बी. जी. शिर्के

कोणतीही पार्श्र्वभूमी नसताना, स्वत:च्या जिद्दीच्या साहाय्याने उद्योग क्षेत्रावर  ‘मराठी ठसा’ ठळकपणे उमटवणारे एक यशस्वी उद्योजक!

अपार जिद्द, प्रामाणिक कष्टाची तयारी, सहनशक्ती, चिकाटी, प्रचंड आत्मविश्र्वास, आशावाद, उत्साह, समाजाविषयी आच व भ्रष्टाचाराची चीड या सर्व गुणांनी संपन्न असे व्यक्तिमत्त्व म्हणजे जागतिक दर्जाचे बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के. या गुणांसह मिळालेल्या वेळेचे काटेकोर नियोजन, हिशेबी-व्यावसायिक वृत्ती आणि कल्पकता यांमुळे ते यशस्वी उद्योजक झाले. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पसरणी या छोट्याश्या गावात जन्मलेल्या या मोठ्या उद्योजकाचे पूर्ण नाव बाबुराव गोविंदराव शिर्के.

शिक्षणाच्या आवडीने आणि ध्यासाने त्यांनी कमवा व शिका या तत्त्वाचे पालन करून आपले शिक्षण पूर्ण केले. ६ जून, १९४३ रोजी (वयाच्या २६ व्या वर्षी ) सिव्हिल इंजिनियर होण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले. शिक्षणाची कोणतीही परंपरा नसणार्‍या घरातील बी. जी. शिर्के हे वाई-पसरणी परिसरातील त्या काळातील पहिले सिव्हिल इंजिनियर होते. सिव्हिल इंजिनियरिंगचा संबंध नैसर्गिक गोष्टी व विकासाशी येतो आणि स्थापत्यशास्त्र ही सर्व उद्योगांची जननी आहे असा विचार करून त्यांनी सिव्हिल इंजिनियर व्हायचे ठरविले होते. बी. जीं.च्या स्पष्टवक्तेपणाचा आणि धाडसी वृत्तीचा त्यांना शिक्षण घेताना (तसेच पुढील व्यवसायातही) खूप फायदा झाला.

नोकरी न करता स्वत:ची कंपनी उभारण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. सुरुवातीला छोट्या-मोठ्या कंपनीत काम करून उद्योगाला आवश्यक असा अनुभव त्यांनी मिळविला. ९ सप्टेंबर, १९४४ रोजी दसर्‍याच्या मुहूर्तावर या शेतकर्‍याच्या मुलाने, कोणतीही व्यावसायिक परंपरा नसताना, पैशाचे पाठबळ नसताना, केवळ जिद्द आणि  ज्ञानाच्या जोरावर ‘सुप्रीम कन्स्ट्रक्शन’ नावाची कंपनी सुरू केली. सुरुवातीस सायकलवरूनच ते सगळीकडे फिरत असत. त्यांच्या आयुष्यात जशी अनेक संकटे आली, तसेच काही योगायोगांमुळेही त्यांची बरीच कामे झाली. कंपनी सुरू केल्यानंतर मिल्ट्रीची कामे मिळविण्यासाठी ते एका अधिकार्‍याला त्याच्या घरी भेटले होते. सुदैवाने त्या अधिकार्‍यानेही कष्टाची तयारी आणि प्रामाणिकपणा पाहून त्यांना बांधकामाची  कामे मिळवून दिली (१९४४). पुढे कोल्हापूर जेलचे मोठे काम त्यांना मिळाले (१९४५). ते काम त्यांनी अत्यंत चिकाटीने पूर्ण केल्याने ते एक मोठे व्यावसायिक म्हणून ओळखले जाऊ लागले.

बी. जींच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेप्रमाणेच त्यांचे लग्नसुद्धा एक छोटी क्रांतिकारी घटनाच ठरली. १९४७ ला स्वत:च्या वयाच्या २९ व्या वर्षी त्यांनी विजया शिंदे (वय २४ वर्षे)  यांच्याशी लग्न केले. त्या काळात एवढ्या उशिरा लग्न करणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्यांच्या पत्नीने त्यांना आयुष्यभर एक चांगला सल्लागार म्हणून साथ दिली. पत्नीच्या प्रसंगी कठोर वागण्याने आणि योग्य सल्ल्यांमुळेच बी. जी. शिर्के राजकारण आणि भ्रष्टाचारापासून दूर राहिले. ‘सिपोरेक्स’ कंपनीच्या उभारणीमध्ये सौ. शिर्के यांचा मोठा सहभाग होता. बांधकाम व्यवसायातील मनस्तापामुळे श्री. शिर्के यांनी अनेक वेळा व्यवसाय सोडण्याचा विचार केला होता. या प्रसंगी त्यांच्या सौभाग्यवतींनी त्यांना सुयोग्य साथ दिली. १९५३ च्या दरम्यान पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाची पहिली मोठी इमारत, वीरचे धरण अशी कामे त्यांनी केली व ते व्यवसायात स्थिरावले. तसेच १९६२ ते १९८१ पर्यंत त्यांना किर्लोस्कर कंपनीची पुण्यातील सर्व बांधकामे शंतनुराव किर्लोस्कर यांनी शिर्के यांना विना-निविदा दिली होती.

कोणतेही काम उत्तम दर्जाचे व वेळेवर करण्याचे बांधकाम शास्त्राचे अर्थशास्त्र बी.जी. शिर्केंनी अंगीकारले आहे. शिर्के यांनी आपल्या व्यवसायाचाच सखोल विचार केला असे नाही, तर आपली शिक्षण पद्धती, सरकारी धोरणे, समाजातील वाढता भ्रष्टाचार, उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन या सर्व गोष्टींचाही त्यांनी स्वतंत्र अभ्यास केल्याचे जाणवते. एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर, देशाच्या समस्यांवर, व्यापक धोरणविषयक बाबींवर शिर्के महाराष्ट्रातीलच नव्हे तर दिल्लीतीलही अधिकारी व नेत्यांना पोटतिडकीने पत्रे लिहून आपले मत नोंदवतात. या सवयीचा यदा त्यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या एका भेटीमध्ये झाला. त्यांची काही पत्रे इंदिरा गांधींनी वाचलेली होती. देशाच्या र्‍हासाला कारणीभूत असणार्‍या व बांधकाम क्षेत्रात निर्माण होणार्‍या काळ्या पैशाची त्यांना प्रचंड चीड होती , आहे.  

बांधकाम क्षेत्रात जागतिक स्तरावर एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी ख्याती मिळविली. परंतु हे यश मिळविताना, मुख्यत्वे‘सिपोरेक्स म्हणजे शिर्के’ हे समीकरण साधताना त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला गेल्याचे दिसून येते. सिपोरेक्स कंपनी (बांधकामाचे साहित्य निर्माण करणारी कंपनी) भारतात स्थापन करताना वेगवेगळ्या गोष्टींसाठी करावे लागणारे संघर्ष, सरकारी कारभार, त्यातील भ्रष्टाचार, तांत्रिक अडचणी, अतोनात लागलेला पैसा यासाठी त्यांचे न मोजता येणारे कष्ट पणाला लागले होते. जागा, भांडवल, परवाने (लायसन्स) यांसारख्या यक्ष प्रश्नांना तोंड देऊन त्यांनी १९७२ मध्ये कारखान्याचे अधिकृत उत्पादन सुरू केले. १९७४ साली दुबईच्या पहिल्या विदेशी कामाने कंपनी तारली गेली. ‘सिपोरेक्स’मधील मराठी कामगारांनी दुबईमध्ये अनेक मशिदी आणि शेकडो घरे बांधली आहेत.

बी. जीं.चे वैशिष्ट्य म्हणजे मोठे होताना ते आपल्या गावाला कधीही विसरले नाहीत. शिर्के यांच्या उद्योगाच्या माध्यमातून कामानिमित्ताने पसरणी गावातील घरटी एक माणूस परदेशात गेलेला आहे. एवढेच नव्हे, या सर्व कामगारांनी बी.जीं.नी गावात सुरू केलेल्या शैक्षणिक संस्थेस मोठी देणगीही दिली आहे. अशाच कामगारांच्या मदतीने बी. जी. शिर्के यांनी १९९३ साली म्हणजे स्वत:च्या वयाच्या ७५ व्या वर्षी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रिडानगरी उभारली. ह्या क्रीडानगरीत ऑलिंपिक दर्जाचे ९०% खेळ एकाच ठिकाणी, एकाच परिसरात खेळले जाऊ शकतात. एवढे प्रचंड काम बी.जी. शिर्के कंपनीने केवळ एक वर्षात पूर्ण केले. या कामाने शिर्के आत्यंतिक समाधानी आणि मनस्वी आनंदी झाले.

बी. जीं ना केवळ पैसा कमवायचा नव्हता, तर बांधकाम क्षेत्रात नवे तंत्र - यंत्र - मंत्र आणून बांधकाम शास्त्राचे औद्योगिकीकरण,आधुनिकीकरण व आदर्श व्यावसायिकीकरण करायचे होते. बांधकामाची जुनी, कालबाह्य निविदा पद्धती, गुणवत्तेपेक्षा व्यक्तीला महत्त्व देण्याची पद्धत त्यांना मोडून काढायची होती. या ध्यासानेच बी. जी. शिर्के सतत ३० वर्षे समाजातील, सरकारमधील विविध प्रवृत्तींशी लढत होते.

१९८४ च्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी शिर्के यांच्या आधुनिक तंत्राचा व विचारांचा उपयोग महाराष्ट्राला होईल असे निर्णय शासकीय पातळीवर घेतले. अर्थातच या शासकीय निर्णयांना विरोध झालाच. बी. जीं.ना सतत १३ वर्षे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कोर्टाच्या पायर्‍या चढाव्या लागल्या. शेवटी त्यांचाच विजय झाला आणि या ठरावाच्या आधारावर त्यांना महाराष्ट्र विद्यूत महामंडळ, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, संरक्षण मंत्रालय, कर्नाटक व आंन्ध्रप्रदेश शासनांची कामे-अशी असंख्य महत्त्वाची कामे मिळाली. काही शासकीय संस्थांनी मात्र या काळात त्यांना प्रचंड मनस्ताप दिला. या सगळ्या अनुभवावरूनच ते म्हणतात की, ‘व्यापारी संस्कृती भिनलेल्या लोकांनी पैशाच्या जोरावर उद्योग काढल्याने अप्रामाणिकपणा वाढला आहे, परिणामी हाडाच्या उद्योजकाला वाव मिळत नाही.’

आजच्या आधुनिक युगात टिकून राहण्यासाठी आपल्या शिक्षण पद्धतीतही त्यांनी काही बदल सुचविले आहेत. स्पर्धेच्या युगात यशस्वीपणे टिकायचे असेल, तर गुणवत्तेला पर्याय नाही असे त्यांना वाटते. ‘मराठी तरुणांनी ‘सकाळी १० ते सायंकाळी ६-नोकरी’ या संकुचित वृत्तीचा त्याग केला पाहिजे व उद्योग संस्कृती अंगीकारली पाहिजे. सर्व क्षेत्रात मराठी माणूस आघाडीवर असला, तरी व्यापार-उद्योग क्षेत्रात तो मागे आहे. मराठी माणसाने उद्योगातील धोके जाणून कष्ट करण्याची जिद्द ठेवली, तर उद्योग क्षेत्रात मराठी माणूस पुढे येऊ शकेल. ज्या समाजात उद्योजक संस्कृती व व्यापारी संस्कृती वाढीस लागते, त्याच समाजाचा उत्कर्ष होतो. मराठी माणसाला आपली भाषा व संस्कृती टिकवण्यासाठी उद्योजकता आत्मसात करायला हवी.’

अशा प्रकारे उद्योगासाठी अनुकूल वातावरण, सोयी, सुविधा, सवलती, चांगला परिसर उपलब्ध असणार्‍या महाराष्ट्रातील तरुणांना उद्योजकतेची नवी संस्कृती निर्माण करण्याचे आवाहन त्यांच्या ‘जिद्द’ या संक्षिप्त आत्मवृत्तात त्यांनी केले आहे. असे विचार शिर्के वेळोवेळी मांडतात, तसेच या विचारांचा स्वत: सक्रिय राहून पाठपुरावा करत ते आजही कार्यरत आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel