्या संसाराला हातभार लावायला मिळणं कठीण होतं. यानंतरचं एस.एम. यांचं आयुष्य म्हणजे वार्‍यासारखं वेगवान होतं. युद्धविरोधी चळवळीसाठी तुरुंगवास, छोडो भारत चळवळ, राष्ट्रसेवा दल अशा अनेक कार्यातल्या त्यांच्या सहभागाने प्रापंचिक कर्तव्यांना मर्यादा पडल्या.

१९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांचा प्रमुख सहभाग होता. या काळात त्यांना सुमारे ३ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. साबरमती, नाशिक व येरवडा येथील तुरुंगांमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. या काळात त्यांना समृद्ध करणारा साने गुरुजींचा सहवास लाभला. पुढे राष्ट्रसेवा दलाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. या संघटनेच्या माध्यमातून युवकांना राष्ट्रवादाचे संस्कार देणे, त्यासाठी शिबिरे-संमेलने-मेळावे भरवणे, कलापथक स्थापन करून त्याद्वारे अस्पृश्यताविरोधी प्रचार , स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांचा पाठपुरावा अशी अनेक रचनात्मक कामे त्यांनी केली. राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकात वसंत बापट, राजा मंगळवेढेकर, पु.ल.देशपांडे, निळू फुले, राम नगरकर, स्मिता पाटील इत्यादी दिग्गज कलावंत त्या-त्या काळात काम करत होते. यामागे प्रमुख प्रेरणा एस.एम. जोशी यांचीच होती. स्वातंत्र्य आंदोलनात काही काळ त्यांनी भूमिगत राहूनही कार्य केले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एस.एम. यांनी समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष व संयुक्त समाजवादी पक्ष यांच्या माध्यमातून राजकारण व समाजकारण साधण्याचा प्रयत्न केला. समाजवादी विचारांचा पाठपुरावा ते करत राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेआधी ते मुंबई प्रांताच्या विधानसभेत आमदार म्हणून कार्यरत होते. तसेच पुढे ते काही काळ लोकसभा सदस्यही होते. संसद सदस्य (१९६७ - पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व) म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. पुढील आणिबाणीच्या काळात ते लोकशाही-समर्थक म्हणून कार्यरत राहिले. जनता पक्षाच्या स्थापनेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पण जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र ते सत्तास्थानापासून निग्रहाने बाजूला राहिले.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या प्रसंगी ‘‘मराठी भाषकांसाठी संघराज्यात एक घटक राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती व्हावी हे या आंदोलनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. हा लढा मराठी जनतेचा असून पक्षनिरपेक्ष आहे’’ हा विचार त्यांनी मांडला, त्याचा पाठपुरावा केला. संयुक्त महाराष्ट्र समितीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी उत्तम भूमिका बजावली. गोवा मुक्ती संग्रामातही त्यांचा सहभाग होता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्र्नाचाही त्यांनी अखेरपर्यंत पाठपुरावा केला.

कामगार चळवळीतील एस. एम. यांचे योगदान म्हणजे त्यांच्या जीवनकार्याचा आणखी एक वेगळा पैलू होय. १९३४ दरम्यान मुंबईतील गिरणी कामगारांच्या चळवळीत सहभाग, पुण्यात भांडी बनवणार्‍या (धातुकाम करणार्‍या) कामगारांची संघटना, संरक्षण साहित्य बनवणार्‍या कामगारांची संघटना, बँक कामगारांची युनियन... इत्यादी घटकांच्या माध्यमातून त्यांनी कामगार चळवळीत आपले मौल्यवान योगदान दिले. अनेक संपांना सक्रिय पाठिंबा, प्रसंगी उपोषणे, अनेक संघटनांचे अध्यक्षपद, सचिवपद, काही संघटनांना मार्गदर्शन या माध्यमातून त्यांनी कार्य केले. कामगार चळवळीतही त्यांनी महात्मा गांधीजींच्या विचारांची कास सोडली नाही. तसेच लोकसभा सदस्य या नात्याने कार्यरत असताना त्यांना कामगारांच्या हिताचा विसर पडला नाही.

एक पत्रकार व लेखक म्हणूनही एस.एम. यांचे कार्य मोठे आहे. ‘लोकमित्र’ हे दैनिक त्यांनी काही काळ चालवले. ‘मजदूर’ हे साप्ताहिक चालवण्यातही त्यांचा मार्गदर्शनात्मक सहभाग होता. ‘साधना’ या साप्ताहिकाशी त्यांचा जवळून संबंध होता. महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर साने गुरुजींनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. या काळात ‘कर्तव्य’ नावाच्या सायंदैनिकाची जबाबदारी त्यांनी एस.एम. यांच्याकडे सोपवली होती, यावरून त्यांच्या पत्रकारितेच्या गुणांची कल्पना येते. उर्मी (कथासंग्रह); ’अीशिलींी ेष डेलळरश्रळीीं झेश्रळलू’ (वैचारिक ग्रंथ) व ‘मी एस. एम.' (आत्मचरित्र) अशी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.  त्यांचे आत्मचरित्र म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आणिबाणीपर्यंतचा इतिहासच आहे. एस.एम. यांनी त्यांच्या स्वभावाला अनुसरून या पुस्तकात आत्मगौरवाला स्थान न देता त्या-त्या चळवळीला, सहकार्‍यांच्या कार्याला आणि लढ्यांमागच्या विचारांना महत्त्वाचे स्थान दिले आहे.

पत्रकारिता, राजकारण, समाजकारण, कामगार चळवळ, स्वातंत्र्य आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ इत्यादी क्षेत्रांत व चळवळीत मोलाचे कार्य करूनही ‘मी एक सामान्य माणूस आहे’, असे म्हणणारे एस.एम. विनम्र, अकृत्रिम स्वभावाचे, चारित्र्यवान, व सच्चे सामाजिक कार्यकर्ते होते. ‘सत्याचा आग्रह’ हा त्यांचा शुचिर्भूत असा मार्ग होता आणि ‘लोकशाही व सामाजिक समता’ ही त्यांच्या जीवनाची उद्दिष्टे होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel