राम गणेश गडकरी

नाट्य, काव्य व विनोदी लेखन या क्षेत्रांत अतिशय कमी कालावधीत अत्युत्कृष्ट, दिशादर्शक अभिव्यक्ती साधणारे प्रतिभासंपन्न साहित्यिक आणि आपल्याला ‘महाराष्ट्र गीता’ ची देणगी देणारे कवी!

मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ नाटककार, विनोदकार आणि कवी. विशेषत: मराठी साहित्यात व रंगभूमीवर विनोद रुजवणारे व आपल्या प्रतिभेची छाप सोडणारे साहित्यिक म्हणून राम गणेश गडकरी अजरामर ठरले. बाळाराम या नावाने त्यांनी विनोदी लेखन केले, तर गोविंदाग्रज या टोपणनावाने त्यांनी काव्यलेखन केले. त्यांच्या कविता ‘वाग्वैजयंती’ (१९२१) या काव्यसंग्रहातून प्रसिद्ध झाल्या. ते स्वत:ला केशवसुतांचे सच्चे चेले म्हणवून घेत असत. पण तरीही गोविंदाग्रज केशवसुतांहून अनेक दृष्टींनी वेगळे होते.

गोविंदाग्रजांनी विपुल प्रमाणात प्रेमकविता लिहिली. त्यांना प्रेमाचे शाहीर असेच म्हटले जायचे. गुलाबी कोडे, गोड निराशा, पहिले चुंबन, मुरली, प्रेम आणि मरण, गोफ, ती कोण? अशा अनेक प्रेमकविता त्यांनी लिहिल्या.

क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा,  मग पुढे...

यांसारख्या शब्दांतून त्यांची विलक्षण प्रतिभा प्रभाव पाडून जाते. प्रेमभंगाचे दु:ख व्यक्त करताना ते एका कवितेत म्हणतात,

जगावाचुनी लाभतीस तर जग मी केले असते, तुझ्यावाचुनी जग परि आता हो असत्याचे नसते...

डोळ्यांपुरते जग नच असते रुप जगाला पुरते, प्रेमळ हृदया  परि निर्दय जग दगडाखाली पुरते...

होईल होईल वाटत होते तेच अखेरीस झाले, नाव घेतल्यावाचुन आता मनात झुरणे आले...

या ओळींमधून व्यक्त झालेली प्रेम-निराशेची तडफड इतकी जिवंत आणि भेदक आहे की या अवस्थेतून गेलेल्या कुणालाही ती आपलीशी वाटेल. गोविंदाग्रज हे प्रेमाचे शाहीर होतेच, पण त्यांनी महाराष्ट्राला एक देणं देऊ केलं आहे, ते म्हणजे महाराष्ट्र गीताचं. त्यांच्या एका कवितेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रेरणादायी, यथार्थ वर्णन केले आहे.

‘‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।

नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा ।।

अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा ।

बकुळ फुलांच्या प्राजक्तांच्या दळदारी देशा।।

भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा ।

शाहिरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा ।।’’

काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून काम केले, तसेच ‘ज्ञानप्रकाश’ मध्ये उपसंपादक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यातूनच पुढे त्यांचा नाटक मंडळींशी, नाट्यलेखनाशी संपर्क आला. कल्पकता, बुद्धिमत्ता आणि भाषाप्रभुत्व या तीनही शक्ती गडकरी यांना प्रमाणाबाहेर लाभल्या होत्या. म्हणूनच ते नाटककार म्हणूनही विलक्षण यशस्वी ठरले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या विनोदी लेखनाचा, नाट्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. बालपणापासूनच साहित्याची ओढ लागल्याने वयाच्या सतराव्या वर्षीच ‘मित्रप्रिती’ नावाचे नाटक त्यांनी लिहिले. त्यानंतर १९१३ मध्ये रंगभूमीवर आलेले ‘प्रेमसंन्यास’ हे त्यांचे पहिले नाटक होय. नंतर अनुक्रमे पुण्यप्रभाव (१९१७), एकच प्याला (१९१९), भावबंधन (१९२०) ही नाटके रंगभूमीवर आली.  ‘राजसंन्यास’ हे त्यांचे अपूर्ण राहिलेले नाटक. त्यांच्या नाटकांबरोबरच त्यांच्या नाटकातील काही पात्रेही अजरामर ठरली. एकच प्याला या नाटकातील सिंधू, तळीराम, सुधाकर किंवा भावबंधनमधील घनश्याम, धुंडीराज, प्रेमसंन्यासमधील गोकूळ ही पात्रे आजही मराठी कलावंतांना आणि रसिकांना आनंद देतात. ‘वेड्यांचा बाजार’ हे त्यांचे अपूर्ण नाटक पुढे चिंतामणराव कोल्हटकर यांनी पूर्ण केले.

करुण आणि हास्य ह्या दोन्ही रसांची निर्मिती आपल्या लेखनातून सारख्याच परिणामकारकतेने त्यांनी साधलेली दिसते. त्यांच्या कथांतून निखळ विनोदाबरोबरच उपहासात्मक व्यंगही ठळकपणे आढळते. रिकामपणाची कामगिरी (१९२१), संपूर्ण बाळकराम (१९२५) यांतून त्यांचे विनोदी लेखन प्रसिद्ध झाले. याशिवाय गडकरी यांचं बरंचसं अप्रकाशित लेखन आचार्य अत्रे यांनी १९६२ मध्ये ‘अप्रकाशित गडकरी’ या नावाने प्रसिद्ध केले. नाट्यलेखन व विनोदी लेखन या क्षेत्रांत आचार्य अत्रे यांनी राम गणेशांची परंपरा पुढे समर्थपणे चालवली.

या सर्वच साहित्य प्रकारात यांच्या लेखणीने आपला स्वत:चा ठसा उमटवला. पण मराठी साहित्यक्षेत्रात अजरामर ठरलेल्या त्या लेखणीमागच्या कलावंताने- राम गणेश गडकरी यांनी -मात्र वयाच्या ३४ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेतला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel