निरवानिरव

प्रवचनानंतर यात्रेचे सर्व विधि करुन पैगंबर पुन्हां मदिनेस जाण्यासाठीं निघाले. मदिनेनें त्यांना आधार दिला होता. तेथेंच ते देह ठेवूं इच्छित होते. शेवटचें वर्ष होतें. प्रांतांची व्यवस्था लावण्यांत येत होती. मुस्लिम फेडरेशनमध्यें नवधर्म स्वीकारुन ज्या जातिजमाती सामील झाल्या होत्या त्या सर्वांची नीट सुसंघटित व्यवस्था लावण्यांत आली. सीरिया व मेसापोटेमियामधील अरब लोकांत जरी इस्लाम अद्याप पसरला नव्हता तरी अरबस्थानांत बहुतेक सर्वत्र इस्लामच झाला होता. जनतेला इस्लामी धर्माची शिकवण देण्यासाठीं तसेंच न्यायदानार्थ व जकातीच्या (म्हणजे गरिबासाठीं जो कर असे तो) वसुलीसाठीं माणसें नेमून सर्वत्र पाठवावीं लागत. यमनमध्यें मुआझ इब्न जबाल याला पैगंबर पाठवीत होते. त्याला निरोप देतांना पैगंबरांनीं विचारिलें, 'एखाद्या विशिष्ट प्रसंगीं अडचण आली तर कसा वागशील ?'

"कुराणांत पाहीन.'

"परंतु कुराणांतहि त्या प्रसंगीं कसें वागावें तें न आढळलें तर ?'

"तुमचें चरित्र डोळयांसमोर आहे.'

"माझ्याहि चरित्रांत तसा प्रसंग नसेल आलेला तर ?'

"तर मग मी स्वत:ची बुध्दि वापरीन.'
"शाबास ! अशा प्रसंगीं स्वत:च्या बुध्दीनें निर्णय दे.'
पैगंबर बुध्दीला मारणारे नव्हते. पुढें इस्लामी कायद्याची जी वाढ झाली त्यासाठीं ही गोष्ट महत्वाची आहे. पहिलें प्रमाण कुराण. नंतर मुहंमदांचें जीवन, त्यांनीं दिलेले निकाल, त्यांचीं वचनें, मतें; आणि शेवटीं या दोहोंच्या प्रकाशांत स्वत:ची बुध्दि-शास्त्रपूत निर्मळ बुध्दि वापरणें.

अलीला पैगंबर यमामा प्रांतांत पाठवित होते. त्यावेळेस सांगते झाले, 'हें पहा अली, न्याय मागण्यासाठीं दोन पक्ष तुझ्या समोर येतील. यासाठीं दोघांची बाजू नीट ऐकल्याशिवाय कधीं निकाल देऊं नकोस. समजलास ना ?'
एक गोष्ट राहिली होती. सीरियांत पाठविलेल्या दूताचा खुन झाला होता म्हणून मागें सांगितलेंच आहे. त्या खुनाची नुकसानभरपाई बायझंटाईनांपासून घेण्यासाठीं सैन्य पाठवावयाचें ठरलें. कारण तो नवीन इस्लामी राष्ट्राचा अपमान होता. सैन्याची तयारीहि होत आली. परंतु त्या पूर्वीच्या विषाचा परिणाम एकदम अधिक जाणवूं लागला. पैगंबरांची प्रकृति अधिक बिघडली. फार दिवस ते वांचणार नाहींत असें दिसूं लागलें. म्हणून उसामाच्या नेतृत्वाखालीं जाणारी ही मोहीम थांबविण्यांत आली.

परंतु मुहंमद आजारी आहेत असें कळतांच सरहद्दीवरील प्रांतांतून पुन्हां पुंडाई सुरु झाली. कोणी लुटालुटीचा ईश्वरदत्त हक्क सांगूं लागले. कोणी कोणी तर स्वत:स पैगंबरहि म्हणवूं लागले. हे पैगंबर आपापल्या जातिजमाती आपल्याकडे ओढूं लागले. यमनचा एक पुढारी फारच गडबड करूं लागला. तो श्रीमंत व धूर्त होता. जादूगार होता. कांहीं जादूचें चमत्कार करी. त्यानें आपल्याभोंवतीं तेजोवलय निर्माण केलें. भोळेभाबडे लोक भोंवतीं जमवून आसपासचा मुलुख तो जिंकूं लागला. त्याचें नांव उबय इब्न असें होतें. परंतु अल अस्वद या नांवानेंच तो प्रसिध्द आहे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel