१८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याचा पाया रचणारे एक लढवय्ये सरदार!

हिंदुस्थानातल्या राष्ट्रभक्तांनी ब्रिटिश शासकांविरुद्ध पुकारलेले १८५७ चे स्वातंत्र्यसमर ही इतिहासातील एक धगधगती घटना. सैनिकांमध्ये असंतोष पसरून १८५७ ची ठिणगी पडली. या लढ्याच्या पार्श्र्वभूमीवर एक मराठी नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले.अवघ्या महाराष्ट्राची मान ताठ करणारे हे नाव म्हणजे पेशव्यांचे सेनापती तात्या टोपे. स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान मोठे होतेच, तसेच त्यामध्ये तात्यांचे स्थानही तेवढेच मोठे होते.

१८१४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील  येवल्यातला त्यांचा जन्म. पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. त्यांचे मूळ नाव रघुनाथ. त्यांचे नाव रामचंद्र असेही ठेवण्यात आले होते. रघुनाथचे वडील पेशव्यांकडे दानाध्यक्षाचे काम पाहण्यासाठी ब्रह्मावर्तास येऊन राहिले. पर्यायाने रघुनाथचे अर्थात तात्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर गेले. पुढे बरीच वर्षे नानांच्या दरबारात तात्या कारकुनी कामांत गुंतलेले होते. १८५७ च्या समरात ग्वाल्हेरहून तात्यांनी आणलेल्या सैन्यावर मुख्य सेनापती म्हणून नानासाहेबांनी त्यांचीच निवड केली. त्या वेळी तात्यांच्या कर्तृत्वाचा कस लागला. कानपूरवर चढाई करण्यासाठी तात्या सज्ज झाले.

१८५७ मधील दिल्ली, लखनौ, जगदीशपूर व कानपूर या ठिकाणच्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपेच होते. त्यांचा धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा यांच्या बळावर त्यांच्या तलवारीला धार आली होती. कानपूर, लखनौ, झाशी असे कूच करताना तात्यांचा पराक्रम पणाला लागला. कमकुवत सैन्य, नियोजनाची कमतरता, पैसा-रसद-तोफा या साधनांची कमतरता असताना त्यांना यशापयशाची चव चाखायला लागत होती. पण तात्यांची ध्येयासक्ती प्रचंड होती.

नानासाहेब पेशवे यांचा अज्ञातवास, ग्वाल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंचा पराभव या पार्श्र्वभूमीवर एकच मराठी वाघ शत्रूला तोंड देत होता. शत्रूवर जरब बसवत, वेळोवेळी इंग्रजांच्या तावडीतून सुटून पुढचे ध्येय गाठण्याचा त्यांचा यत्न इंग्रजांना मेटाकुटीला आणत होता. तात्यांच्या या पराक्रमाची गाथा जगभर पसरली. काही युरोपियन इतिहासकारांनी तात्यांच्या शौर्याचा गौरव त्या काळी केला होता.

तात्यांची एकाकी झुंज थकली, जिंकण्याची आशा लोपली. इंग्रजांपुढे वाकायचे नाही हा निश्र्चय मात्र कायम होता. तात्या शत्रूपासून बचाव करताना मानसिंग या मित्राच्या आश्रयाला गेले. तात्यांच्या पराक्रमाला थिटी पाडणारी घटना घडली, तात्यांचा मागमूस काढणारी इंग्रजी फौज मानसिंगापर्यंत पोहोचली. मानसिंगाची फितुरी नडली आणि तात्या इंग्रजांचे कैदी झाले.

७ एप्रिल, १८५९ रोजी आरोपांना उत्तर देताना तात्यांच्या चेहेर्‍यावर भीती नव्हती, अपराधीपणा नव्हता, दु:ख तर नव्हतेच, होता तो देशाभिमान अन्‌ हौतात्म्याचे समाधान! १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातल्या होमकुंडात तात्यांची शेवटची आहुती पडली. १८ एप्रिल, १८५९ रोजी त्यांना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे फाशी देण्यात आले. या ठिकाणीच त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे.  महाराष्ट्राचे ऊर दु:खाने पण अभिमानानेही भरून आणणारी ही घटना तात्यांसारख्या मराठी वीराची ख्याती जगभर पसरवून गेली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel