राजमाता जिजाबाई

आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता!

कर्तृत्व मनगटात उतरण्यापूर्वी त्याला मनात रुजवावं लागतं. मडक्याचा आकार कुंभाराच्या हातांवर आणि त्याहीपेक्षा त्याच्या प्रतिभेवर, कल्पनाक्षमतेवर अवलंबून असतो. कर्तृत्ववान पुरुषांचही हेच सूत्र आहे. बालपणापासून ज्याला वाघ दिसला की झेप घेऊन त्याच्याशी त्याच्याच त्वेषानं लढावं ही शिकवण दिली जाते, तो आयुष्यात कशाचीही तमा करत नाही.

हिंदवी स्वराज्याच्या आड येणार्‍या  भेकडांशी लढण्याचं धैर्य शहाजीपुत्र शिवरायांना मिळालं ते जिजाऊंच्या निडरपणे जगण्याच्या संस्कारांतून.

   

राजे सिंदखेड वतनाचे (सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील) पाच हजारी मनसबदार लखोजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते, पण वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या.

   

ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. लष्करी प्रशिक्षणासाठी लखोजींकडे हट्ट करणार्‍या जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फुरण चढे. म्हाळसाईंनी आपल्या लेकीला अशा कथा सांगून तिच्या शूरपणाला प्रोत्साहन दिले.

   

लोकांनी गुलाम व्हावे, मुसलमानी साम्राज्याची इमाने इतबारे चाकरी करावी आणि मनसबदार, वतनदार व्हावे. ज्ञानी माणसांनी आपल्याच माणसांची घरे लुटून शत्रूने किती कमाई केली याचा हिशेब शत्रूलाच सांगावा. कलाकारांनी आपल्याच माणसांची फजिती रंगवून-रंगवून शत्रूला ऐकवावी.... सगळंच विपीरीत घडत होतं.

   

शत्रूचे सरदार आया-बायांची अब्रु वेशीवर टांगत होते. मुलींचा लिलाव होत होता. स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता. शेतकर्‍यांची तर याहून वाईट अवस्था होती. पिकवावं आपण आणि कणगी मात्र बादशहाची भरावी. घाम गाळावा पण पोट भरू नये. समाजाची ही दयनीय अवस्था जिजाऊंना बघवत नव्हती. त्यांना या अन्याय-अत्याचार विरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता.

   

जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसलेंशी झाला (१६०५). दोन तेजस्वी जीव एकत्र आले, पण तरीही जिजाऊंच्या स्वप्नातल्या हिंदवी साम्राज्याची पहाट दिसत नव्हती. अखेर त्यांनी भवानी मातेलाच साकडं घातलं. ‘तेजस्वी, पराक्रमी, स्वराज्य स्थापनेचे सामर्थ्य असणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल’, म्हणून पदर पसरला. पराक्रमी शहाजीराजांची ओढाताण जिजाऊ जवळून अनुभवत होत्या. त्यांचे आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही इत्यादी शाहींमध्ये पराक्रम गाजवूनही असलेले दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होते. ती सत्ता असली, तरी ‘तेथे’ मानसन्मान नाही, स्थिरता नाही, रयतेचं कल्याण नाही, याचे जिजाऊंना भान येत होते. मुलाच्या जन्माआधी त्याच्या जीवनाचं ध्येय ठरवणार्‍या किती माता या समाजात असतील देव जाणे, पण एका मातेने ती किमया केली आणि शतकानुशतके स्वराज्यावर अन्याय करणार्‍या दैत्यांचा नि:पात झाला.

   

भवानी आईला जिजाऊंचं हे मागणं पूर्ण करणं भाग होतं, कारण जे दु:ख जिजाऊचं होतं तेच दु:ख भवानी मातेचं होतं. तिचा धर्म बुडत होता. तिची मंदिरं पाडली जात होती, मूर्ती तोडल्या जात होत्या. तिलाही एक कर्तृत्ववान जीव जन्माला घालण्यासाठी समर्थ आई हवी होती. दोघींच्या गरजा एक होत्या. लक्ष्य एक होते. स्वप्न एक होते. या स्वप्नाचा परिपाक म्हणून जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला आणि शिवजन्मासोबत हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीला सुरुवात झाली.

   

जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगीतल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्‍या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी पराक्रमी पुरुषाला भगवंताचे स्थान दिले, तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले.

   

‘प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे’, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत ‘आपण- समाज, तू आणि मीही - पारतंत्र्यात आहोत’, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच.

   

शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्‍याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिलं. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवलं. शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत.

   

मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही  भूमिका पार पाडल्या.

   

या संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या. रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी १७ जून, १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel